Login

तिचं आभाळ भाग 1

Story About Sepration


कोर्टाच्या पायरीवर सावनी आणि निहार एकमेकांकडे मूकपणे पाहत उभे होते. अचानक निहारच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून सावनी कासावीस झाली. तिला वाटलं सरळ जाऊन निहारला गच्च मिठी मारावी.
तसं दोन पावलं पुढे होत तिने आपल्या वकीलाकडे पाहिलं. तिचा वकील निहारच्या वकीलासोबत काहीतरी बोलत होता. पण त्याचे सगळे लक्ष सावनीकडे होते. त्याला बहुतेक तिच्या मनातली तगमग कळाली असावी. तो नजरेनेच तिला नाही म्हणाला. तशी सावनी पुन्हा मागे सरकली.

"निहार, थांब." निहार पुढे जाऊ लागलेला पाहताच न राहवून सावनीने त्याला हाक मारली.

"ते..तुझ्या डोळ्यात पाणी पाहून मला राहवलं नाही. खरंतर आता आपण वेगळे झालो आहोत. मला काही विचारायचा हक्क नाही. तरीही एक विचारू? राहू शकतोस माझ्याशिवाय?"
निहारच्या नजरेला नजर भिडवून सावनी म्हणाली.

"जे आत कोर्टात झालं ना, ते आरोप प्रत्यारोप नव्हते रे. ती अनेक दिवस मनात साठवून ठेवलेली एकमेकांबद्दलची चीड होती. ती बाहेर पडली आणि मन शांत झालं. तेव्हा कुठे लक्षात आलं, आपण एकमेकांपासून "वेगळे " झालो आहोत.
तसे कधी दूर गेलो नव्हतो रे आपण एकमेकांपासून. आपल्याला केवळ सवय झाली होती, एकमेकांच्या चुका काढून भांडायची.

आपण वेगळे होण्याचं कारण वेगळचं होतं. तुझ्या घरी मला कसलंच स्वातंत्र्य नव्हतं. आई म्हणतील तेच करायचं, अगदी स्वयंपाकापासून ते
गादीवरल्या बेडशीटचा रंगही त्यांच्याच आवडीचा. मी याला थोडा जरी विरोध केला ना, तर त्या घर डोक्यावर घ्यायच्या. मग त्यांची नुसती चिडचिड, आदळ आपट चालायची. त्यांना वाटायचं, माझ्याविना या घरचे पान देखील हलता कामा नये!

पण मला ते स्वातंत्र्य हवं होतं रे. कधी मी उत्साहाने म्हणावं, आई मी आज जेवायला छानसा बेत करते आणि तुम्ही मी केलेलं जेवण माझं कौतुक करत संपवाव. कधी सामानाची यादी करताना माझ्या आवडीच्या चार गोष्टी मी त्यात ॲड कराव्यात. पण आईंनी नेमक्या त्याच गोष्टी खोडून टाकाव्यात. आपण फिरायला बाहेर जाताना काही ना काही कारण काढून आई -बाबा आपल्या सोबत येत. मग आपल्या प्रायव्हसीची सारी मजाच निघून जाई. माझ्या माहेरचा एखादा पाहुणा आपल्या घरी बोलवायचा म्हंटल की आई नेमक्या आजारी पडत.
तुला हे सारं दिसत असून देखील तू कधी काहीच बोलला नाहीस. माझी फक्त एवढीच अपेक्षा होती की, तू नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहावेस."

सावनी भरभरून बोलत होती. तसा तिचा वकील अस्वस्थ होत होता.
"मॅडम, कायदेशीररित्या तुम्ही दोघे आता नवरा- बायको नाही. प्लीज तुमच्या नवऱ्याचा..आय मिन, मी. निहारचा हात सोडा."

"सर, आमचं नातं कायद्याने संपलं असलं, तरी माझं निहारवर अजूनही तितकचं प्रेम आहे." सावनी निहारकडे एकटक पाहत म्हणाली.

"मग वेगळं होण्याचा हट्ट का केलास?" निहार तिची नजर चुकवत म्हणाला

"मला तुझ्यासोबत संसार करायचा होता. आई - बाबा हवे होते रे मला. पण एक मार्गदर्शक म्हणून. आपल्या नात्यात गैरसमज पसरविणारे सासू - सासरे नको होते मला."

"पुन्हा तेच. इतकं काय केलं गं त्यांनी? कुठलीच जबाबदारी कधीच तुझ्या अंगावर पडली नाही. तरीही प्रत्येक बाबतीत तुझी तक्रार होतीच." निहार वैतागून म्हणाला.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all