ती हक्काची मोलकरीण भाग - 2

कथा एका गृहिणीची
ती हक्काची मोलकरीण

भाग - 2


"डॉक्टर माझ्या आईला काय झालयं सांगा ना? ती बरी होईल ना? तिला लवकर बरं करा." नेहा डॉक्टरांपुढे हात जोडून उभी राहून म्हणाली.

"आम्हालाही अजूनतरी कळलं नाहीये. पण त्यांना कसला त्रास होतो का? त्यांची मेडिकल हिस्ट्री?"

"हो म्हणजे गुडघे दुखायचे, टाचांमुळे तिला उभही राहता येत नव्हतं. खूप रडायची ती. मग मी तिच्या टाचेला तेल लावून मालिश करून द्यायची आणि कधी अधेमधे पोट ही दुखायचं. मग गोळी खाल्ली की बंद व्हायचं."

"बरं मग आधीचे काही रिपोर्ट वगैरे किंवा प्रिस्क्रिप्शन आहेत का त्यांचे?"

"हो आहेत. मी येतांना घेऊन आलो." मनिषने डॉक्टरांना काही प्रिस्क्रिप्शन दाखवले.

डॉक्टरांनी आणखी टेस्ट करायच्या सांगितल्या. टाचेचे हाड वाढले होते. तरीही उभी राहत होती. जयाला अपेंडिक्स असून ते पोटात फुटल्याचे निर्देशानात आले. परिस्थिती फार बिकट झाली. अपेंडिक्स फुटून खूप वेळ झाला होता. त्याचे विष पूर्ण तिच्या शरिरात पसरले होते..

"किती केअरलेस आहात हो तुम्ही. त्यांना काय होतंय कुठे दुखतयं खूपतय याकडे तुमचं अजिबात लक्ष नव्हतं? त्यांचं वय काय आहे?

" पंचावन्न." नेहा म्हणाली.

"त्यांची सर्जरी करावी लागेल, पण त्यांनी ट्रिटमेंटला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे."

नेहाची परिस्थिती खूप वाईट होती. मनात देवाच्या धावा करत होती.

"देवा, माझा जीव घे पण माझ्या आईला काहीही होऊ देऊ नको." तितक्यात राधिकाही हॉस्पिटला आली. नेहाने राधिकाला पाहिल आणि ती राधिकाच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडत होती.
राधिका ही जयाची बहिण. तीही घाबरलेली होती पण तिला आता धीराने घ्यावं लागणार होतं. ती नेहाला समजवू लागली.

"आईला काही नाही होणार." राधिका नेहाला धीर देण्याचा प्रयत्न करत होती.

नेहाने पूर्ण इंतभूत माहिती दिली.

"डॉक्टर माझी ताई कशी आहे?"

"आम्ही काही सांगू शकत नाही." डॉक्टर बोलून निघून गेले.

जयाच्या शरीरातील पूर्ण विष काढले गेले. पण ती ट्रिटमेंटला रिस्पॉन्स देत नव्हती. तिला आय सी यु मध्ये ठेवण्यात आले.

आणि जे नव्हते व्हायचे तेच झाले. तिने अखेरचा श्वास घेतला जया हे जग सोडून गेली.

नेहा राधिका तर सुन्न झाले होते. अखिलला तर डॉक्टरांनी सांगितलं त्यावर विश्वासच नव्हता. ते मटकन खाली बसले.

जयाचे पार्थिव शरीर घरी घेऊन आले. निपचित पडलेल्या देहाला राधिका आणि नेहा बिलगून रडत होत्या. जमलेले नातेवाईक दोघाचं सांत्वन करत होते. जयाचा स्वभाव अगदी कोणालाही जवळ करून घेत होता. ती नेहमी सगळ्यांशी आपुलकीने वागत असे. आजपर्यंत तिच्या घरून कोणीही जेवल्याशिवाय परत गेले नव्हते. जेवण करणाऱ्याचे मन आणि पोट तृप्त होत. ते बघून जयाच्या चेहऱ्यावर समाधान पसरत असे. मग ते कोणीही असो. दारात भिकारी जरी आला तरी स्वतःच्या जेवणाच ताट त्याला देणारी, अशी ती खूप मायाळू होती. आज जयाच्या अंत्ययात्रेला खूप गर्दी जमली होती.

अंत्यसंस्कार करून सर्व घरी आले. नेहासाठी हा जबरदस्त शॉक लागला होता. नेहाची तब्येत खूप बिघडून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. अखिल एका खुर्चीवर बसून एकटक पाहत बसले.. सर्व विधी पार पाडून बाकीचेही लोक नातेवाईक निघून गेले. राधिका, तिचा नवरा प्रथमेश, मुलगा पार्थ, अखिल, मनिष, शामल इतकेच होते. नेहालाही हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देऊन आणले होते.

राधिकाने जयाचे कपाट आवारायला घेतले. कितीतरी साड्या तेही पूर्ण आवडीच्या. जयाला साड्यांची खूप आवड होती. एक एक साडीवरून राधिका हात फिरवत होती. डोळ्यांतील अश्रू गालावर पडत होती. त्यातील एक लाल रंगाची त्यावर सोनेरी बादाम असलेली साडी तिची आवडीची. ती नेसल्यावर अगदी तिचे रूप खुलून दिसून येत होते. आत्ताच काही महिन्या आधीची गोष्ट तिला आठवली.

"एक नंबर दिसतेस ताई तू या साडीमध्ये. आज भाऊजींचं काही खरं नाही." राधिका तिला डोळा मारत म्हणाली. दोघही बहिणी व्हिडिओ कॉलवर बोलत होत्या.

" ये काही काय बोलते गधडे. समोर जावाईबापू बसलेत. तुझं काहीही सुरु असतं त्यांच्यासमोरच. नालायक कुठची !" जया तिला रागवत म्हणाली.

त्यांच बोलणं हॉलमध्ये बसलेल्या प्रथमेशच्या कानावरही पडले होते आणि तो ते ऐकून गालात हसत होता. नेहाच्या आवाजाने राधिका जयाच्या आठवणीतून बाहेर आली. तिने साडी व्यवस्थित नीट घडी करून ठेवली. तिने दुसऱ्या रकान्यात हात घातला आणि तिला साडीमध्ये काहीतरी ठेवलेलं दिसले.

क्रमश ..

🎭 Series Post

View all