ती एकटी त्या वळणावर भाग १

आयुष्यात काही गोष्टी अनपेक्षित घडतात तेच खरं..
भाग १

"तुला आठवतोय का सिद्धार्थ?


"सिद्धार्थ...!" आपल्या  क्लासमध्ये यायचा तो सिद्धार्थ?


"हो तोच."


"त्याला कोण विसरेन ताई" सिद्धार्थच नाव ऐकून मधुराच्या चेहऱ्यावर. अलवार हसू झळकलं.


"काय करतो तो आता? आज ही तसाच आहे का ताई तो?"

"आहे...!!" म्हणत वसुधाताईने लांब श्वास घेतला..

मधुरा, पाचवी सहावीत असेन तेव्हा. 

हा धाडधिप्पाड, वजनदार,  दाढी मिशा असलेला. 

चवीचा ना ढवीचा
भाजीतला कद्दू
अभ्यासात बुद्धू
वर्गातला सिद्धू
घोड्या, घोडम्या, बुद्धू, सिद्धू, सिद्ध्य्या... शाळेतली मुलं त्याला वेगवेळ्या नावांनी चिडवत. त्याला कुणी चिडवलं काय किंवा कुणी  काही म्हटलं काय? तो हसायचा फक्त.  त्याच्या नजरेत ना राग असायचं, ना लोभ, ना कुणाचा द्वेष. एवढ्या वर्षांनी ही तिला  सिद्धार्थ आठवला, जशाच्या तसा.. 

सिद्धार्थ, तिच्या शाळेतच होता. नंतर तिच्या क्लासमध्ये सुद्धा यायला लागला होता तो? मधुराला आठवलं...

"सिद्धार्थ मोठा होत होता. सुरवातीला शाळेतल्या शिक्षकांनी एकच वर्गात,  दोन चार वर्ष नापास करून पुढच्या वर्षी कसातरी पुढच्या वर्गात ढकललं. अशीच दोन चार वर्षातून एकदा, वरच्या वर्गात चलढक्कल सुरू होती त्याची.  आठवी पास निकालावर पासचा शेरा मिळाला. आणि त्याची शाळा थांबली.

"त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी, घरी छोट डेअरी प्रॉडक्टच दुकान टाकलं होतं. एक मुलगा ही ठेवला हाताशी. सगळं होतं पण बुद्धी नव्हती.  कसं होणार सिद्धार्थचं?" आई वडिलांना सिद्धार्थच्या भविष्याची चिंता सतवायची."

"एक लहान बहीण आहे मिरा, ती सध्या अमेरिकेला राहते. तिचं लग्न झालं आणि नवरा वर्ष दोन वर्षासाठी तिकडे गेला तो पुढे आलाच नाही भारतात. तुला यायचं तर ये, मी येणार नाही त्याने अटचं टाकली. शेवटी काय? नाईलाजास्तव जावं लागलं तिला ही तिकडे अमेरिकेला."


"वडील कोरोनात गेले आणि आई आहे.  बहीण अमेरिकेहून निघालीय. ती आली की? मग.......  काढणार व्हेंटिलेटर!" सांगता सांगता, वसुधाताईने लांब उसासा टाकला. "

"अरे रे...!!? ताई!!"

"नक्की काय झालं ताई!" मधुराने विचारलं.

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तो. शेवटचे श्वास मोजतोय. 

"त्याच्या आईला तुझ्याशी भेटायचंयं. येशिल?" वसुधाताईंच्या डोक्यात आर्तता होती.

"आले असते ताई, पण आज नेमकं एक घर बघायला जायचयं. हे घर सोडावं लागणार आहे आम्हाला लवकरचं. ब्रोकरकडून घेतलं तर उगाच पैसे जास्ती जातात म्हणून आमच्या ओळखीतले एक काका घर दाखवणार आहे."

"अर्जेंट नसतं तर,  नक्कीच आले असती." मधुराने सांगितलं.

"मधुरा, तुझी अडचण मी समजू शकते. अगदी महत्वाच नसतं तर मी सुद्धा म्हटलं नसतं? शक्य होणार असेल तर नक्की ये."  वसुधा ताईंचा आवाज खोल गेला होता. अशा परीस्थितीत तर दगडाला पाझर फुटतो ही तर मधुरा होती. खूप आशेने, वसुधाताई मधुराकडे बघत होत्या. 

"अगं आवर लवकर. उशीर होईल, बस निघून जाईल."  मधुरा लेकीची म्हणजे सिद्धीची, शाळेची तयारी करण्यात तिची टिफीन बॅग पॅक करण्यात व्यस्त झाली.

"तरीच तुझं ऐकत नाही हा सिद्धी मी. नाहीतर काय हाल केले असतेस केसांचे कुणास ठावूक?   वाढलेत बघ केस कसे? डोळ्यावर ही येऊ लागलेत. गपचूप मी सांगेन तसे केस कापून घ्यायचे बघ या रविवारी? मधुराने केस विंचरून मध्ये भांग पाडून वरती बो लावून सिद्धीच्या केसांच्या दोन चुट्या पाडून दिल्या.

समोरचे केस डोळ्यावर येऊ नयेत म्हणून, दोन साइडला दोन टिक टॉकच्या क्लिप ही लावून दिल्या..

सिद्धीचे केस विंचरून देताना,  ती क्षणात तिच्या बालपणीच्या आठवणीत पोहचली. आणि आठवला तो, सिद्धार्थ. 


मधुरा दुसरीत होती. मधुरा, तशी अभ्यासात हुशार होती, चुळबुळी, नटखट आणि हसरी. त्याच वर्षी, सिद्धार्थची दुसऱ्या एका शाळेतून, पाचवीत शाळेत नव्याने ऍडमिशन झाली होती. 

सिद्धार्थ, वर्गातल्या इतर मुलांपेक्षा वयाने बराच मोठा होता. चवथी, पाचवीत असतानाच, ओठांवर मिशीची रेख दाट दिसायला लागली होती त्याच्या. तीन चार वर्ष एकाच वर्गात नापास होऊन शेवटी शिक्षक नापास करून थकले आणि अखेर त्याला पुढच्या सत्रात पुढच्या वर्गात बसायला सांगतलं.

मधुरा पाचवीत गेली, सिद्धार्थचा मात्र या वर्षी ही वर्ग बदलला नव्हता. तो या वर्षी ही नापास झाला होता. आता तो तिच्या वर्गात आला होता.

नाकावर उतरलेल्या, मोठ्या भिंगाच्या चष्म्यातून, पुस्तक नाकासमोर धरून, तो काय वाचतोय कुणाला कळायचंच नाही. खूप प्रयत्न करून घेतलेलं त्याच अडखळत थोड पाठांतर सोडलं तर, त्याच्याकडून लिहून घेणं म्हणजे, लिहून घेणाऱ्यांची परीक्षा होती. वहीवर, पेन पेन्सिलने किडे रेंगत आहेत की काय असा भास व्हायचा? अक्षर कमालीच घाणेरड होतं. त्याने लिहिलेलं, कुणी वाचण्याची तसदी घेतील तर शपथ.

मुळात त्याच्या आईवडिलांना सिध्दार्थकडून काहीच अपेक्षा नसाव्यात. नापास पासच टेन्शन नव्हतच कदाचित. "किती मस्त ना!" सिद्ध्या असा शाळेत इकडे तिकडे भटकताना दिसला की प्रत्येकाला सिद्धार्थच अप्रूप वाटत होतं. 

वसुधाताई तशा जुन्या परिचयाच्या. वसुधाताईच शिक्षण झालं आणि त्यांनी घरच्या घरी क्लासेस घ्यायला सुरुवात केली. मधुराने ताईंकडे क्लास लावला होता. एक दिवस,  गुडघ्यापर्यंत  हाफ पँट घालून, सिद्धार्थ एक दिवस क्लासमध्ये आला. वाढलेल्या  मिशांना व्यवस्थित कोरलं होतं आणि दाढी ही.

"हा इथे पण आला, वर्गात किती इरिटेड करतो हा. आणि आता तर हा इथे ही, आता ताईंच्या डोक्याचा भूगा पडणार." मधुराच्या मनात आलं.

'ताईने वहीत प्रश्नांची उत्तर लिहायला सांगितलं होतं. मांडीवर ठेवलेल्या वहीत लिहिण्यासाठी त्याने मान खाली घातली. कमरेपासून तर थेट मानेपर्यंत त्याने बाक दिला. वहीत मनापासून काहीतरी लिहीत मात्र होता. 

मांडी घातलेल्या सिद्धार्थने, थोड्याच वेळात बसल्या बसल्या आपले दोन तंगडे दोन दिशेने पसारले. वळणदार अक्षर काढण्यात आणि प्रश्नांची उत्तर लिहिण्यात मग्न असलेल्या, मधुराला चुकून त्याचा पाय लागला.  

नाकावर सरकलेला चश्मा हळूच डोळ्यावर सरकवत त्याने मधुराकडे बघितलं.  मधुराकडे तो एकटक बघतच राहिला. मधुराला कससं झालं तिने हळूच तिची मान आपल्या वहीत घातली आणि लिहायला लागली.

वसुधाताईंच्या हे बहुतेक लक्षात आलं होतं. " सिद्धार्थ पाय लागला ना तुझा? तर मधुरा ला सॉरी म्हण." वसुधाताईंनी म्हटल्या लगेच दुसऱ्या क्षणी सिद्धार्थने कान पकडुन मधुराला सॉरी म्हटलं.

पायावर वाढलेलं घनदाट केसांच जंगल. त्या पायांचा तिला स्पर्श झाला. वसुधा ताईने ही तिची अवस्था ओळखली होती बहुतेक.

"सिध्दार्थ नीट मांडी घालून बसायचं क्लासमध्ये आणि उद्यापासून फूल पँट घालायचा क्लासला येताना, ताईने निक्षून सांगितलं.

"मांडी घातली, की.. की.. की.. माझे पाय दुखतात. फुल पँट घातली की.. की.. की.. मला खाली बसता येत नाही. फुल पँट घातला की.. की...की... मला गरमी होते. म्हणून मी.. मी.. मी.. फुल पँट घालणार नाही. अडखळत एका दमात त्याने सांगून टाकलं."

बोलताना हातवारे करणारा. डूलूडूलू मान हलवणारा. एकच एक शब्द वारंवार बोलणारा, बोलता बोलता अडखळणारा.  दिसायला धाड धिप्पाड, स्थूल शरीर प्रवृत्तीचा, शरीराने वाढता डोक्याने न वाढलेला. एव्हढा मोठा पोरगा पाचवीत होता.

त्याच बोलणं ऐकलं  की मधुराला हसू आवरायच नाही. ती हसली की, तो तिच्याकडे एकटक बघत राहायचा.

"शुSS, असं कुणावर हसायचं नाही"  ताई मधुराला बजावत तशा... सिद्धार्थला ही भानावर आणत.
काय होईल पुढे? "त्या वळणावर" बघू दुसऱ्या भागात
-©®शुभांगी मस्के...