ती हक्काची मोलकरीण भाग - 5

वेळीच माणसांची कदर करायला पाहिजे.
"मनिष, तू ही ताईवर ओरडून मोठ्याने बोलायचा ना? शामलने तेच केलं, तिला जाणून घालून पाडून बोलली. भाऊजी, नेहा, मनिष ऑफिसला गेल्यावर दोघांमध्ये काही वाद झाला की शामलचा आवाज वाढायचा इतका की शेजारच्या घरापर्यंत जात होता. तिच्या अंगावर धावून जायची. काय ते फक्त मारायचं बाकी होतं. तिच्या माहेरी सांगितले की तिला सासू जाच करते. शामल तू तुझ्या आईसोबतही अशा भाषेत बोलतेस का? मनिषला सांगण्याची धमकी देत होती. ताई तिचा सासुरवास करते म्हणून आणि तुला काही सांगितलं की तू काय बोलायचास रेऽऽ, "आई काय हे तुझ्या मुलीचं करतेस ना, मग हिच केलं तर काय झालं की बघू दूसरं घर. हेच बोलत होता ना तू? कदाचित तिला माहिती होतं काहिही झालं तरी हा माझी बाजू घेणार नाही. बायकोपुढे ताई नगण्य झाली. तिथेच संपला विषय. जिने कधी सासुरवास केला नाही तरीही तिच्यावर जाच करण्याचं लेबल लावलं.तुम्ही भाऊजी, ताई काही बोलायला लागली की उचलली जिभ लावली टाळ्याला, मग कस सांगणार आहे ती? तुम्ही सरळ म्हणायचे, त्यांचा गाशा गुंडाळून देतो, मग काय बोलणार ती तुमच्याकडे? घरात भांडणं होऊ नये, वाद होऊ नये म्हणून शांतच राहिली आणि सर्व सहन करत बसली. कधी प्रेमाने तिची विचारपूस केली? झेपत नाही तर कामाला बाई ठेव म्हटले तिला? जसे वय वाढते तसे शरिराचे आजार, मानसिक आजार ही वाढायला लागतात. हे जाणून घेतलं तुम्ही? तुम्हाला काय, तुम्हाला वेळेवर सर्व हातात मिळत म्हणजे झालं. बाकी काहीही असो, त्याच्याशी आपल्याला काय घेणंदेणं." राधिका अखिलकडे नजर रोखून पाहत होती.


"अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून बोलत होती ना ताई तुला? कारण तिला अन्नाची जाणीव आहे. एका वेळच्या जेवणासाठी किती राबराब राबाव लागतं, कष्ट करावे लागतात हे तिला माहिती आहे. पण तुला काय म्हणा त्याचं? जितकं खायचं असेल तितकं खायचं बाकीचे डस्बबिन मध्ये फेकून द्यायचं. तुमच्या दोघांमध्ये भांडण झाली तरी तू त्याचा राग ताईवर काढत होती. तिलाच दूषणे लावत बसली. तिच्याशी बोलायची नाही आणि ती तुझ्यापाठी जेवणासाठी मागे लगायची. 'जेवणं कर गं बाळ अंगावर पिते.' सतत तुझ्या मागे फिरायची. जशी हक्काने सांगायची मला हे हवं, ते आत्ताच आणून द्या , त्याच हक्काने तिच्यासोबत प्रेमाचे दोन शब्द ही बोलली नाहीस. जे सुख तुला तुझ्या माहेरी मिळालं नव्हतं, ते तुला इथे मिळाल. दिसणं, राहणं पेक्षा माणसाचं माणसासोबत वागणं महत्त्वाचं असतं. तुला नाही कळणार .. तुला फक्त छान छान राहणं, प्राईज टॅग कपडे वापरणं, फिरणं आणि मस्तपैकी हॉटेलमध्ये जेवण करणं, इतकचं समजले." राधिका भकास हसली.

" शामल तुला तर तिची दया ही आली नाही." बोलतांना राधिकाचा आवाज कातर झाला डोळ्यांतून अश्रू यायला लागले.

"बाहेरून जेव्हा माणूस थकून घरात येतो तेव्हा त्याला आधी पाणी द्यावं, हे ही तुला कधी समजलं नाही. अंगात ताप भरला असतांना तू तिला भर झोपेतून उठवत होती तर काय पाखीची शी सू साफ करायला. तू पाखीची आई आहे ना तुला करता येत नव्हतं? थोडंही काम केले तुझी कंबर दुखते, मग तिची .. तिची नाही दुखत? तिचं काहीच दुखत नाही. बरोबर ती एक मशिन आहे ना? घरातील बाहेरील सर्व करून पाखीला सांभाळले. तुझी डिलिव्हरी झाली आणि तिने तुला बेडच्या खालीही उतरू दिलं नाही. बाळाचं, तुझं, सगळ्यांच केलंच न? आणि ती आजारी पडल्यावर साधे तिचे कपडे धुतले तर नाहीच पण मशीनलाही तू लावले नाहीस? तुम्हा दोघांच लग्न झालं आणि तुम्ही तिला घरात बांधून ठेवलसं.. बाहेर तिच्या मैत्रिणींशीही बोलायला भेटायला जाऊ देत नव्हते. त्यावर शामलने पावंदी आणली. या बाहेर जातात तर तिकडे घरातील सर्व गोष्टी सांगतात. तू ऐकलं होतस का? तिचं बाहेर जाणं नाही. नातेवाईकांकडे नाही. तिच्या बहिणीकडेही नाही. तेव्हा नव्हतंच आणि आता तर घरात छोटे बाळ आहे म्हणून तिने घराबाहेर बिलकूल पाऊल काढायचं नाही? घरातील मोलकरीण गेली तर घरातील काम कोण करणार ना? बरोबर बोलतेय न मी? साधं कुठे जायचं म्हटलं तर तिला सकाळी लवकर उठून जेवण घरातील सर्व काम करून तिला बाहेर पडावं लागत होतं आणि तिकडून थकून आल्यावर ती ओट्याजवळ गेली की तिथे पसारा पडलेलाच असायचा. मग ती आवरणार. सकाळी सर्वात लवकर उठूनही सर्वात शेवटी ती झोपायची. सर्वाकडून ताईची कोंडी केली. बाप मुलाच्या मध्ये , मुलगा सुनेमध्येही तिलाच आणलं तुम्ही. तिच्या न बोलण्याचा, तिच्या चांगुलपणाचा खूप गैरफायदा घेतला.

"तुम्हाला इतक कसं माहिती?" शामल.

"सांगते न. मागे एकदा मी आले होते तेव्हा तुला चांगलेच ओळखले होते. तिला बोललेही होते मी कानउघडणी करते दोघांची, पण ती म्हणाली, " राधिका तू काहीही बोलणार नाही. माझ्यासाठी तू वाईट होऊ नको."

" मी वाईट व्हायला तयार आहे पण त्यांना त्यांची चूक दाखवून देणारच. मी बधले नाही तेव्हा ताईने मला तिची शपथ घातली . आणि मी मूग गिळून गप्प बसले. त्यानंतर मी काही बोलले नाही. इतकं असूनही तिने कधी मला शामलची तक्रार केली नाही. पण एक लक्षात घ्या आपले आजचे कर्म उद्याचा येणारा काळ ठरवणारा असतो."

राधिका आत गेली आणि तिने जयाची डायरी समोर ठेवली. या डायरीत तिच्या वेदना लिहल्या आहेत.


"यात लिहलंय ताईने सर्व ….तुम्ही दिलेली वागणूक तुमच्यामुळे तिच्या शरीरावर, मनावर झालेला परिणाम सर्व लिहलयं आणि लिहतांना ही जी पाने दिसताय ना त्यावर अश्रू पडून सुकले आहेत. त्या अश्रूंच कारण तुम्ही तिघेही आहेत. तिच्या आजरी पडण्याचं, तिचं शरीर थकण्याचं, तिचं मन थकण्याचं , तिचं लवकर हे जग सोडून जाण्याचही कारण तुम्हीच आहात. म्हातारपणी मुलगाच सांभळणार आहे मग कशाला बोलायचे? म्हणून गप्प बसली. पण म्हातारपण ताईने पाहिलं नाही. अर्ध्यातच सोडून गेली." राधिकाला आतापर्यंत अडवलेला हुंदका फुटला आणि ती ढसाढसा रडायला लागली. अखिलच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

"मावशी, तुला आईची डायरी कुठे सापडली? नेहा.

"ताईच्या कपाटात साडीमध्ये ठेवली होती. कपाट आवरतांना दिसली."

"माफ कर जया मला, मी कमी पडलो तुला समजण्यात. माफ कर या निर्दयी माणसाला ज्याने तुझ्या भावना जाणल्या नाहीत. माफ कर जया." अखिलल ओंजळीत चेहरा लपवून रडत होते.

"ताईने कायम घर जपण्याचा, सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. भाऊजी च्या भितिने, एकुलता मुलगा या घरातून जाण्याच्या भितीने, लोकांच्या भीतीने, कोणीही सासूलाच दुषणं लावतात या भीतीने, तुमच्या बोलण्याचे कडू घोट पिऊन जगली. तुमच्या हक्काची मोलकरीण कायमची गेली कधीही न परतण्यासाठी. ताई जर बोलली असती तर आज जिवंत असती."

मनिषने डायरी उचलली आणि तो त्याच्या रुममध्ये जाऊन वाचू लागला. जसजसं तो वाचत होता. तसच त्यांच्या डोळ्यांसमोर त्याच्या आईचे प्रतिबंब दिसून ती बोलू लागली. मनिषच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू गालावरून मानेवर यायला लागले. तो खाली गुडघ्यावर बसून मोठ्याने रडत होता.

"मी अपराधी आहे आई. तीस वर्ष तुझ्या सोबत राहून मला तू कळली नाही. आई मला माफ कर. आई आई….माझी आई मला माहिती होती. वेळीच जाणीव नाही ठेवली मी तिची यासाठी देव सुद्धा मला माफ करणार नाही." तो रडत बोलत होता.
त्याच्या खाद्यांवर हात ठेवला. त्याने वळून पाहिलं.

" मावशी, मी खूप चुकीचा वागलो मी अपराधी आहे आईचा. माझ्यामुळे तिला त्रास झाला. मावशीऽऽ " मनिष राधिकाचे पाय धरून रडत होता.

" मनिष तुमच्या सुखासाठीच तिने कधी तोंड उघडलं नाही रे. मुलाचा संसार खराब व्हावा अस कोणत्या आईला वाटणार आहे? ताई जे वागली ते कोणाला त्रास होऊ नये म्हणून."

" पण याचा तिला किती त्रास झाला मावशी?"

"त्रास तर झाला पण तू काहीही करू शकत नाही. निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसं परत आणता येत नाही. म्हणून वेळीच आपल्या माणसांना जपायला पाहिजे. त्यांच्यानंतर आपल्या हातात पश्चातापाशिवाय काहाही उरत नाही."

समाप्त…

यात जयाच काय चुकले?

©® धनदिपा


🎭 Series Post

View all