'ती'..... तिचं माहेर.... आणि तिचं बाळंतपण... भाग १

About Her..... Her Motherhood
सगळ्या आयांना हैप्पी मदर्स डे..... नव्यानेच आई झालेल्या नवख्या मातांना सुद्धा हैप्पी मदर्स डे..... वंशाला दिवा देण्याच्या नावाखाली छळ सहन करुन आई झालेल्या बापड्यांना पण हैप्पी ❤️मदर्स डे....
आणि त्यांना जन्माला घालणाऱ्या आयांनो तुम्हाला पण बरंका!

तुम्हाला वाटेल आजचा दिवस काय, हिच्या लेखाचं शीर्षक काय आणि ही विश काय करतेय? डोक्यावर पडली वाटतं. आज अक्ख सोशल मीडिया सोसल त्याहून जास्त आईमय झालेलं असताना ही बया काय बोलतेय?

काळजी करु नका..... मी बोलणार आहे आईविषयीच! पण जरा वेगळ्या अर्थाने. मुलीच्या जन्माचा सोहळा साजरा करण्याच्या बातम्या आजकाल खूपच पाहतो, ऐकतो..... पण खरंच इतकं सहज झालं आहे का तिचं जगणं? बदलले आहेत का सगळ्यांचेच विचार? केलं जातं का तिला स्विकार प्रत्येक घरात?

आणि जेव्हा हिच मुलगी सून बनून येते, तेव्हा तिचं काय होतं? आजकाल सासवा अगदी आई नाही होता आलं तर आईसारखं तरी नक्कीच होण्याचा प्रयत्न करतात. पण सगळ्यांनाच जमतं का? सगळ्याच घेतात का सामावून.... या परक्या घराच्या लेकीला?

प्रश्न पडलेत तर त्यामागची कारणमिमांसा सुद्धा करूया.... काही आसपास घडलेले किस्से.... काल्पनिक अजिबात नाही हा! अगदी खरेखूरे.... जसंच्या तसं.... नावं बदलावी लागलीत.... काय करणार! जास्त खरं आजकाल सोसवत नाही हो समाजाला! असो. वाचा.

किस्सा क्रमांक १

रोशनी : काय गं आलीस का भेटून तुझ्या मैत्रिणीला? कसं आहे गं तिचं बाळ. फोटो दाखव ना.

पुनम : हो अगं कालच जाऊन आले. हा बघ तिचा विडिओ.

रोशनी : अगं कसली गोंडस परी आहे गं.... असं वाटतंय आता उचलून घ्यावं.... किती चुळबुळ करतेय यार ❤️ उम्मा उम्मा... आणि ही दुसरी मुलगी कोण आहे? किती छान घेऊन बसलीये ना बाळाला. ती पण कसली क्युट आहे.

पुनम : ती तिची मोठी बहीण आहे. दोघीपण गोड आहेत गं... हुशार पण आणि सुंदर पण... ती मोठी तर आताशी ४ वर्षांची आहे. पण इतकं छान सांभाळते ना बाळाला. म्हणजे कुणी सांगत नाही हा... पण स्वतःच मोठी बहीण झालीये तशी शहाणी झालीये बघ...

रोशनी : wow... अश्या गोंडस पऱ्या घरात असतील तर किती आनंदी असेल घर....

पुनम : आपल्याला वाटून काय उपयोग? ज्यांना वाटायला हवं त्यांना तर काहीच वाटत नाही तिच्याबद्दल.

रोशनी : म्हणजे?

पुनम : अगं दुसरी पण मुलगीच झाली म्हणून सासू अजून भेटायला आली नाही.

रोशनी : व्हॉट रबिष? आताच्या जगात कोण वागतं असं? इथे लोक मुलगी झाली म्हणून गावभर साखर वाटतात....

पुनम : ते फक्त ठराविक लोक. आणि काही तर फक्त चर्चेत राहावं म्हणून करतात... अगदी मोजके लोक अगदी मनापासून करतात. आणि काही असतात हिच्या सासरच्या लोकांसारखे. बिनडोक.... अक्कलशून्य.... नालायक..... हलकट...


रोशनी : अगं हो हो हो. किती त्या शिव्या? शांती घे जरा.

पुनम : व्हेज मध्ये मला एवढ्याच येतात. नाहीतर अजून दिल्या असत्या. ती तिची सासू..... एक बाई असून असं बोलूच कसं शकते? लाज वाटत नाही का यांना?

रोशनी : अगं पण तू अशी चिडचिड करुन काही होणार आहे का? राग तर मलाही आलाय पण तो इथे काढून काही उपयोग होणार आहे का?

पुनम : अगं स्वतः तर आली नाही वर मुलालाही अडवत होती. काही गरज नाही भेटायला जायची म्हणे. काही तीर नाही मारलाय तिने. पोरगीच तर घातली जन्माला.

रोशनी : तीर मारला म्हणजे? हिच्या आईबापाने हिच्या जन्माच्या वेळेस असाच विचार करायला हवा होता.... म्हणजे हीच नसती आली दुनियेत. काय पण माणसं असतात. बाईच बाईची मोठी शत्रू आहे म्हणतात ते काही खोटं नाही.

पुनम : बघ तर. आता मुलगा किंवा मुलगी काय हिच्या हातात आहे का? तसं तर दोघांच्याही हातात नाही. पण बापामुळे मुलगा किंवा मुलगी ठरतं. निसर्गाने त्याला तेवढंच वेगळेपण दिलंय. बाकी बाईने सगळ्या कळा सोसायच्या पण तिला काही चॉईस नसतो. देवाने पण भेदभाव केला यार. नऊ महिने तिने वाढवायचं, पण वेगवेगळे क्रोमोझोम कुणाला तर पुरुषाला! पण तरी शिव्या कोण खाणार तर बाई....

रोशनी : यू आर राईट! म्हणजे आई होण्याचं भाग्य दिलं... पण तिथे सुद्धा स्री पुरुष भेदभाव केला. बाईला एकच आणि पुरुषाला दोन क्रोमोझोम! पण काय गं, तिचा नवरा सासूला काही बोलला नाही का?

पुनम : बोलला म्हणे. समजावलं तिला हे सगळं. मुलगी मुलगा तिच्या हातात नाही....माझ्या हातात आहे.... तर त्याला म्हणे ते मला नको सांगू. तिसरा चान्स घे लगेच. मला नातू हवाय. माझा वंश खुंटलाय इथं.

रोशनी : तिसरा? लोकसंख्या वाढीला ना ह्या हिच्यासारख्या सासवा जबाबदार आहेत. यांना वंशाला दिवा हवा असतो. नुसतंच म्हणायला एकविसावं शतक! अजूनही जिथे मुलगी जड होते....

पुनम : बघ तर शरीर आणि मन दोन्हीही कुठल्या परिस्थितीत आहे तेही हिला कळू नये का? स्वतः सुद्धा आई झालीच आहे ना. बिचारी मैत्रीण आतून तुटून गेलीये अगदी. डिप्रेशनच्या वाटेवर आहे गं. घरचं कुणीच आलं नाही बघायला. नंतर तरी सांभाळतील ना, हा प्रश्न सतावतोय बिचारीला. आता तिला खरी आधाराची गरज आहे, आम्ही मैत्रिणी आहोतच गं...पण खरा आधार तर जवळच्या लोकांनी द्यायला हवा ना....


रोशनी अजूनही विडिओतल्या त्या दोन्ही गोंडस पिलांना आठवत, यावर काय करता येईल याचा विचार करतेय..... तुम्हाला काय वाटतं?

🎭 Series Post

View all