Login

ती….

Bhaykatha
साधारण सत्तावीस वर्षांपूर्वीची ही घटना गणेश चतुर्थीचे दिवस होते ….कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो…सगळीकडे गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळतो….सोशल मीडिया चा गंध ही नसलेले ते दिवस…भजन ,आरत्या…वातावरण नुसतं भक्तिमय झालेलं..अनू नुकतीच छान जेवण करून झोपायला भाडेकरुंच्या घरात आलेली.ते गणेशोत्सवात आपल्या गावी गेलेले.तिने आपल्या मोठ्या बहिणीला सोबत बोलावलं होतं पण ती म्हणाली मी नंतर येईन.अनूने टिव्ही ॲान केला.दूरदर्शन वर शुक्रवारी रात्री छान सिनेमे लागायचे…थोडा वेळ होता सिनेमा सुरु व्हायला म्हणून ती फ्रेश व्हायला गेली.बऱ्याच दिवसांनी बाथरूम मधला नळ सुरू केला आणि त्यातून आवाज येऊ लागला…सुरुवातीला ती घाबरली पण नंतर तिने मनाची समजूत घातली की खूप दिवस वापर नसल्याने कदाचित आवाज येत असेल.
छान फ्रेश झाली आणि टिव्ही समोर मस्त खुर्चीवर बसली…अचानक तिला कुजबुज ऐकू आली.पण टिव्ही चा आवाज असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं.पण कुजबुज काही थांबेना…हळूहळू अनिता….अनिता अशा हाका तिला स्पष्ट ऐकू येऊ लागल्या.’अनिता’ तिचचं नाव…पण अशी हाक तिला फक्त कॅालेजच्या मैत्रिणी मारायच्या.घरी,शेजारी तर सगळे तिला अनूच म्हणायचे ..तिची आजी मात्र तिला अनिता म्हणायची पण ती तर १३ वर्षांपूर्वी या जगातून गेली होती...तिने दार उघडलं…तिला वाटलं तिचा भाऊ तिला सतवायला हे करत असेल .म्हणून ती अगदी भांडणाच्या आवेशांत बाहेर आली..पण बाहेर कुणीच नव्हतं.ती म्हणाली…मला घाबरवायला कुणी हे करत असेल तर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही सांगून ठेवते आणि ती दार उघडचं ठेवून टिव्ही समोर उभी राहिली.
…एक क्षण गेला ..आणि थंडगार वाऱ्याची झुळूक यावी तसा थंडगार स्पर्श तिला आपल्या खांद्यावर जाणवला.ती वळली ..तर तिची आजी पदर तोंडात धरून अगदी मायेने तिला पाहत होती..एकच सेकंद आणि अनू प्रचंड घाबरली…ती आजीचा हात झटकून उघड्या दारातून पळत सुटली…धावता धावता बाहेर वाळत घातलेल्या साडीत अडकली.. आणि आणखी घाबरली.आपल्या घरी जाऊन आईच्या मिठीत शिरली..जवळ जवळ बेशुद्ध झाली..सगळे गोळा झाले…तिला पाणी दिलं..सावरलं..तिने सगळं सांगितलं तसा तिचा भाऊ आणि बहीण धावतच त्या घरी गेले पण त्यांना काहीच दिसलं नाही.तिचे आजोबा तिला जवळ घेऊन तिला म्हणाले…अगं ती तुझ्या सोबतीला आली असेल ..तू उगीच घाबरलीस..तिलाही वाटलं तसचं असेल आपण तिच्याशी बोलायला हवं होतं.. पण त्या वेळी..ती घाबरली कारण जिवंत नसलेली व्यक्ती मग ती कितीही जवळची असली तरी त्या वेळी …आपण घाबरतोच.त्यानंतर आजी कधीही आली नाही…ना तिला भेटली ..ना दुसऱ्या कुणाला.पण अनूच्या मनात ही खंत कायम राहिली का आली असेल ती?…
0