ती एकटी त्या वळणावर भाग २

आयुष्यात काही गोष्टी अनपेक्षित घडतात तेच खरं
भाग २...

'किती काय काय बदललं नाही एवढ्या वर्षात?... स्वतःच बालपण डोळ्यासमोर जसच्या तसं तरळतयं आणि आता हे आईपण.... या चिमुकलीच्या रुपात.' मधुराच्या मनात आलं.


'शिक्षण झालं. थोरा मोठ्यांच्या सहमतीने, देवा ब्राम्हणांच्या साक्षीने लग्न झालं आणि डिवोर्स नावाचा अध्याय ही सुरू होऊन संपला. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. "हे अश्रू, कुणासाठी?"

"ज्याला कधीच आपली किंमत नव्हती त्याच्यासाठी?"

' त्याला ना माझी किंमत होती, ना त्याच्या नजरेत माझ्यासाठी आदर होता. मी त्याच्यासाठी फक्त, शारीरिक सुख पुरवणारी स्त्री होते. काय काय केलं त्याच्यासाठी,'

'झाली एकदाची सुटका. लग्नाच्या बेडीतून?' नवऱ्याची मर्जी सांभाळण्यासाठी काय काय आणि किती किती केलं. पण सगळचं निरर्थक. आणि आता!! आयुष्याच्या या वळणावर... मी एकटी!' तिने सुटकेचा श्वास सोडला.

सिद्धीच्या शाळेची व्हॅन येण्याची वेळ झाली होती. 

हॉर्न वाजला "बाय मम्मा... बाय मावशी!" वसुधाताई आणि मधुराला बाय करून सिध्दी शाळेत निघून गेली होती..

"त्याच्या आयुष्यात,  शेवटचे श्वास मोजतोय सिद्धार्थ." वसुधाताई म्हणाल्या.

"ताई, नेमकं काय झालं त्याला?" मधुराने पुन्हा विचारलं.

वसुधाताईंना पण फार माहिती नसल्याचं लक्षात येताच.. मधुरा म्हणाली.
"ताई... येईल मी..!" काढते वेळ.. जाऊन येऊ आपण."

"पण मी ओळखत नाही कुणालाच. अगदी आता तर, त्याला ही बघितलं तर मी ओळखणार नाही त्याला. मला एक प्रश्न पडलाय ताई, त्याच्या आईने का बोलावलं असावं मला?" 

"तू नाही ओळखत पण त्या ओळखतात तुला". वसुधाताईंनी सांगितलं.


"कसं काय?" मधुराच्या, कपाळावर आठ्यांचं जाळ जरा जास्तीच दाट झालं होतं. 

ओळखतात तुला त्या?" मधुराचा हात त्यांनी हातात घेतला."
"बरं, येईल मी... कधी जायचं ते सांगा?" अगदी साधेपणाने मधुराने विचारलं.

"शक्य होईल तेवढ्या लवकर, जाऊया.." वसुधाताईंनी सांगितलं.

"आज संध्याकाळी जमेल?" वसुधाताईंनी विचारल्यावर, मधुराने फक्त मान हलवत होकार दिला. 

संध्याकाळ झाली तशा वसुधाताई मधुराच्या घरी आल्या. सिध्दीला घरी एकटं ठेवता येणार नव्हत म्हणून सिध्दीला ही त्यांनी सोबत घेतलं. 

दोघी हॉस्पिटलमध्ये पोहचल्या.. 


वसुधाताईंना हॉस्पिटलमध्ये बघून, आणि सोबत मधुरा... सिद्धार्थच्या आईला कोण आनंद झाला होता.


"ही मधू का?".. टपोऱ्या डोळ्यांची, नाकी डोळी रेखीव, नाजूक बांध्याची.. मधुराला बघून त्या सुखावल्या होत्या.


"हो ही मधुरा... वसुधाताईंनी ओळख करून दिली. मधुराने त्यांच्याकडे बघून हलकस स्माईलं दिलं. सिद्धार्थची आई मधुराकडे डोळे भरून बघतच राहिली. कोणी तरी खूप महत्वाचं, खूप जवळच.. आपल्याला भेटल्याची जाणीव त्यांना झाली.

आपुलकीचा भाव त्यांच्या डोळ्यात स्पष्ट वाचला मधुराने.

स्तब्ध उभी मधुरा, अचंबित झाली होती.

'मी तर मधुरा... या मला कोणत्या हक्काने मधू म्हणतायत. म... म... मधू ... सिद्धार्थने कधीकाळी मारलेली मधू... म्हणून हाक तिच्या कानात गुंजली.. अगदी जशीच्या तशी..."

मानस पटलावर कोरलेला हा शब्द जणु या मधल्या काळात पुसल्याच गेला होता..  मधुरा काहीशा संकोच पूर्ण अवस्थेत होती.

"मधू..!"

 "एकदा भेटशील सिद्धार्थला".. सिद्धार्थच्या आईने,  मधुराला विचारलं. 

छोट्या मुलीसारखं त्यांनी, तिचं बोट पकडलं. लग्नानंतर आई गेली, आणि सगळी नाती दुरावली. त्यांनतर आयुष्यात आलेल्या संघर्षाला सामोरे जाताना.. कित्येक वर्षात खरं तर.. हा मायेचा स्पर्श तिच्या वाट्याला आलाच नव्हता. सिद्धार्थच्या आईच्या पाठोपाठ एक एक पाऊल ती पुढे पुढे टाकत होती.


ICU च्या दाराजवळ दोघी येऊन थांबल्या.  ICU च्या दाराला असलेल्या काचेच्या खिडकीतून त्यांनी आत डोकावलं. त्यांचे डोळे अश्रूंनी डबाडब भरले होते.

" तू बघ." म्हणून फक्तच त्यांनी इशारा केला. बेडवर सिद्धार्थ निपचित पडलेला होता. शांत!!!

नर्सने  ICU च्या दरवाजाला धक्का दिला, दरवाजा उघडला... तसा  त्या मधुराला आत घेऊन गेल्या. हॉस्पिटलमधून तशी त्यांनी स्पेशल परमीशनच काढली होती.

मधुराच हृदय जोरजोरात धडकत होता. काय होतेय तिला कळेनासं झालं होतं. सिध्दार्थच्या आईने मधुराचा हात घट्ट पकडला होता.   एक एक पाऊल, निपचित पडलेल्या सिध्दार्थच्या दिशेने पडत होता.  आधाराची गरज नेमकी कोणाला होती??? कोण कोणाला आधार देतयं... त्या स्पर्शात मात्र मायेचा ओलावा होता.


सिध्दी, वसुधाताईसोबत, बाहेरच कॉरिडॉरमध्ये शांतपणे बसली होती. 


"सिद्धार्थ बाळा"..

"बघ कोण आलंय?"


"मधू आलीय रे! मधू!" मधुराचे डोळे चमकले ऐकून....


"उठ ना रे बाळा.. उठ!" 

"का असा रागावलास रे." सिद्धार्थची आई रडायला लागली. त्यांनी मधुराच्या हात घट्ट धरून ठेवला होता.

नाका तोंडातून आणि संपूर्ण शरीराला जागोजागी नळ्या लावलेल्या होत्या. अजगर त्याच्या सावजाला, विळखा घालतो तसा विळखा घातला होता नळ्यांनी आणि मशीनिंनी.  


"काय झालं सिद्धार्थला?" मधुराने काळजीपोटी पुन्हा विचारलं.


"आज दहा दिवस झाले. पाय घसरून पडण्याचं निमित्त झालं." दोन दिवस बरा होता. बोलत होता माझ्याशी. जाताना ही तुझी आठवण काढली त्याने. मी बसूनच होते त्याच्या उशाशी आणि अचानक एक झटका आला. मेंदूत रक्तस्त्राव झाला होता." 


"कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या भवशावर आहे.  ब्रेन डेड म्हणून डॉक्टरांनी घोषित केलंय."


"अरे बापरे... किती भयंकर आहे हे!" मधुराला गहिवरून आलं.

'ही माय माऊली, आपल्या एकुलत्या एका लेकाचं, असं हे आभाळा एवढं  दुःख. कसं सहन करत असेल,' क्षणभर विचाराने ती विचलित झाली.


"मेंदू मरण पावला म्हणे आमच्या सिद्धार्थचा. ज्या मेंदूने जिवंतपणे आयुष्यभर कधीच त्याची साथ दिली नाही त्या मेंदूकडून  आयुष्याच्या शेवटी तरी काय अपेक्षा करायची नाही का?" सिद्धार्थच्या आईने पदराने डोळे पुसले.

भेटीची वेळ संपली होती.  दोघी बाहेर आल्या.
त्या वळणावर.....