मागील भागात आपण पाहिले सासूबाईंच बोलणं रेवतीच्या जिव्हारी लागलं होतं. समोरचा आपल्याबद्दल काय विचार करतो हे कळल्याने ती हादरून गेली होती. आता पुढे…
“मी सुद्धा केली असती नोकरी. तुम्ही करूच दिली नाहीत.” पार्टी झाल्यावर मागची आवराआवर करताना रेवतीने सुलक्षणाबाईंशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तिच्या बोलण्याकडे कानाडोळा केला.
“दमले, थकले, उद्या वर्क फ्रॉम होम नाही, ऑफिसला जायचं आहे” म्हणत त्या दोघींच्या संभाषणात न घेता भाग अमृताही तिकडून सोयीस्कररीत्या निघून गेली.
सगळं झाकपाक करून रेवती आपल्या खोलीत आली तेव्हा अजय शांतपणे झोपला होता. आपल्या बायकोला मिळालेल्या अपमानित वागणुकीचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.
‘कदाचित आईच बोलणं अजयने ऐकलं नसेल आणि ऐकलं असलं तरी आईच्या विरोधात तो जाणार नाही.’ रेवती आपल्या नवऱ्याला चांगले ओळखून होती. शांतपणे झोपलेल्या अजयकडे पाहून ती अजूनच दुखावली गेली. तिची वेदना तिच्या गालावरून ओळघू लागली. झोपेऐवजी सुलक्षणाबाईंचे शब्द तिच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागले होते.
अजून किती सहन करायचं! सगळ्यांना अद्दल घडवायची वेळ आली. तिने ड्रॉवरमधून डायरी पेन काढलं त्यात विचारपूर्वक काहीतरी लिहिलं. मनात काहीतरी योजत ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत रात्री उशिरा कधीतरी रेवतीला झोप लागली.
सकाळी पावणे सहाचा अलार्म वाजला तशी रेवती खडबडून जागी झाली. रोज गजर झाल्या झाल्या तिची उठण्याची लगबग सुरू व्हायची. चहा, नाष्टा, डबा रोजची सकाळची कामे तिची वाट बघत असायची. आज मात्र चक्क तिने अलार्म स्नूझ केला. झोप येत नव्हती तरी शांतपणे आपल्या मुलाला थोपटत लोळत पडून राहिली. थोड्यावेळाने उठून, स्वतःचे आवरून तीने फक्त स्वतःसाठीच चहा बनवला. हातात चहाचा कप घेऊन ती टेरेसवर निवांतपणे जाऊन बसली. हवेतील सुखद गारवा, दूरवरून कुठून तरी ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट, कोवळी उन्हे बऱ्याच कालावधीनंतर प्रसन्न सकाळ ती अनुभवत होती.
एव्हाना सुलक्षणाबाईं देखील उठून सवयीप्रमाणे स्वयंपाकघरात डोकावल्या. उठल्या उठल्या लागणाऱ्या पहिल्या चहाची तल्लफ अनावर झाली होती पण किचन थंड होते. रेवती कुठेच दिसत नव्हती. तिच्या खोलीचे दार बंद होते. ‘अजून कशी उठली नाही ही? आज सुट्टीही नाही.’ सुलक्षणाबाईंच्या कपाळावरच्या शिरा ताणल्या गेल्या. त्या चिडून येरझाऱ्या घालू लागल्या.
“आज चहा, नाष्टा मिळणार आहे की नाही” टेरेसचे दार लावून आत येत असलेल्या रेवतीकडे बघत सुलक्षणाबाई रागातच बोलल्या.
त्यांचा आवाज ऐकून बाकीची मंडळीही डायनिंग टेबलाजवळ जमली. प्रत्येकाच्या प्लेटमध्ये आज नाष्ट्याच्या ऐवजी एक चिठ्ठी ठेवली होती.
“काय फालतूपण आहे हा? चिठ्ठी हातात घेत अजय ओरडला. रेवतीने आज उठवले नसल्यामुळे त्याला उशीर झाला होता त्यामुळे तो वैतागला होता.
“घरातल्या घरात चिठ्याचपाट्या लिहित बसण्यापेक्षा जे काही आहे ते स्पष्ट बोलायचं होतं, चहापाण्याचे बघायचे होतं.” सुलक्षणाबाईही चांगल्याच भडकल्या होत्या.
“त्यात लिहिलंय सगळं. वाचा म्हणजे समजेल.” रेवतीने शांत स्वरात उत्तर दिले.
“डबा तरी मिळणार आहे का? मला उशीर होतोय.” अजयने रागावून विचारले.
“कॅन्टीनमध्ये खा काहीतरी.” रेवतीने ठामपणे बोलत आत निघून गेली.
रेवतीचा आजचा पवित्रा काहीतरी वेगळाच होता. कधीही कोणाला उलटून न बोलणारी, कुठल्याही कामाला नाही न म्हणणारी रेवती आज कोणालाच जुमानत नव्हती, लग्न झाल्यापासून रेवतीचे हे रूप अमृता पहिल्यांदाच बघत होती त्यामुळे ती भांबावून गेली होती. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत अमृताने चहा ठेवला. चहा, बिस्किटे घेऊन ती पटकन बाहेर आली. चहा घेऊन अजय ऑफिसला गेला. अमेय, अमृताही आपापल्या उद्योगाला लागले. सुलक्षणाबाई मात्र रेवतीवर बारीक लक्ष ठेवून होत्या.
थोड्यावेळाने रेवतीने आपल्या लेकाला अथर्वला उठवले. त्याचे आवरून त्याला शाळेत सोडायला गेली. अथर्व नर्सरीत असल्याने त्याची शाळा दहा ते साडेबारा असायची त्याला शाळेत सोडून आल्यावर रेवती केरवारे, मशीन लावणे, उर्वरीत स्वयंपाक अशी आपली सगळी कामे उरकायची पण आज तिने कुठल्याच कामाला हात लावला नव्हता.
सुलक्षणाबाईंना वाटले रेवती चिडली असल्याने अशी वागत असेल थोड्यावेळाने शांत झाली की सगळं आवरेल. त्यांनाही मंडळाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला जायचे असल्याने, त्याचं जेवणखाण आज तिथेच असल्याने स्वयंपाक कर नाही तर करू नकोस म्हणत त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले.
“संध्याकाळी बोलू या विषयावर” जळजळीत कटाक्ष रेवतीकडे टाकत सुलक्षणाबाई घाईघाईत घराबाहेर पडल्या.
क्रमशः
©मृणाल महेश शिंपी.
काय असेल रेवतीच्या मनात? तिने लिहिलेल्या चिठ्ठीत…संध्याकाळी घरात वादळ येईल की सगळे पूर्ववत होईल…कळेलच पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा