तिचं अस्तित्व !

Motivated

             ती घरामध्ये असते तेव्हा घराला घरपण आलेलं असत. परंतु ती घरामध्ये नसते तेव्हा मात्र घर हे आतून खर्चलेल असतं. खरंच !  तिचं अस्तित्व किती महत्त्वाचं असतं ना? मग  ते घरात असो किंवा समाजामध्ये ! असच  एक  सामाजिक कार्यातून विश्वाला गवसणी घालणार असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे सिंधुताई सपकाळ. \"अनाथांची माय \" म्हणून त्यांना संबोधले जायचे.4 जानेवारी 2022 ला त्यांची प्राणज्योत मावळली, एका सोनेरी पर्वाचा अंत झाला. सिंधूताईंचं असं अचानक जाण  खूप मोठी पोकळी निर्माण करणार आहे देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो ! 

       सिंधुताई म्हणजेच \"माईंचं \" बालपण अत्यंत खडतर परिस्थिती मध्ये गेलं. शाळेची, अभ्यासाची आवड असूनही त्यांना शिकण्याची संधी मात्र मिळाली नाही. लहान वयामध्ये म्हणजेच वयाच्या नवव्या वर्षीच त्यांचा विवाह झाला. सासरची परिस्थितीही तशी नाजूकच होती. त्यांची मुलगी पोटात असतानाच , दिवस भरलेले असतानाच त्यांना त्यांच्या नवऱ्याने घराबाहेर काढलं आणि हाच प्रसंग त्यांच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉइंट' ठरला.  या कालावधीमध्ये ही त्यांनी खूप खूप हालअपेष्टा सहन केल्या. परंतु  खाणींमध्ये तावून सुलाकुन निघाल्याशिवाय सोन्याला चकाकी येत नाही तसेच काहीस त्यांच्या आयुष्यामध्ये घडत गेलं. परिस्थितीचे चटके त्या अखंड सहन करत राहिल्या आणि शेवटी परिस्थितीचं त्या माऊलीला शरण आली.

          माईंमध्ये खूप काही चांगले गुण होते या गुणांचा अंगीकार प्रत्येकाने केला पाहिजे. त्यातला  पहिला महत्त्वाचा गुण म्हणजे उदारपणाची भूमिका. स्टेशनवर जेव्हा त्या राहायच्या  तेव्हा मिळालेली चतकोर भाकरीसुद्धा त्या अनेकांमध्ये वाटून खायच्या म्हणजे स्वतः कडे काहीच नसताना सुद्धा इतरांना देण्याची जी वृत्ती आहे ती आपल्याला माईंमध्ये दिसून येते. आणि  आपण मात्र देवाने छप्पर फाडून जरी दिलेलं असलं तरी एखाद्याला त्यातला चतकोर देतानासुद्धा कंजूषपणा करतो. याचा  विचार व्हायला हवा.  त्यानंतर दुसरा गुण म्हणजे कणखरपणा. परिसथिती  कितीही कठीण असली तरी आपण परिस्थितीपुढे हतबल व्हायचं नाही.  जीवनरूपी गुलाबाचं झाड हे काट्यांनी भरलेल आहे.  आपण त्या काट्यांना घाबरायचं कि गुलाबाच्या फुलाला स्पर्श करून त्याचा आनंद घ्यायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं. वेळ प्रसंगी माई स्मशानभूमीमध्येसुद्धा राहिलेल्या आहेत.  रात्रीच्या वेळी जळत्या  चितेवर भाकरी भाजून त्यांनी खाल्लेली आहे. अशा कठीण काळातही त्या स्वतः ला नेहमी सांगत, शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेली नाही. सरतेशेवटी परिस्थितीलाच त्यांनी झुकवल. 

          समाजामध्ये अशा कितीतरी सिंधूताई आहेत. ज्या परिस्थती पुढे  हतबल होऊन परिस्थितीला शरण गेलेल्या आहेत. स्त्रियांवर होणारे अन्याय,  अत्याचार थांबले पाहिजेत. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक स्त्रीची मानसिकता ही सिंधुताई सपकाळ, किरण बेदी, सुधा मूर्ती या आदिशक्तींचा आदर्श घेईल आणि त्यांचे आचार - विचार सत्यात उतरवेल. स्त्रियांनी ' स्वयम् संरक्षणाचा ' मार्ग जोपासला तरच ' तिचं बाधित अस्तित्व ' हे अबाधित राहील.