ती.... तिचं माहेर.... आणि तिचं बाळंतपण....

About Her
भाग १ आणि २ इथे वाचा



भाग ३ आणि ४ इथे वाचा


किस्सा क्रमांक ५ पार्ट २ (अंतिम)

"हे बघ तू तुझ्या घरी जा. काय आराम करायचाय तो तिकडं कर. बाळ झाल्यावरच ये. मला नाही जमणार तुझं करायला....आणि तसंही बाळंतपण माहेरीच व्हायला पाहिजे." घरी आल्याबरोबर सासूबाईंनी सरळ हात वर केले.

"अहो पण आई, आईचं नुकतंच गुडघ्याचं ऑपेरेशन झालंय. तिला एवढी हालचाल नाही झेपणार. त्यापेक्षा मी इथेच थांबते. आपण बाई लावू की सगळ्या कामाला. मला बसल्या जागी जेवढं जमेल मी करेलच...."

"बाईच लावायची तर तिकडे जाऊन लाव. मला नाही जमणार तुला सगळं जागेवर द्यायला...."

शेवटी ती माहेरीच गेली.... आराम करायला.

तिच्या आईने याही अवस्थेत तिला जमेल तसं सगळं केलं. वरच्या कामांना बाई लावली. यावेळी परत काही होऊ नये म्हणून सगळ्याच बाबतीत तिच्या घरचे काळजी घेत होते.

या काळात सासू फक्त तिच्या घरच्यांना सुचना द्यायलाच कॉल वर यायची.... तेही जेव्हा ही इकडून कॉल करेल तेव्हा. "निट काळजी घ्या, यावेळी मागच्या सारखं काही होऊ देऊ नका....मला पाठीने काही सुचत नाही, नाही तर तिला तिकडं पाठवलंच नसतं...." ही नेहमीची टेप ऐकवत कॉल कट करायच्या.


आठव्या महिन्यात तिची तब्येत अचानक खालावली. बाळाची हालचाल मंदावली होती. हॉस्पिटल ला ऍडमिट केलं गेलं. बरेच कॉम्प्लिकेशन झाले होते. पूर्ण प्रयत्न करूनही बाळाला वाचवता आलं नाही. तिच्या आईचे डोळे अविरत वाहत होते. मुलगी शुद्धीवर आल्यावर तिला काय सांगायचं..... कसं सांगायचं की यावेळीही बाळ जगलं नाही, या चिंतेने आईचं काळीज पिळवटून गेलं.

सासूबाई आल्या, आणि आल्याबरोबर बडबड करायला सुरवात केली. "निट काळजी घेतली नाही. आमच्या नातवंडाचा जीव गेला तुमच्यामुळे. एवढंच होतं तर आम्हाला सांगायचं. आम्ही केलं असतं कसंही. मला काय माझी सून जड नव्हती..... पण मेली माझ्या पाठीच्या दुखण्याने काही सुधरू दिलं नाही... नाहीतर इकडं पाठ्वलीच नसती....." असं बरंच काही बडबडत तिच्या आईला अजून अपराधीपणाची भावना देत होत्या.

बिचारी आई, स्वतःचा आजार बाजूला ठेवून पोरीला जपलं, पण तरीही शिव्या खाव्या लागत होत्या. त्यात डॉक्टर आधीच म्हणाले होते, यावेळी काही झालं तर परत आई होणं जवळजवळ अशक्य आहे.

ती शुद्धीवर आली, आणि सासू घाईघाईने आत आली. "निट काळजी घेता आली नाही का? गेली माझी नात." म्हणत गळाच काढायला सुरवात केली.


हिच्यासाठी हा मोठा धक्का होता. तिसऱ्यांदा बाळ गेलं.... एखाद्या दगडासारखी ती हालचाल न करता पडून होती. डोळ्यांतून एक थेंब नाही पाण्याचा. पुन्हा तिची तब्येत खालावली. डॉक्टर, नर्स लोकांची धावपळ सुरु झाली. आईचा जीव वरखाली होऊ लागला. आणि सासू तिथंच कसा हिच्या माहेरच्यांनी हलगर्जीपणा केला हे फोनवर आपल्या लेकीला सांगत बसली.

अजूनही स्टेबल नव्हती ती. तिथले डॉक्टर खेकसलेच सासूला. "अहो काही कळतं की नाही. अजून निट शुद्धीवर आली नाही तेच सुरु झालात. धक्का बसलाय त्यांना. काही कळतं का नाही. कधी बोलावं काय बोलावं ते..... जरा थांबून आरामात सांगता नसतं आलं का?"

सासूबाई सरळ उठून गेल्या तिथून.....

किती नवल आहे नाही! एकविसावं शतक म्हणे. अजूनही काही ठिकाणी हीच अवस्था आहे. मालिका बघून आपण त्या निर्मात्यावर, प्रोड्युसरला शिव्या घालतो की बायका एवढ्या वाईट का दाखवल्यात. पण खऱ्या आयुष्यात पण अशा बायका असतात.... म्हणून तर त्यांना त्या कथा दाखवाव्या वाटतात ना!

आणि वंश वाढणार कुणाचा? सासरचा.....
बाळ आडनाव कुणाचं लावणार? सासरचं....
आणि बाळंतपण कोण करणार? माहेरचे....

तरी आजकाल परिस्थिती बरीच सुधारली आहे. या सगळ्या जुन्या चालीरिती हळूहळू बदलत चालल्या आहेत.

पण अजूनही अशा गोष्टी घडतात.... आणि यापुढेही घडत राहतील. कितवं शतक यांवं लागेल कुणास ठाऊक!!!!!!


हा या सिरीज चा अंतिम भाग नाही. इथून पुढेही याचे भाग येत राहतील. कारण अशा कथा घडतच राहतील.....

या सर्व कथा या सत्य घटनावर आधारितच आहेत.



🎭 Series Post

View all