Login

ती हिशोब सांगते तेव्हा भाग १

ती हिशोब सांगते तेव्हा भाग १
बाहेर पाऊस पडला होता. तर वातावरण चांगलचं प्रसन्न झालं होत. पण तिच काय ? तिच्या मनाच काय ? मनात तर नुसते काळे ढग जमले होते.

मनातल्या विचारांचा निचरा कसा होणार ? घडलचं होत काही वेळा पूर्वी. कसं काय विसरणार होती ती ! मनातल्या मनात तर नुसती रडत होती. सासरी होती. त्यामुळे मन मोकळं होण्यासाठी रडता येत नव्हत.

डोळ्यात अश्रू दाटले होते. समोर डायरी होती. पण त्यातली अक्षर देखील धूसर धूसर झाली होती. हिशोब लिहायला बसली होती. पण कसला हिशोब करायचा ? कसा हिशोब मांडायचा ? काही सुचायला तर हवं होत ना ! तेच तर सुचत नव्हत.

खरचं म्हणतात मोठी माणसं, मन स्थिर नसलं की काम करण्यात मन रमत नाही. काम व्यवस्थित करता येत नाही. ते तिच्यासाठी तंतोतंत लागू पडत होते. आता या क्षणाला.

मनातले विचार बाजुला ठेवून ती एक डायरी घेउन बाल्कनी मध्ये बसली होती. पाऊस पडून गेल्या मुळे हवेत थोडा गारवा जाणवत होता. मातीचा मंद सुगंध बेधुंद करत होता.

आज साहिल जे बोलला होता ते तिच्या मनाला लागलं होतं. हळवं मन दुखावलं गेलं होत. एक वेळ तिच्या सासू बाई कावेरी बाई काही बोलल्या असत्या तर इतकं काही वाईट वाटलं नसत. पण जेव्हा नवरा बायकोला विचारतो, तेव्हा त्या बायकोच्या मनाला काय वाटलं असेल ? त्याची नुसती कल्पना केली तरी अंगभर शहारा येतो.

साहिल असं म्हणाला ? माझा नवरा ? तो अस काही बोलेल याची मला त्याच्या कडून अपेक्षा नव्हती. माझ्या कडून अशी काय कमी राहीली की तो असं म्हणाला ?

मी तर प्रत्येक पावलावर त्याची साथ दिली होती. त्याला नाराज केलं नव्हत. सगळया सुख दुःखात त्यांच्या सोबत, खांद्याला खांदा लावून उभी होते. सगळी कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडल्या. तरी मग काय झालं ? की तो ' ते ' म्हणाला. त्यामुळे इतक्यात दिवसात त्याची जी साथ दिली त्यावर पाणी फिरवलं गेलं होत. मन कलुशीत झालं होत. एक गाठ पडली होती.

माझं नावं किर्ती आहे. मी एका निम्न मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेली आहे. माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली आहेत. मी पुण्याला राहते. आमच्या सोबत माझ्या मावस सासु बाईंचा मुलगा पण राहतो. सोबत साहिल ची बहीण चैत्राली पण राहते. आठ महिन्या पूर्वीच तिचं लग्न केलं. मी एका सी ए फर्म मधे नोकरी करते. असिस्टंट आहे. एम् कॉम झालं होतं. खूप पगार नव्हता. पण जितका होता त्यात मी माझे वैयक्तिक खर्च भागवू शकते. इतकं तर मी कमवत होती.

किर्ती कालच माहेरून परतली होती. रात्री उशीर झाला तर ती लवकर झोपी गेली होती. पण सकाळी चांगलाच तमाशा झाला. त्याचा मात्र तिला त्रास झाला होता.

तसं बघायला गेलं तर फार काही मोठी गोष्ट होती असं नाही. पण दुर्लक्ष करण्या इतकी शुल्लक पण नव्हती. माझी धाकटी बहीण केतकीच लग्न ठरलं होत. साखर पुडा झालेला होता. पण  तीन महिन्यात नवऱ्या मुलाला पाच वर्षांसाठी परदेशात जायचं होत. तर त्याची इच्छा होती जाताना सोबत केतकीला पण घेउन जायचं. लग्न लांबणीवर नको पडायला. आता जायचं मग पुन्हा लग्न करायला भारतात परत यायचं ते खर्चिक होत.

खरं तर लग्न हे दिवाळी नंतर करायचं ठरलं होतं. पण वृषभला म्हणजे केतकीच्या नवऱ्याला हा चान्स सोडायचा नव्हता. तर लग्न जुलै मध्येच करायचं ठरलं. त्यामुळें लग्न करायला घाई झाली.

तर किर्तीला बहिणीला लग्नात आहेर देण्यासाठी पैशाची सोय करायचा वेळच मिळाला नव्हता. नवऱ्या मुलाची अशी अडचण लक्षात घेऊन लगेचच लग्न करायचं ठरलं. तर किर्ती लग्नाच्या तयारी साठी माहेरी राहिली होती.

तिची खूप इच्छा होती, केतकीच्या लग्नात तिला सोन्याचे कानातल घेउन द्यायची. पण तिला पैशांची सोय करायचा वेळच मिळाला नव्हता. सोन्याचे भाव तर आकाशला भिडले आहेत. साधं छोटं कानातल घ्यायचं असेल तरी ते पंचवीस हजारांच्या घरात पोचते.

सात आठ महिन्यांन पूर्वीच नणंदेचं लग्न करुन दिलं होतं. तर कर्ज काढावं लागलं होतं. त्यात भर म्हणजे लग्न झाल्यानंतर चालु झालेले सण वार, त्याचा खर्च करुन तर घराचं आर्थिक बजेट कोलमडत होत. हे नव्याने सांगायला नकोच.

केतकीच लग्न आहे. मी तिची मोठी बहिण आहे. तर तिला लग्नात व्यवस्थित आहेर देणं गरजेचं होतं. तर मी माझं मत साहिलला सांगितलं. तर त्याने तर इतका मोठा आहेर करायला नकारच दिला.

म्हणून मी घरातील मोठ्या म्हणून सासू बाईना सांगितल. अखेर माझ्या सासरचा मान राखण्याची जबाबदारी होती. तर सासू बाईनी मलाच सुनावलं,

" काही गरज नाही, सोन्याचं कानातलं वगैरे घेउन द्यायची. माहेरी कोणी असा इतका मोठा आहेर कोण करत का ? आपण आपलं पांघरुण बघून हातपाय पसरायला हवे. हे काय नव्याने शिकवायला हवं का तुला सुनबाई ? "

" अहो आई, केतकी माझी सख्खी बहीण आहे. एकुलती एक."

" माहित आहे. जास्त बोलू नको.अक्कल काय गहाण ठेवली आहे का ? पैसे काय झाडाला लागले नाहीत. तिला एक चांगली साडी घेउन दे. पाकिटात अकराशे रूपये दे." इतकं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला.

मी साहिलला सांगितलं तर तो म्हणतो आई सांगेल तस करं. त्याने तर या जबाबदारी मधून त्याची सुटका करून घेतली होती.

पण माझं मन काही असं वागायला राजी नव्हत. नणंदेच्या लग्नात तर मी भरपूर खर्च केला होता. मग माझ्या सख्या बहिणी साठी मी इतकं पण नाही करू शकणार. आई बाबांनी तर मला सगळं काही दिलं आहे. मला तर त्यांना काही द्यायची संधी मिळाली नव्हती. असं पण माहेरी काही देण्याची वेळ फार कमी वेळाच येते. हे भाग्य फार क्वचित प्रसंगी मिळतं.

क्रमशः

सदर कथा अष्टपैलू महासंग्राम २०२५ या स्पर्धेसाठी लिहिली आहे.