तिचं कर्तव्य आहे ते - भाग दोन ( कर्तव्य कि हक्क)
मागील भागात आपण पाहिलं कि सौम्याच्या घरात सगळीकडे सत्ता तिच्या सासूच्या हातात असते. आता पाहूया पुढे,
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये असताना तिला दुपारी मेल आला. पटकन सौम्याने इनबॉक्स उघडुन तिने तो मेल ओपन केला, त्यात लिहिलेले वाचून तिला खूपच आनंद झाला.
तिला मुंबईतील ऑफिसकडून आलेल्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट मीटिंगसाठी निवडण्यात आले होते. तिला माहित होतं ही संधी तिच्या करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट ठरेल.
ते वाचूनच तिचा उत्साह एकदम उसळला. ही संधी म्हणजे तिच्या करिअरचं पान पलटणारी होती. ती आनंदात शेजारच्या टेबलवर बसलेल्या तिच्या मैत्रीण प्राजक्ताकडे वळली.
"प्राजक्ता! मला मुंबई मीटिंगसाठी जाण्याचा मेल आलाय!"
प्राजक्ताने हसत विचारलं,
"वा! पण… तुला घरातून परमिशन मिळेल का? तू तर गेल्या वेळेस आपल्या ऑफिस पिकनिकलाही नाही आलीस, आणि आपल्या गर्ल्स ट्रिपलाही नाही आलीस. जर नाही मिळाली तर? "
सौम्या थोडी थांबली. तिला झटकन वास्तवाची जाणीव झाली.
"अगं… बघू ना, यावेळी मिळेल कदाचित,"
ती हळूच म्हणाली, पण तिच्या आवाजात खात्री नव्हती.
" नाही मिळाली तरी ठणकावून तू तुझ्या सासूला सांग, कि मी जाणारच.. काहीही झालं तरी ही संधी तू दडवू नकोस. समजलं... "
प्राजक्ताने तिला थोडं दटावलं.. तिने फक्त मानेने होकार भरला. तिच्या मनात मात्र विचारांचा गुंता सुरू झाला,
"खरंच… गेल्या दोन वर्षांत मी कुठेच गेले नाही. फक्त घर, ऑफिस, घर… माझ्या आयुष्यात ‘मी’ या शब्दाला जागा आहे का?"
तिला विचारात गेलेले पाहून परत प्राजक्ताने हळू आवाजात म्हटलं,
"तुला पण थोडं स्वतःसाठी जगायला हवं. नुसतं कर्तव्य करत बसलीस तरी हक्क कुणी सहज देत नाही, ते मागूनच घ्यावे लागतात."
सौम्याने मेल पुन्हा उघडून पाहिला, पण आता त्या आनंदात थोडीशी भीती होती .
"घरी सांगितलं तर आई कश्या रिऍक्ट होतील?"
तिच्या मनात आधीच सासूबाईंचा आवाज घुमू लागला,
“घर आधी, मग बाकी काही…”
तिने मनातच ठरवलं आधी सागरशी तिच्या नवऱ्याशी बोलते, आणि मग सासूबाईंशी... देवाला प्रार्थना करत तिने आपले काम सुरु केले.
दुपारी जेवण करत असतानाच तिच्या नवऱ्याचा तिला कॉल आला..
" सौम्या, संध्याकाळी लवकर ये.... ताई येणार आहे राहायला.... "
ते ऐकून कधी नव्हे ते सौम्याला खूपच आनंद झाला. आता घराकडे कोण बघेल हा प्रश्न दूर झाला होता. तिची नणंद नेहा तिच्याकडे चांगले पंधरा दिवस राहायला येणार होती.
सौम्या सागरशी बोलू शकेल का???
तिची सासू काय रिऍक्ट करेल??
तिची नणंद सांभाळेल का आईला???
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा