Login

तिचं काय चुकलं ? भाग १

तिचं काय चुकलं ? भाग १
" आई पुढच्या आठवड्यात बाबा येणारं आहेत." रमा आनंदात आपल्या सासूबाईंना उमा बाईंना म्हणली.

" मग त्यात काय झालं ? इतकी वर्ष तर तू त्यांच्या सोबतच रहात होतीस ना ? अठ्ठावीस वर्ष तु त्यांच्या सोबत रहात होतीस. लग्न करून अजून वर्ष पण नाहीं झालं. तर बाबा येण्याचा इतका आनंद ?
हे बघ रमा तु या घरची सून आहेस. असं लहान मुलांसारखे वागणं शोभत नाही तुला."
उमाबाई जरा चिड चिड करत म्हणल्या. मग आपल्या कामाला निघून गेल्या.

स्वयंपाक करत करत रमा मनाशी बडबड करत होती.

" सासूबाई तुम्हाला काय समजणार ? का तुम्ही समजुन पण न समजुन घ्यायच ठरवलं आहे का ? पंचवीस वर्षे मी आई बाबांच्या सोबत राहत होते. मग नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडले ते बाहेरचं पडले. लग्न झालं. आता सहा महिन्यांनी बाबा पहिल्यांदा मला भेटायला येणारं आहेत. मग कौतुक नाही का वाटणार ? 

मान्य आहे मी या घरची सून आहे. पण म्हणून मी बाबांची सानुली नाही असं तर नाही ना ? मग त्यांच्या येण्याचा आनंद झाला. तर लहान मुलीसारखं खुश तर होणारच ना ? यात माझं काय चुकल ? "

पण तिच्या भावना समजुन घेणारं कोणीच नव्हत. मनातल्या गोष्टी मनात ठेवत ती काम करत होती. लग्नाला अजून वर्ष पण झालं नव्हते. त्यामुळें अजुन ती या घरात रुळली नव्हती. लोकांचे स्वभाव, विचासरणी याचा पुरेसा अंदाज नव्हता.

आठवडा भराने तिचे बाबा तिला भेटायला आले होते.

" बाबा इतकं सगळं आणण्याची काय गरज होती. लग्नात तुम्ही आधीच खूप केलं आहे." बाबांना पाणी देत ती म्हणाली.

" एकदम बरोबर बोलली रमा. भावजी इतकं सगळं आणायची काय गरज होती ? " उमा बाई म्हणल्या.

बोलताना त्यांची नजर समोरच्या सामानावर होती.समोरच्या टेबलवर काही बॉक्सेस भरले होते. सीताफळाची मोठी टोपली आणली होती.

" वहिनी तुम्ही रमाचं बोलणं मनावर घेऊ नका. लेकीच्या घरी रिकाम्या हाताने कसं यायचं ! काही परंपरा आपण मोठ्यांनी समजुन पार पाडायच्या असतात. " तिचे वडील म्हणाले.

" हो बरोबरच आहे." उमा बाई म्हणल्या.

थोडा वेळ लेकी सोबत बोलून मग ते निघून गेले. रमाने त्यांना राहण्याचा आग्रह केला, पण त्यांनी नाकारलं. त्यांचा नात्यातला भाऊ शहराच्या दुसऱ्या टोकाला रहात होता. आज ते त्यांच्या कडे जाणारं होते.

तिचे बाबा निघून गेल्यावर उमा बाई रमाला म्हणल्या,

" रमा तूझ्या वडीलांना देण्या घेण्याचं काही लक्षात नाही येत. त्यांनी बघ ना ही कोणती मिठाई आणली आहे. ही फळं पण बघ. किती छोटी आहेत. अजून पिकली पण नाहीत. या सीताफळांना काही रस तरी आहे का ?

ही असली सीताफळं या घरात कधी आणली पण नाहीत.

हे कोणत्या मिठाईच्या दुकानातून आणलं आहे. आपण नेहमी राजपुरोहितच्या स्वीट मार्ट मधुनच मिठाई आणतो. आता हि मिठाई या घरात कोण खाणार. सगळे पैसे बेकार मध्ये खर्च झाले."
उमा बाई रमाला म्हणल्या.

" आई , माझ्या बाबांना जे योग्य वाटलं ते त्यांनी आणलं. आता माझी आई नाही आहे. नाहीतर तिने बाबांना काहितरी सुचवलं असतं. देण्या घेण्या साठी काय योग्य आहे काय नाही ते."

उदास होऊन ती म्हणली. पण उमा बाईना तिच्या दुखलेल्या स्वराच काहीच पडलं नव्हत. त्यांना काहीच फरक पडला नव्हता. त्या त्यांची कॉफी पिण्यात रमल्या होत्या. समोर मोबाईल होताच.
त्यांनी 'त्या' पदार्था मधलं काहीही न घेता नुसती कॉफी घेतली. इतर वेळी त्यांना कॉफी सोबत काहीतरी कोरडा खाऊ खायला आवडायचा. आज समोरच्या बॉक्स मधली तिखट शंकरपारी देखील त्यांना नकोशी झाली होती.

दुसऱ्या दिवशी उमा बाई बाहेर गेल्या होत्या. रमाचे सासरे आणि नवरा दोघंही कामावर गेले होते. बाबांनी आणलेल्या वस्तू आता देखील स्वयंपाक घरात एका कोपऱ्यात ठेवल्या होत्या. त्यांना बघून रमाला सारखं सारखं कालचा दिवस आठवतं होता. सासु बाईंनी बाबांनी आणलेल्या सामानाला नावं ठेवलेली आठवत होती. बाबांचा अपमान तिच्या काळजात घाव घालत होता.

दुपारी कामाला मदतनीस मावशी येऊन गेल्या. अचानक तिला काहीतरी सुचलं. मग तिने रिक्षा बुक केली. बाहेर निघून गेली. जातांना घराची किल्ली शेजारच्या काकूंकडे कडे ठेवली. सासू बाईंना मेसेज पाठवला.

" अग रमा असं कोणी जात का ? किल्ली शेजारी ठेवून ? नुसता मेसेज करून सांगत का ? मी किल्ली बाजूच्या काकूंकडे ठेवली आहे. मी जरा जाऊन येते. कुठे जाते ते पण नाही सांगितलं ?" रमा बाई तिला जाब विचारत होत्या.

" आई ते एक महत्वाचं काम आठवलं म्हणून तेच करायला गेले होते." चेहऱ्यावर हसू खेळवत रमा म्हणाली.

" ठीक आहे. असु दे. चल आता जेवायला बसु. तू आपली पान वाढ. तो पर्यंत मी सीताफळ टोपलीतून बाहेर काढून ठेवते. संध्याकाळी सीताफळ बासुंदी करायची आहे." असं म्हणत त्या किचन मध्ये गेल्या. तर समोरच दृश्य बघून त्या गोंधळल्या.

" रमा अग इथली सीताफळाची टोपली कुठं आहे ? सीताफळ तू फ्रीज मध्ये ठेवली का ? "

टोपली मधली काही फळं खुप पिकली होती. अजून एखाद दुसरा दिवस बाहेर टोपलीत ठेवली तर खराब होण्याची शक्यता वाटतं होती. म्हणून कदाचित रमाने फळं फ्रीज मध्ये ठेवली असतील असं उमा बाईंना वाटलं. म्हणून त्या तिला विचारतात.