ती.. तिचं माहेर.... आणि तिचं बाळंतपण... भाग ४

About Her
किस्सा क्रमांक ४

योगिनीची डिलिव्हरी झाली. मुलगा झाला. दोन्हीही घरात आनंदी आनंद होता. 'पहिली बेटी धनाची पेटी' नंतर आता वंशाचा दिवा आला होता....

पाचवी छान झाली. पण त्याचवेळी तिची नणंद बाहेरगावी होती. त्यांची ही नवरा बायकोची परदेश ट्रिप खूप आधीच प्लॅन झालेली असल्याने तिला येता आलं नाही. बाळाला बघायला आणि पाचवीलाही.

तिकडून आल्यावर डायरेक्ट ती आणि तिचा नवरा योगिनीच्या माहेरीच गेले.

योगिनीच्या माहेरी, तिच्या लहान भावाचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. वहिनी तिला आणि बाळाला खूपच जपत होती.


बाहेरून आल्यावर योगिनीची नणंद आणि तिचा नवरा दोघेही फ्रेश झाले. आणि मग बाळाला घेतलं. बाळाचे लाड करुन झाले, त्याला तिकडून दिलेलं गिफ्ट देऊन झालं. पाहुणचार झाला.

बाळाची मालिश, अंघोळ झाल्यावर त्याला झोपी लावत योगिनीच्या आईने कपडे धुवायला घेतले. त्यांच्या घरात प्रत्येकजण आपापले कपडे स्वतः नेऊन मशीन च्या बाजूला नेऊन ठेवायचे. आई किंवा वहिनी सॉर्ट करुन मशीन लावायच्या.

वहिनी आत किचन आवरत होती, त्यामुळं आईने मशीन लावायला घेतली. हे दोघे नुकतेच बाहेरून आलेत, कपडे आहेत का काही धुवायला हे विचारायला ती हॉल मध्ये गेली. योगिनी बाळाला झोपवून बाहेरच त्यांच्याशी गप्पा मारत बसली होती.

"ताई, काही कपडे आहेत का, धुण्यासाठी? मशीन लावते आहे आता. असतील तर द्या."

"नाही नाही कपडे तर नाहीत. तिथेच लॉंड्री ला दिले होते हॉटेल वर. हा फक्त यांची चड्डी बनियान आहे बाथरूम मध्ये तेवढी धुवून टाका." नणंदबाई सहज बोलावं तसं बोलली. आणि इकडे आईने योगिनीकडे बघितलं. दोघीही एकदम शॉक झाल्यासारख्या बघत होत्या एकमेकींकडे.

काय बोलावं दोघींना सुचेना. पण वहिनी पटकन किचन मधून बाहेर आली. आणि हसतच म्हणाली, "ताई सॉरी हा. पण आमच्याकडे ना इनरवेअर मशीन मध्ये लावत नाहीत. नॉर्मल कपडे आणि ऑफिस चे कपडे हे सुद्धा वेगळंच लावतो आम्ही. आणि आमच्यकडे सगळ्यांना सवय आहे, आपापले अंडर गारमेंट्स स्वतःच धुवून टाकायचे. कुणी दुसऱ्यांसाठी ठेवत नाही. अगदी पुरुष सुद्धा...." तिने अगदी स्पष्टपणे पण नम्रपणे सांगितलं.

त्यावर योगिनीनेही पटकन "हो ताई, भाऊ आणि बाबा पण कधी आईकडे देत नाहीत किंवा वहिनीलाही सांगत नाहीत.... स्वतःच धुवून टाकतात." म्हटलं.

तिच्या नणंदेला अपमान वाटला तो. नवऱ्यासमोर आपल्याला असं सुनावलं याचं तिला जास्त वाईट वाटलं. तिने सरळ ते बाथरूम मधले ओले कपडे तसंच उचलून नुसतेच पिळले आणि सुकायला टाकले.

आता घरी गेल्यावर यावर तमाशा होणार हे योगिनीला चांगलंच माहित होतं.

सुनेच्या माहेरी गेल्यावर नखरे करणारे, तिच्या माहेरच्यांना सतत कमी लेखणारे महाभाग खूप आहेत. आपण सासरचे म्हणजे खूप ग्रेट! असं वाटतं यांना.

काही ठिकाणी आईने सासूचे पय धुवायची पद्धत आजही चालू आहे. ती एक प्रथाच आहे म्हणे. एक सोहळा असतो. .... आश्चर्य आहे ना.

आणि जर प्रथाच आहे तर उलटी पण करुन पहा ना. बघू काय होतंय. किती दिवस 'आम्ही मुलाकडचे' म्हणत नाक वर ठेवायचं. बदलेल का कधी हे?

🎭 Series Post

View all