'ती'..... तिचं माहेर.... आणि तिचं बाळंतपण... भाग २

About Her....
किस्सा क्रमांक २

मी म्हणेल तेच खरं करणारी सासू..... आणि तिच्या या स्वभावाला आणि टोमण्यांना वैतागलेली एक सून... यांच्यातला हा संवाद???? (वाद म्हणायला हवं खरं तर )

सासू - काय गं पाळीचा पाचवा दिवस ना आजचा?

सून - हो आई.

सासू - आता यावेळी मी सांगतेय ते करायचं. सांगेल त्याच दिवशी जवळ यायचं तुम्ही दोघांनी. बाकी दिवस एकत्र झोपायचं पण नाही. ती निर्मला सांगत होती, या या दिवशी केलं की राहतं.... आणि मुलगाच राहतो.... कितीतरी बायकांना प्रत्यय आलाय...

सून -.....,....

सासू - कळतंय का काही...


सून - आई अहो तुम्ही हे सगळं त्यांना का नाही सांगत? दरवेळी मलाच का सांगता?

सासू - आता या गोष्टी मी त्याला सांगू का? मग तुला कशाला आणलंय लग्न करुन? आईनं पोराला सांगायच्या गोष्टी आहेत का या?

सून - अहो मग सुनेला सांगायच्या तरी आहेत का?

सासू - आपण दोघी बायका आहोत. बाई बाई मध्ये बोलता येतं. बायकोने नवऱ्याला सांगता येतं. बाकी कुठली बाई कशी सांगेल पुरुषाला? एवढी पण अक्कल नाही का?

सून - अहो पण बाईनेसुद्धा दुसऱ्या बाईच्या बेडरूम मध्ये कशाला बघावं? मग ती आई असो, ताई असो की सासू असो. हा नवरा बायकोचा विषय आहे की नाही? मग तुम्ही का सांगताय आम्हाला, कधी सेक्स करायचा आणि कधी नाही ते? हा आमचा वैयक्तिक विषय आहे असं नाही का वाटत तुम्हांला? जी गोष्ट मला तुमच्याकडून ऐकायला लाज वाटतेय ती तुम्हाला मला सांगताना लाज नाही का वाटत?

सासू - लाज कुणाची काढतेस गं? सासुशी कसं बोलायचं शिकवलं नाही का तुला घरच्यांनी?

सून - माझ्या घरच्यांना मध्ये आणायची काही एक गरज नाही. त्यांना कमीतकमी एवढं तरी कळतं की नवरा बायकोच्या खाजगी आयुष्यात डोकावू नये....

सासू - मग??? पाच वर्षे झाली लग्नाला अजून नातवंडाचं सुख नाही.

सून - शेवटचं सांगते. इथून पुढे या विषयावर माझ्याशी बोलायचं नाही. जाऊन तुमच्या लेकाला सांगा. माझं लिमिट संपलं आता ऐकायचं. उलट उत्तर आलं तर मला किंवा माझ्या घरच्यांना दोष द्यायचा नाही. आणि हे मी परत सांगणार नाही. तुमची सून किती उद्धट आहे, कशी तुम्हाला उलटून बोलते याचा नेहमीप्रमाणे गावभर बोभाटा केला तरी मला फरक पडणार नाही.

सून चुकली का इथे? खरंच तिच्यावर संस्कार नाहीत का? काय म्हणणं आहे तुमचं?

🎭 Series Post

View all