Login

तिचं कर्तव्य आहे ते - भाग तीन

सासूबाई नकार देतात
तिचं कर्तव्य आहे ते - भाग तीन ( कर्तव्य कि हक्क)


मागील भागात आपण पाहिलं कि, सौम्याला ऑफिस मधून एक चांगली संधी भेटते. पण घरी समजल्यावर काय होईल???


जेवण आटोपून सौम्या स्वयंपाकघर आवरत होती. सागरने पाणी घेतलं आणि खुर्चीवर बसला.


"काय गं, आज काहीतरी खूप खुश दिसतेस?" त्याने विचारलं.

सौम्या हळूच हसून म्हणाली,

"हो… आज मला मुंबई ऑफिसमधून मेल आलाय. मुंबईला तीन दिवसांची प्रोजेक्ट मीटिंग आहे. मी निवडली गेलेय!"

सागरच्या चेहऱ्यावर एकदम आनंद चमकला.

"अरे वा! ही तर जबरदस्त बातमी आहे. ही तर तुझ्यासाठी मोठी संधी आहे."

पण पुढच्याच क्षणी त्याचा चेहरा थोडा गंभीर झाला.


"पण… आई होकार देईल का?"

सौम्या सुद्धा निराश स्वरात म्हणाली,

"मलाही तीच भीती वाटतेय. आईना नेहमी घराची काळजी असते. घरातील कामे कोण करतील, त्यांचं कोण बघेल असच चालू होईल त्यांचं."


सागरने विचारात थोडा थांबून म्हणालं,

"पण बघू,  ताई उद्या येतेय ना? मग घरात सगळ्यांना मदत मिळेल. आईला सांगूया, कदाचित तयार होईल. मी मदतनीस बघतो..."

तरीही सौम्या अजूनही अनिश्चित होती.

"तुला खरंच वाटतं का आई मान्य करतील? मदतनीस च्या हातच त्यांना चालत नाही. "


सागरने हसत तिच्या खांद्यावर हात ठेवला.

"हो ग,माहित आहे पण मी आहे ना तुझ्यासोबत. आपण दोघं मिळून बोलू. आणि ही संधी सोडायची नाही. आईला समजावू . घर आणि बाकी सगळं सांभाळलं जाईल."

सौम्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं, पण मनात अजूनही शंका होती.


"आई मान्य करतील का…?"


दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सुनंदा काकूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. कधी नव्हे ते गॅसवर चहा ठेवून त्या वारंवार हॉलमध्ये ये-जा करत होत्या.

"सौम्या, आज जरा लवकर काम आटोप गं. ताई येणार म्हटलं की सगळं छान हवं. तिच्या आवडीचा उपमा कर, आणि संध्याकाळी पुरणपोळीही करायची."

सौम्या हसत म्हणाली,

"ठीक आहे आई करेन मी , पण तुम्ही पण थोडं आराम करा."


सागरने पेपर बाजूला ठेवत म्हटलं,

"आई, ताई पंधरा दिवस राहणार आहे ना? मग आपण रोज काहीतरी वेगळं करून पाहुणचार करू."

सुनंदा काकूंच्या चेहऱ्यावर आणखी चमक आली,

"हो हो! रोज वेगवेगळे पदार्थ करायचे. माझी मुलगी आली की घरचं वातावरणच बदलतं."

तेवढ्यात सागरने थोडं संकोचून सांगितलं,


"आई… दोन दिवसांनी सौम्या ऑफिसच्या ट्रिपला जाणार आहे. दोन दिवसांचीच आहे. ताई आल्यावर घरात काही अडचण नाही होणार."

सुनंदा काकू क्षणभर गप्प झाल्या… मग कपाळावर आठ्या आणत म्हणाल्या,


"माझी मुलगी येणार म्हणून मुद्दाम जाते का? हे काय बरे दिसेल का लोकांना? घरात पाहुणी असताना सून बाहेर जाते! आणि घर कोण बघेल? हिला नेहमी हिच्या कर्तव्यापासून दूर पळायचं असत."


सागरने समजावण्याचा प्रयत्न केला....