ती नवऱ्याने टाकलेली. भाग -२

घटस्फोटीत स्त्री असणे चुकीचे असते का?
ती.. नवऱ्याने टाकलेली!

भाग -दोन

"हो. शोभतं मला. येतांना आरसा बघूनच तर मी आले. ही साडी, हे दागिने, ह्या बांगडया.. सारं सारं काही शोभते मला. मेकअप सुद्धा मी बऱ्यापैकी करते."
तिने एक पॉज घेतला.

"नवरा सोबत नाही म्हणून मी नटू नये असा काही नियम आहे का?"

तिच्या प्रश्नाने बाकीच्या बायकांचा चेहरा खर्रकन उतरला.

"आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, नवऱ्यानं मला नाही तर मी त्याला टाकलेय. तुमच्या नवऱ्याचे बाहेर लफडे असते तर तुम्ही त्याच्यासोबत राहू शकला असता का? मी तरी नाही राहू शकले. सरळ त्याला फॅमिली कोर्टात ओढले आणि घटस्फोट घेऊन मोकळी झाले. अशा व्याभिचारी नवऱ्यासोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं स्वीकारलं मी.

आणि हो, हे नटणं, मुरडणं त्याच्या पैशातून नाही तर स्वतःच्या कमाईतून करते बरं. पोटगी म्हणून एक पैसाही मागितला नाही मी."

सर्व बायका काही न बोलता निमूटपणे ऐकत होत्या.

"आज थोडी सजले, सवरले तर एवढं काही बोललात. घटस्फोटानंतर सात आठ वर्षे मी अशीच वैफल्यात काढली. कधी तोंडाला पावडर सुद्धा नाही लावली तेव्हा तू अशी का राहतेस? म्हणून विचारायला तर तुमच्यातील कोणीही आलं नाही गं.

नवऱ्यापासून स्वतःहून वेगळी झाले असले तरी मीही खचले होतेच की. उणापुरा वीस वर्षाचा संसार केला होता मी. नाही म्हटलं तरी माझं प्रेम होतंच की त्याच्यावर. स्वतःला त्याच्यातून बाहेर काढायला बरीच वर्षे लागली.

नवऱ्याच्या दुःखातून बाहेर पडत नाही तो मुलगा बिघडला. नाही ते व्यसन करू लागला. त्याच्यामुळेही किती मनस्ताप सहन केलाय मी, माझे मलाच ठाऊक."
बोलतांना ती थोडी भावुक झाली.


" ताई माफ करा आम्हाला. आम्ही असं बोलायला नको होते." तिला पाणी देत त्या चौघीतली एक म्हणाली.

तिच्याकडे बघून दामिनीने आपल्या बॅगेतून पाण्याची बाटली काढुन तोंडाला लावली.

"नोकरीबद्दल तूच म्हणाली होतीस ना?" तिसरीकडे पाहत दामिनी.


"ताई चूक झाली हो." नजर चोरत ती.


"या वयात नोकरी करताना मला कसलीच लाज वाटत नाही. नोकरीच करते ना? काही चुकीचे तर वागत नाहीये मी. उलट या नोकरीमुळे माझ्यात नवा आत्मविश्वास निर्माण झालाय.

नवरा, मुलांचं करण्यात माझं अख्खं तारुण्य खर्ची पडलं. आता मी जरा स्वतःला वेळ द्यायचा ठरवले. नवरा तर माझा नव्हताच, मुलालाही आयुष्यातून बाहेर काढले. त्याचे व्यसन पूर्ण करण्याचा ठेका मी एकटीने थोडीच घेतलाय ना? पंचवीसचा झालाय आता तो. दुनियादारी त्यालाही कळते.

मी शिकवायला तयार असताना तो शिकला नाही आता मीच त्याला बोलले, 'बाबा रे, तुझं तू बघ. भीक माग, कोणते काम कर पण स्वतःचा खर्च स्वतः उचल. तुझे शौक पूर्ण करणे आता मला जमणार नाही.'

त्या बायका डोळे विस्फारून दामिनीकडे बघत होत्या.

:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******

🎭 Series Post

View all