“ही माझी धाकटी सून अमृता. सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. एल अँड टी मध्ये जॉब करते.” सुलक्षणाबाई आपल्या धाकट्या सुनेची ओळख पार्टीच्या निमित्ताने घरी आलेल्या आपल्या मंडळातील महिलांना करून देत होत्या. सुनबाई किती हुशार आहे, हे मैत्रिणींना कौतुकाने सांगत होत्या.
“अरे वा! धाकटी इंजिनिअर, मोठी काय करते?” उपस्थित महिलावर्गापैकी कोणीतरी विचारले.
“ती काहीच करत नाही, घरीच असते.” सुलक्षणाबाई कुत्सितपणे म्हणाल्या.
सासूचं वक्तव्य रेवतीच्या कानावर पडलं आणि तिच्या काळजात चर्र झालं. तिचा चेहरा खर्कन पडला. डोळ्यात वेदना दाटून आली. कमीत कमी गृहिणी आहे असं तरी सांगायचं होतं. तिने आशेने सासूबाईंकडे बघितलं पण त्यांनी तिच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं.
सुलक्षणाबाईंच्या धाकट्या लेकाचे अमेय आणि अमृताचे चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होते. भटकंतीची आवड असलेल्या अमेयची युथ हॉस्टेलतर्फे आयोजित केलेल्या ट्रेकिंगच्या दरम्यान अमृताची देसाईशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत कालांतराने प्रेमात झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. देसाई कुटुंब बऱ्याच वर्षापासून मुंबईत स्थायिक असले तरी मूळचे अलिबागचे रहिवासी होते. अलिबाग येथे वडिलोपार्जित टुमदार घर होते. अमृताच्या काकांचे समुद्किनारी आलिशान रिसॉर्ट होते. त्यामुळे दोघांचे अलिबाग येथे डेस्टिनेशन वेडिंग झालं होते. सुलक्षणाबाईंंच्या मंडळातील बऱ्याच जणींना एवढ्या लांब अलिबागला लग्नाला जाणे जमले नव्हते त्यामुळे त्या सगळ्या पार्टी दे म्हणून त्यांच्या मागे लागल्या होत्या. बाईंच्याही मनात होतेच पार्टीचे म्हणूनच आज हा घाट घातला गेला होता.
सुलक्षणाबाई आपल्या नव्या सुनबाईचे कौतुक करताना थकत नव्हत्या. अमृताही सासूच्या पुढेमागे करत, मिरवत कौतुक सोहळा एन्जॉय करत होती आणि जिची काहीच करत नाही म्हणून हेटाळणी होत होती ती मात्र उपस्थितांचं आदरातिथ्य करत त्यांना काय हवं नको ते बघत होती. कुठल्यातरी कार्यक्रमात सुलक्षणाबाईंनी रेवतीला बघितले आणि लगेचच मोठ्या लेकासाठी पसंत केले. रेवतीला एवढ्यात लग्न करायचे नव्हते बी.एड. करायचे तिच्या मनात होते.
“लग्नानंतरही तू पुढील शिक्षण घेऊ शकतेस. सुशिक्षित मंडळी आहेत ती. कोणी आडकाठी घेणार नाही.” रेवतीला आईबाबांनी समजावले. स्वतःहून चालून आलेलं चांगलं स्थळ त्यांना हातून घालवायचे नव्हते. लेकीचे वेळेत लग्न करून देऊन जबाबदारीतून मुक्त व्हायचे होते. रेवतीलाही अजय आवडला होता त्यामुळे तीही फारसा विचार न करता बोहल्यावर चढायला तयार झाली.
लग्न होताच सणवार, चालीरीती, मोठ्या सुनेच्या जवाबदारीच्या ओझ्यात सुलक्षणाबाईंनी रेवतीला जखडून टाकले. “इतके वर्ष मीच केले आता कुठल्याही कामाला हात लावणार नाही” म्हणत त्यांनी सगळा भार तिच्यावर टाकला. भिशी, पिकनिक, मंडळात होणाऱ्या विविध उपक्रमात भाग घेत त्या घरी कमी सोशली जास्त ॲक्टिव्ह राहू लागल्या. अजयलाही बायको सतत आपल्या दिमतीला हवी होती. त्यामुळे त्याने पुढे शिक, नोकरी कर असे कधीच म्हंटले नाही. तिच्या पुढील शिक्षणाला, नोकरी करण्याला पाठिंबा दिला नाही. पुढे वर्ष दीड वर्षाने अपत्याची चाहूल लागली आणि नोकरीचे कायमचेच बारगळले. घरातली कामे, मुलाचे संगोपन दिवस पुरेनासा झाला, रेवतीही फारशी करिअर ओरिएंटेड नव्हती त्यामुळे तिने देखील वाट्याला आलेले गृहिणीपद आनंदाने स्वीकारले.
रेवती घरातल्यांच्या आवडी निवडी जपत, त्यांना काय हवं नको ते बघत होती. सणवार, नातीगोती, आलागेला सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत होती. कोणालाच तक्रार करायला वाव देत नव्हती.
गेली सहा सात वर्ष सगळं सुरळीत चालू होतं . धाकटी जाऊ घरात आली आणि चित्रच पालटलं.
गेली सहा सात वर्ष सगळं सुरळीत चालू होतं . धाकटी जाऊ घरात आली आणि चित्रच पालटलं.
अमृताची हुशारी, तिचं शिक्षण, नोकरी, मुख्य म्हणजे कमाई याच पारडं जड झालं. तिच्या भरगच्च पगाराची सुलक्षणाबाईंना भुरळ पडली. कमावतीला मान मिळू लागला आणि जिने इतकी वर्ष घरासाठी खास्ता खाल्या तिला “काय कामं असतात तुला? घरीच तर असतेस. दुपारी मस्त झोपा काढतेस.” असे टोमणे बसू लागले.
जोपर्यंत गोष्ट घरापुरती मर्यादित होती तोपर्यंत रेवतीने दुर्लक्ष केलं पण आज ज्यावेळी चारचौघात ती काहीच करत नाही म्हणत अपमानित करण्यात आले तेव्हा मात्र तिचा स्वाभिमान जागा झाला.
‘घरासाठी एवढी मरमर करूनही आपली किंमत शून्य. आपलेच आपल्याबद्दल असा विचार करतात, ह्या दृष्टिकोनातून बघतात.’ वरवर शांत आहे असं दाखवत पार्टीत, पाहुण्यांसमोर उसनं हसू घेऊन रेवती वावरत असली तरी मनातून मात्र पुरती खचून गेली होती.
क्रमशः
©मृणाल महेश शिंपी.
©मृणाल महेश शिंपी.
यातून मार्ग काढत, आपलं अस्तिव अधोरेखित करता येईल का रेवतीला? पाहूया पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा