Login

तिचं जग (डॉ. किमया मुळावकर) भाग-अंतिम

कथा सासू सुनेच्या जगाची


अष्टपैलू लेखक महासंग्राम
दुसरी फेरी

तिचं जग ( डॉ. किमया मुळावकर ) - भाग अंतिम

प्रियाच्या गळ्यात पडून सुधाताई खूप रडल्या. बराच वेळाने त्या शांत झाल्या. दुसरे डॉक्टरही तिथे आले होते.

"आई शांत व्हा. बाबा ठीक आहेत. सिव्हिअर हार्ट अटॅक होता. आता आपण त्यांची दुर्बीणीने एक तपासणी करणार आहोत. त्याने हार्ट मध्ये ब्लॉक असतील ते काढून घेऊ किंवा ऑपरेशन करायचं असेल ते करू. हे डॉ. मंदार, हार्ट स्पेशालिस्ट आहेत. बाबांना हेच बघतील. काळजी करू नका, मी पण बघेलच." प्रियाने सुधाताईंना धीर दिला. डॉ. मंदारनेही सुधाताईंना सर्व परिस्थिती समजावली. पुढचे दोन दिवस शंकररावांसाठी धोक्याचेच होते. सुधाताई प्रियाच्या कोणत्याच गोष्टीला नकार देत नव्हत्या. प्रिया जो निर्णय घेत होती, त्यात त्या सहमती दर्शवत होत्या.

ठरल्याप्रमाणे शंकररावांची ट्रीटमेंट सुरू होती. सुधाताईंचे दोन दिवस मोठ्या कष्टाने संपले होते. शंकररावांच्या तब्येतीत अपेक्षेपेक्षाही खूप चांगली सुधारणा होत होती. सुधाताई मनोमन देवाचे आणि प्रियाचे आभार मानत होत्या. जवळपास एका आठवड्यानंतर शंकररावांना आय.सी.यु. मधून बाहेर स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलं. विदेशात शिकण्यासाठी गेलेला सुयशही शंकररावांच्या भेटीसाठी आला होता. 


सुधाताई शंकररावांना त्यांच्या हाताने भरवत होत्या. सुयशही तिथेच होता. प्रियासुद्धा हॉस्पिटलमधले कामं आटोपून शंकरावांना भेटायला आली होती. प्रियाला बघून सुधाताईंच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. शंकररावांना खाऊ घालून त्या बाजूच्या खुर्चीवर बसल्या. हातातल्या रुमालाने त्यांनी डोळ्यातलं पाणी अलगद टिपलं.


"आई, काय झालं? आठवडा झालाय बघतेय, सारखं डोळ्यात पाणी असतं तुमच्या. बाबांना आता कसलाच धोका नाहीये." प्रिया म्हणाली आणि सुधाताईंनी तिच्यासमोर हात जोडले.

"आई… अहो हे काय करताय?" प्रिया त्यांचा हात पकडत बोलली.

"माफ कर पोरी मला… तुला ओळखण्यात चुकले गं मी…" सुधाताईंना अजूनच रडू आलं.

"आई, अगं, असं काही नाहीये…" सुयश बोलत होता. सुधाताईंनी त्याला थांबवलं.

"सुयश… बोलू दे मला, अजून उशीर नको व्हायला… प्रिया, खरं सांगू आम्ही ना लहाणपणापासून हेच शिकत आलोय की चूल आणि मूल, घरदार हेच बाईचं जग असतं आणि तिने त्याच्या बाहेर कधी जाऊच नये. सासरी, माहेरी हेच वातावरण होतं. हेच चांगलंही वाटत होतं. आपल्या एवढुश्या जगाला सोडून या बाहेरच्या जगात काय सुरू आहे, हे बघायची तसदीसुद्धा घेतली नाही मी . मुलगी नाही ना मला, त्यामुळं एका मुलीच्या मनाचा विचारच केला नाही कधी… तू घरात आलीस आणि मी मात्र तुला माझ्या जगात ओढून ताणून बांधायचा प्रयत्न केला. कारण शिकवण हीच ना, स्त्रीचं जग म्हणजे तिचं घर! पण तू मात्र सगळं सांभाळून घेतलंस. आज जवळपास आठ दिवस झाले मी माझ्या डोळ्यांनी तुझं जग बघतेय आणि आता मला माझेच विचार थिटे वाटायला लागलेत… किती विश्वासाने रुग्णांचे नातेवाईक तुझ्याकडे रूग्ण घेऊन येतात आणि तू तेवढ्याच विश्वासाने, सच्चेपणाने सगळं सांभाळतेस… आई फक्त जन्म देते गं पण तू… तू तर सर्वांना पुनर्जन्म देतेस… आज सुयशचे बाबा मरणाच्या दारातून परत आलेत ते केवळ तुझ्यामुळेच… प्रिया… तू मात्र माझी स्त्रीच्या जगाची व्याख्याच बदलून टाकलीस. खूप त्रास दिलाय मी तुला, खरंतर माफी मागायचीही माझी लायकी नाहीये तरी जमलं तर मला नक्की माफ कर…" सुधाताई बोलता बोलता रडायला लागल्या.

प्रियाही त्यांच्या कुशीत शिरली. तिनेही अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

"सुयश… सासू सुनेचं गुळपीठ जमलं रे…! आता आपलं काही खरं नाही…" शंकरराव बोलले आणि दोघी रडत रडतच हसायला लागल्या.

"चला, या आनंदाच्या दिवसाचा क्षण कॅमेरात टिपूया… एक सेल्फी तर हवाच ना… स्माईल!" सुयशने मोबाईल फोनमधला कॅमेरा सुरु केला. सर्वजण हसत कॅमेराकडे बघत होते. प्रिया आणि सुधाताई, दोघींच्या डोळ्यांतले आनंदाश्रू कॅमेराने मात्र अलगद टिपले होते.


समाप्त!

फोटो- गुगलवरून साभार

©® डॉ. किमया मुळावकर.

🎭 Series Post

View all