ती महत्त्वाची की तिचा पगार?

गोष्ट तिच्या पगाराची

रमा चहाचा ट्रे हातात घेऊन जरा बिचकतच बाहेर आली.
"ही आमची रमा." सत्यजित राव घसा खाकरत म्हणाले.
"ये, चहा दे सर्वांना."

सगळ्यांना चहा देऊन रमा आईच्या शेजारी जाऊन बसली. फिकट निळ्या रंगाचा छानसा पंजाबी ड्रेस तिच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होता. पाहायला आलेल्या मुलाकडे बघण्याचे तिचे धाडस होत नव्हते. तिची चोरटी नजर अधून -मधून त्याला पाहण्याचा प्रयत्न करत होती.

"तुम्हाला मुलीला काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारू शकता." माधवी ताई मुलाच्या आई-वडिलांकडे पाहून म्हणाल्या.

"हो तर.. त्यासाठीच तर आलो आहोत आम्ही. म्हटलं, आमच्या मुलाने फोटो पाहून पसंत केलेली मुलगी प्रत्यक्षात कशी आहे? हे तरी पाहून येऊ.
बरं, रमा तुला स्वयंपाक येतो ना? म्हणजे मी महिन्यातले जवळ -जवळ पंधरा दिवस घरात नसते, भिशी, ट्रीप, तर कधी हा नातेवाईक तर कधी तो नातेवाईक.. तेव्हा या दोघा बाप -लेकांना स्वयंपाक करून घालायला यायला हवा म्हणून विचारलं." उमा काकू रमाचा अंदाज घेत म्हणाल्या.

"हो. मला सगळा स्वयंपाक अगदी व्यवस्थित येतो." रमा मान खाली घालून म्हणाली.

"हो. अगदी पुरणा -वरणाचा साग्रसंगीत स्वयंपाक सुद्धा तिला उत्तम जमतो." माधवी ताई म्हणाल्या.

"बाकी घरकाम येत असेलच!" मुलाचे वडील मध्येच म्हणाले.

"हो. मुली सासरी जायच्या म्हणजे त्यांना सगळं यायलाच हवं. नाही का?" सत्यजित राव.
"तुमच्या मुलाला काही कामं येतात की नाही? म्हणजे आजकाल नवरा -बायको दोघंही घर सांभाळतात म्हणून म्हंटल. बाकी गैरसमज नसावा."

"नाही. आम्ही तसले फाजील लाड केले नाहीत आमच्या मुलाचे." उमा काकू ठासून म्हणाल्या.
"बरं, आम्ही ऐकलं की रमा नोकरी करते म्हणून!"
बोलताना त्यांचा उत्साह लपत नव्हता. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.

"हो. शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा आणि मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं या मताचा आहे मी म्हणून रमाला नोकरीसाठी प्रोत्साहन दिलं." सत्यजित राव अभिमानाने म्हणाले.

"बरोबर. साधारण किती पगार असेल तिला?" उमा काकू पुन्हा अंदाज घेत हळूच म्हणाल्या.

"अहो, तुमच्या लेकासारखं इंजिनियरिंग केलंय तिने. अर्थातच त्यानुसार पगार आहे तिला." माधवी ताईंनी हसून प्रश्न टाळायचा प्रयत्न केला.

"तरी किती असेल? म्हणजे लग्नानंतर तिचा पगार आमचाच होणार ना! हे बघ रमा, आमची पसंती आहे म्हणून बोलत नाही. पण पगारातला निम्याहून अधिक भाग घरी द्यायला हवा हं. आमच्या अभयला तीस हजार पगार आहे. घरचा खर्च तोच बघतो. तुला वीस, पंचवीस हजार तरी सहज मिळत असतील ना?" उमा काकू.

"हो. पस्तीस हजार पगार आहे तिला."

"म्हणजे आमच्या अभयपेक्षा जरा जास्तच आहे म्हणायचा. ते एक बरं झालं. हल्ली त्याच्या पगारात काही भागत नाही हो. त्यातच यांना पेन्शन नाही म्हणून.."
उमा काकू आपल्या नवऱ्याकडे पाहत डोळ्यांनी खुणावत म्हणाल्या.
"आता आम्हाला तुमची मुलगी एकदम पसंत आहे. तुम्ही तुमची पसंती लवकरात लवकर सांगा म्हणजे झालं."

"बाबांनाही पेन्शन नाही. मी माझ्या पगारातली काही रक्कम दरमहा इथे आई -बाबांना देत जाईन." रमा मान वर करत म्हणाली.

"असं कसं? मुलगी एकदा का सासरी गेली की तिचा पगार माहेरी देण्याचा तिला काही अधिकार नाही." अभय असा बोलत होता जणू काय बोलायचं हे आधीच ठरलं होतं.

"लग्न झालं म्हणून माझा आणि माहेरचा संबंध संपत नाही. आई - वडील आणि मुलीचं नातं बदलत नाही ना?" रमा आत्मविश्वासाने म्हणाली.

"तसं नाही. पण सासरच्या माणसांचा तिच्यावर जास्त अधिकार असतो." अभयचे वडील मध्येच म्हणाले.

"तो असतोच. त्याला आमची ना नाही आणि पगारातील काही रक्कम माहेरी देण्याचा निर्णय सर्वस्वी रमाचा आहे. आमचा नकार असूनही हट्टाला पेटल्यासारखी वागते ती कधी कधी." सत्यजित राव अभयच्या वडिलांना म्हणाले.

या वाक्यावर अभयचे वडील नुसतेच हसले.

"मुलीला चांगला पगार आहे असं ऐकून आम्ही हे स्थळ पसंत केलं आणि तुमचं भलतंच काय चाललंय हे? म्हणे, माहेरी पगार देणार.. मग आम्ही काय करायचं? याच्या तुटपुंजा पगारावर घर चालवायचं? घरखर्च, बिलं, शिवाय माझी भिशी, ट्रीप हा खर्च खूप झाला. अहो, आमच्या घरातल्या वस्तू सुद्धा आता जुन्या झाल्यात. एक -एक करून घ्यायच्या म्हंटल तर आयुष्य जाईल आमचं अन् घरी येणाऱ्या सुनेची काही कर्तव्य आहेत की नाहीत?" उमा काकू रागाने बोलत होत्या.

"खर्चाला आवर घालावा थोडा. बाकी सगळी कर्तव्य ती पूर्ण करेलच. पण तिच्या पगारावर हक्क सांगणारे आपण कोण? त्याचं काय करायचं ते तिचं तिला ठरवू दे." सत्यजित राव वातावरण हलकं करत म्हणाले.

"असं कसं? ते आम्हीच ठरवणार. आमच्या मुलापेक्षा पगार जास्त असूनही आम्ही तिला पसंत करत आहोत, हे तुमचं नशीब समजा." उमा काकू.

"रमाला आलेलं हे पहिलंच स्थळ आहे. तिचं लग्न ठरत नव्हतं म्हणून आम्ही तुम्हाला बोलवायला आलो नव्हतो आणि तुम्हाला तिच्या पगाराशी सोयरिक जुळवायची आहे की तिला सून म्हणून सन्मानाने घरी न्यायचं आहे?" सत्यजित राव उसळून म्हणाले.

वातावरण बिघडलेलं पाहून माधवी ताई उठून पुढे आल्या आणि उमा काकूंना म्हणाल्या,
"मी काय म्हणते, पगारचा विषय आत्ता नको. तुमच्याकडून होकार आहे तर रमाला विचारू, अभय तिला पसंत आहे का?"

"आई, मला हे लग्न करायचं नाही. लग्नाआधीच माझ्या पगाराबाबतीत ह्यांच्या एवढ्या अटी असतील तर लग्नानंतर काय होईल याचा विचार सुद्धा करवत नाहीय. सून म्हणून माझी कर्तव्य मी विसरणार नाही. मी जशी सासरच्या मंडळींची काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे, तशीच माहेरच्या लोकांची काळजी घेतली तर काय हरकत आहे?
अभय, तुम्हाला पैसे कमावणारी बायको हवी आहे की एक जोडीदार म्हणून तुम्ही तिची निवड करणार आहात? हे आधी ठरवा."

वा! चांगले संस्कार केलेत हो मुलीवर. अशी उलट बोलणारी मुलगी सून म्हणून नकोच आम्हाला. चल अभय." उमा काकू आणि अभय उठून उभे राहिले.

"पण मी काय म्हणते, ते पगाराचं नंतर ठरवलं तर नाही का चालणार?" माधवी ताई त्यांना अडवत म्हणाल्या.

"आई, निघू दे त्यांना." रमा पुढे होत म्हणाली. रमाच्या या वाक्यावर उमा काकू डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागल्या.

"अहो, बोला ना काहीतरी." माधवी ताई सत्यजित रावांकडे पाहून म्हणाल्या.

"जाऊ दे माधवी, त्यांना सून नको आहे. पैसे कमावणारं चालतं -फिरतं मशीन हवं आहे. अशा घरी माझी लेक मला द्यायची नाही." सत्यजित रावांनी रमाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. हे पाहताच अभय आपल्या आई -वडिलांसह रागाने तिथून निघून गेला.

आजच्या जमान्यात अशीही लोकं असू शकतात? हे माधवी ताईंना पटत नव्हतं. रमाने आगाऊपणे काही बोलायला नको होतं आणि आपण थोडं नमतं घ्यायला हवं होत, या विचाराने त्या अस्वस्थ झाल्या. सत्यजित रावांनी मात्र आपल्या लेकीची बाजू उचलून धरली. शेवटी एका बापाचं काळीज होतं त्यांचं. सासरी आपल्या लेकीस योग्य तो मान मिळायला हवा यासाठी ते तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार होते.. अगदी जीवात जीव असेपर्यंत. रमाने आपली बाजू स्पष्टपणे मांडली यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.


समाप्त.
©️®️सायली जोशी.
सदर कथा इतरत्र प्लॅटफॉर्मवर कुठेही वापरू नये.