संध्याकाळी सुलक्षणाबाई घरी आल्या तेव्हा टीव्हीवर कार्टून सुरू होतं; रेवती अथर्वबरोबर सापशिडी खेळत होती. घराची हालत मात्र सकाळसारखीच जैसे थे होती. रेवतीने कुठल्याच कामाला हात लावला नव्हता. ती काही करेल अशी चिन्हंही दिसत नव्हती. सगळी कामधाम बाकी असताना हातावर हात ठेवून बसणं, टाईमपास करणं रेवतीच्या स्वभावात नव्हतं तरी आज अशी का वागत आहे हे कोड मात्र सुलक्षणाबाईंना उलगडत नव्हतं. काही विचारायला जावं तर चिठ्ठी वाचा हे तिचं उत्तर ठरलेलं होतं. अखेर अमृता, अजय कामावरून परतल्यावर बाईंनी सकाळपासून डायनिंग टेबलावर पडलेली चिठ्ठी उचलून हातात घेतली.
सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले फ्रिजमधून दूध बाहेर काढणे, मग चहा ठेवणे, नाष्टा बनवणे, डब्याची तयारी करणे. डबे घेऊन नोकरदार मंडळी कामावर गेली की पूजेसाठी फुलं काढून आणणे त्यानंतर सुसुबाईंच्या साग्रसंगीत पूजेची तयारी करणे. अर्थवला उठवून त्याची तयारी करून शाळेत सोडणे, आणणे. तो शाळेत गेला की केरवारे, मशीन लावणे, कपडे वाळत घालणे, कपड्यांच्या घड्या करणे, बाकीची साफसफाई, उर्वरित स्वयंपाक करणे. मावशींनी घासलेली भांडी पुसून ट्रॉलीत लावणे. मॉप मारणे, इस्त्रीला कपडे देणे, इस्त्रीचे कपडे घेऊन येणे. भाजीपाला आणणे, किराणा भरणे, काय हवं नको ते बघणे. बँकेत, एलआयसीत जाणे, बिलं भरणे. खर्चाचा हिशोब ठेवणे. कधी पडदे धुणे तर कधी बेडशीट बदलणे. याशिवाय सणवार, आलेगेलेल्यांच पाहणे. रेवतीने चिठ्ठीत तिची कामे लिहिली होती. तिच्या कामांची लिस्ट संपतच नव्हती.
“चिठ्ठीत तुझी कामं का लिहिली आहेस?” सुलक्षणाबाईंनी त्रासिक स्वरात विचारले.
“तुम्हाला वाटतं मी काहीच करत नाही. तुम्हीच माझी ओळख ती काहीच करत नाही अशी काल सगळ्यांना करून दिलीत म्हणून” रेवती आवेशात बोलली.
तिचे बोलणं ऐकून सुलक्षणाबाईंच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. “अगं ते नेरकरबाईंनी विचारलं, मोठी सून काय करते? म्हणून मी बोलून गेले. काही करत नाही म्हणजे नोकरी व्यवसाय याअर्थी.” आपलं बोलणं रेवती इतकं मनाला लावून घेईल याची सुतराम कल्पना नसल्याने सुलक्षणाबाई गांगरून गेल्या होत्या.
“चुकलंच माझं. मी नुसती कामं लिहिली. ह्या सगळ्या कामांना मदतनीस लावली तर ती किती पैसे घेईल हे ही लिहायला पाहिजे होते म्हणजे अप्रत्यक्षरित्या मी किती कमवते हे उघड झाले असते.” आपल्या सासूची मुक्ताफळे ऐकून रेवती अजूनच खवळली.
“तू नाहक गैरसमज करून घेतला आहेस, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता.” पूर्वी सुलक्षणाबाई एकहाती सगळ्या घराचा कारभार सांभाळत होत्या. रेवती आल्यापासून त्यांनी कामातून अंग काढून घेतलं असल्याने सवय सुटली होती. ह्यापुढे वयोमानापरत्वे आपल्याकडून होणार नाही, अमृतालाही रेवती सारखे जमणार नाही. रेवती बिथरली तर परवडणार नाही लक्षात येताच बाईंनी लागलीच सारवासारव केली.
“खरं तर गृहिणी(होममेकर)असणं हा सर्वात अवघड असा मल्टीटास्किंग जॉब आहे पण या कामाची कुठे गणना होत नाही आणि मोबदलाही मिळत नाही त्यामुळे कमवत नाही, घर सांभाळते म्हणजे काहीच करत नाही असा गैरसमज तुमचा, तुमच्या सारख्या विचारसरणी असलेल्या प्रत्येकाचा झालाय. आज पर्यंत ऐकून घेतलं यापुढे ऐकून घेणार नाही. कमावणाऱ्याच पारडं कायम जड राहणार असेल, घर सांभाळणाऱ्या गृहिणीला सन्मान मिळणार नसेल तर मला देखील अर्थजन करण्यासाठी घराबाहेर पडावं लागेल.” रेवती रागाने सगळ्यांकडे बघत म्हणाली.
रेवतीचे सडेतोड बोलणे ऐकून सुलक्षणाबाईंची दातखिळीच बसली. अमृताही खजील झाली.
“काल जे झालं अतिशय चुकीचं होतं, तुझं चुकलं आई.” कधी नव्हे ते अजयनेही आपल्या बायकोची बाजू घेतली.
एकाच दिवसात झालेली घराची दुरवस्था पाहून
रेवती घराबाहेर पडली तर संसाराची घडी विस्कळीत होईल याची जाणीव नाही म्हटलं तरी सुलक्षणाबाईना झाली होती त्यामुळे त्यांनी कमाईवरून रेवतीला न बोलण्याचे, दोन्ही सुनात दूजाभाव न करण्याचं मनोमन ठरवलं.
रेवती घराबाहेर पडली तर संसाराची घडी विस्कळीत होईल याची जाणीव नाही म्हटलं तरी सुलक्षणाबाईना झाली होती त्यामुळे त्यांनी कमाईवरून रेवतीला न बोलण्याचे, दोन्ही सुनात दूजाभाव न करण्याचं मनोमन ठरवलं.
रेवतीने दिलेला दणका इतका जबरदस्त होता की, ‘ती काहीच करत नाही’ म्हणायची हिंमत कधीच कोणी केली नसती तरी पुन्हा हा मुद्दा परत कधी तरी डोकं वर काढेल याची खात्री असल्याने रेवतीने नवीन शैक्षणिक वर्षात बी. एड साठी ॲडमिशन घ्यायचे आणि बी. एड पूर्ण होताच नोकरी करण्याचे, केवळ गृहिणी नव्हे तर सक्षम स्त्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचे ठरवले.
समाप्त.
©मृणाल महेश शिंपी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा