Login

तिचं अस्तित्व भाग १ जलद कथा मालिका

एका स्त्री ची कथा


तिचं अस्तीत्व भाग १

राघव आजकाल जरा गप्प गप्प असायचा. त्याच्या गप्प राहण्यामागचं कारण त्याची आई जाणून होती. महिनाच तर होतोय जेमतेम सविताला जाऊन. इतकी वर्षांचा संसार होता दोघांचा कसा विसरेल राघव सविताला एकदम?


मुलं तर त्यांच्या विश्वात रमली आहेत. मीही माझं मन रमवते आहे. कितीही वरून दाखवलं तरी मलाही सवितेची आठवण छळते.सून नव्हती माझी मुलगीच होती.


लग्नं होऊन सविता या घरात आली आणि खूप सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळाली आहे असं मला वाटलं. तिचं हसणं खूप आश्वासक होतं. माझ्या चेह-यावरून तिला कळायचं माझ्या मनात काय चाललं आहे.


मुलगी देणार नाही इतकी लक्ष द्यायची माझ्याकडे. कुठेही गेली अगदी माहेरी सुद्धा तरी एक दिवसाच्या वर राह्यची नाही. विचारातून बाहेर येत आईनी बाहेर डोकावून बघीतलं राघव झोपाळ्यावर बसला होता.


राघव झोपाळ्यावर झोके घेत बसला होता. त्याचा चहा थंड झाला होता. त्याची कुठेतरी तंद्री लागली होती.


"राघव तुझा चहा थंड झालाय.गरम करून आणू का?" आईच्या बोलण्यानी राघवाची तंद्री भंगली.

"आई असू दे थंड चहा घेईन.ये न तूही झोपाळ्यावर बस."राघव म्हणाला.


आईपण झोपाळ्यावर बसल्या. राघव अजूनही तंद्रीतच होता. म्हणाला

"आई सविताचं या सगळ्या गोष्टीत मन रमलं होतं. हळहळत होती सगळं सोडून जावं लागणार म्हणून."राघव बोलला


"खरं आहे. बाईचा जीव तिनी मांडलेल्या चूल बोळक्यातच अडकलेला असतो. एवढ्या मेहनतीने ऊत्साहाने तिनं सगळा रचलेला खेळ असा अर्धवट सोडून जाताना तिला जड गेलं असणार.पण नियतीपुढे कोणाचं चालतंय."आई


"आई अग झोपाळ्यावर बसू म्हणून एकदा तिने हट्ट केला. मी म्हटलं तुला गार वारा सहन होणार नाही.तर म्हणाली काही दिवसांनी या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे मी जाणार आहे.नका आज अडवू मला. सगळ्या झाडांचा जो मिश्र गंध येतो तो घ्यायचा आहे. आई तिच्या बोलण्यानी आलेला उमाळा महत्प्रयासानी मी दडवला होता." असं म्हणून राघव ढसाढसा रडू लागला.


त्याच्या पाठीवर थोपटत आई म्हणाल्या.

" रडू नकोस.सवितानं खूप धीरानी घेतलं. झालेल्या कॅन्सर सारख्या आजाराला खंबीरपणे तोंड दिलं. पण मुलांसाठी मात्र ती कासाविस झालीच असेल. तू सुद्धा खूप केलस तिचं. पण हळुहळू तुला या आठवणीतून बाहेर यावं लागेल. तुझ्याकडे बघीतल्यावर मुलं कोमेजतात. बोलत नाहीत पण मला त्यांचा चेहरा वाचून कळतं.


त्यांची आई तर नाही आता. पण त्यांचे बाबाही त्यांच्यापासून लांब चाललेत.असं नको व्हायला वेळीच राघव वर्तमानात ये. सविता आता नाही हे सत्य स्विकार. तुझ्या मनात जश्या तिच्या आठवणी आहेत तश्याच मुलांच्या मनात पण आहे.


मुलं दाखवत नाहीत. पण आई नाही याचं दुःख त्यांनाही आहे. त्यांना आईची आठवण येत नाही असं नाही. ते सुद्धा दुखावले आहेत. पण त्यांना वर्तमानातच जगायला हवं. त्यांचं आयुष्य ख-या अर्थानी अजून सुरूही झालेलं नाही. त्यांना आईच्या आठवणीनी खचून चालणार नाही. तुला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे.
ऐकतो आहेस नं मी काय म्हणतेय?"

राघव नुसताच आईकडे बघत राहिला.त्याचा निर्विकार चेहरा बघून आईचं मन गलबललं.
__________________________________

🎭 Series Post

View all