Login

तिचं जग (श्रावणी लोखंडे) भाग 2

लढाई एका आईची


"नमस्कार, मी सौ.शालिनी देवरे. मोठ्या सरांशी फोन वर बोलण झालं होत त्यांनी फाईल घेऊन बोलावलं होत.

"ओके मॅडम..बसा तुम्ही. मी सरांशी बोलून घेते." दुसऱ्या बाजूला इंटरकॉमवरून शालिनीला आत पाठवायच का अस विचारल. समोरून उत्तर येताच तिने लगेच शालिनिला बसण्याआधीच मॅडम.. तुम्हाला आत बोलावलंय अस सांगितल आणि तिची फाईल तिला परत दिली.

शालिनी डाव्या हातात फाईल पकडत उजव्या हाताने पदर खांद्यावर घेत दाराजवळ आली.

दारावर टक टक करून..

"मे आय कम इन सर?"

"येस..कम इन! मिसेस.शालिनी देवरे. या बसा."

"धन्यवाद सर."
फाईल समोर ठेवत ती बसली.

"तुमच्या केस बद्दल तुम्ही मला सांगितल आहेच पण मी ही फाईल स्टडी करतो बाकी प्रोसिजर तुम्हाला माझ्या पी. ए सांगितलच" नामांकित ऍडव्होकेट. नलिन खैरे बोलले.

"हो सर. पण सर माझी केस फाईल होईल ना? म्हणजे मला न्याय मिळेल ना?" परिस्थिती,न्याय, समाज आणि त्याच समाजातली आपली माणस.. हे सगळे जेंव्हा खरे रंग दाखवतात तेंव्हा वाटत की आपण खरच काहीतरी करायला हवं होत. दुःखाला सोबत घेऊन जगू नाही शकत पण त्याला मागेही नाही सोडू शकत." शालिनी डोळ्यातलं पाणी काठावरच अडवत बोलली.

"तुम्ही अजिबात काळजी करू नका. केस माझ्याकडे आहे म्हणजे ती आपणच जिंकणारच! त्याहीपेक्षा मोठ म्हणजे तुमच्या लेकीला नक्की न्याय मिळवून देणार मी." त्यांनी आश्र्वस्त करत सांगितल.


"तिने हात जोडून आभार मानले आणि घरी जाण्यासाठी निघाली. जाण्याआधी घरासाठी लागणारा भाजीपाला आणि वाण सामान घेऊन ती पुन्हा बस स्टॉपवर बसची वाट बघत उभी राहिली. बाजूलाच एक बाई तिच्या तान्ह्या लेकराला छातीशी धरून दूध पाजत होती. लेकरू दूध अस पित होत जणू अमृतच.. आई पण त्या छातीशी असलेल्या लेकराच्या कपाळावर ओठ टेकवून तीच प्रेम व्यक्त करत होती. हे सगळ बघून शालिनीचा कंठ दाटून आला होता. आतल्या आत आवंढा गिळत ती बसच्या वाटेकडे डोळे लावून उभी होती. बस येताच ती चढली आणि घराच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

"आई..आई..हे बग मी काय काडलय? ही तू..ही मी.. आनी हे बाबा..उड्या मारत आनंदी होत तिने आईच्या गालावर पापा घेऊन पुन्हा ती वही उचलत घरभर सगळ्यांना तिच्या बोबड्या बोलात सांगत हिंडत होती. घरभर तिच्या पायातल्या पैंजनांची रुणझुण सुरूच असायची. घर कस अगदी न्हाऊन निघालं होत तिच्या बालपणाने...लेकीच्या विचारातच ती घरी पोचली. बघते तर दारात सगळ तीच सामान फेकलेल होत.
*****************
इवलीशी...प्राजक्ता..
गरोदर असताना शालिनी नेहमी दारातल्या प्राजक्ता खाली बसून तिच्या पोटातल्या बाळाशी गप्पा मारायची. लॉ च शिक्षण घेतलेल्या शालिनिने पुढे स्वतःच भविष्य घडवून अंगावर काळा कोट घालण्याआधीच हातात हिरवा चुडा भरला होता. वडीलांच्या तब्ब्येतीमुळे एकुलती एक असलेली शालिनी विचार न करताच तिच्या वडिलांनखातिर बोहल्यावर चढली. आजारी वडिलांची इच्छा ती मोडू शकली नाही. सुधीर च स्थळ चालून आल होत म्हणून त्यांनी साध्या पद्धतीने लेकीच्या डोईवर अक्षता टाकल्या आणि काही दिवसातच त्यांना देवज्ञा झाली. माहेर म्हणजे फक्त तिचा बाप होता आणि आता तोही नसल्याने माहेरपणाला मुकलेली शालिनी घरातच गृहिणी बनून राहिली.

नाजूक परिस्थिती मुळे शालीनीची डिलिव्हरी सातव्या महिन्यातच झाली. डॉक्टरांनी तिला मुलगी झाल्याचं सांगितलं. सगळे खूप खुश होते. सहा पिढ्यांनी घरात मुलगी जन्मली होती पण तिची नाजूक अवस्था पाहता ती जगेल की नाही याची मात्र शाश्वती नव्हती. बाळामधे जगण्याची इच्छाशक्ती खूप होती तिने सगळ्या संकटाना सामोरं जात स्त्री ही कितीही वय असल तरी सक्षम असते हे सिद्ध केलं होत. एकदम ठणठणीत होऊन तीच तिच्या हक्काच्या घरात तब्बल अडीच महिन्यांनी धुमधडाक्यात स्वागत झाल. गुलाबाच्या पाकळ्यांचा गालिचा काय.. शेवंतीच्या फुलांची रांगोळी काय...सगळ अगदी स्वप्नवत वाटत होत.

दोन दिवसांनी बारस करून बाळाचं नाव ठेवलं \" प्राजक्ता \"