Login

तिचं जग ( भाग एक )

प्रेम ही अती सुंदर गोष्ट आहे. प्रेमा ईतकं पवित्र जगात काहीच नाही. प्रेम हे शाश्वत आहे कारण ते शरीरावर नव्हे तर मनावर केलेलं असतं.

तिचं जग ( भाग एक )

विषय:तिचं आभाळ 


सकाळचं कोवळ ऊन तिच्या केसांवर, अंगावर पडलेलं होतं. घरासमोर असलेल्या बागेत तिच्या आवडत्या झाडाखाली, तिच्या आवडत्या खुर्चीवर बसून ती पानांमधून झिरपत तिच्या पर्यंत पोहोचलेल्या किरणांमध्ये असलेल्या धुळीच्या नाचऱ्या कणांना निरखून बघत होती. धूलिकण बघत राहणं ही तिची नेहमीची सवय. कसलं सळसळत चैतन्य भरलेलं असे सगळ्या आसमंतात. खारी इकडून तिकडून पळत असत. पक्षी किलबिल करत असत. मुंग्यांच्या रांगांत रांगा लगबगीने इकडे तिकडे धावपळ करत असत मध्येच कोणीतरी एखादा पक्षी लांब शिळ घालत असे आणि या गोंधळात जणू काही थोडे कमीच म्हणून तिचा आवडता टॉमी कोवळ्या उन्हामध्ये इकडं तिकडं लांबवर उड्या मारत जात असे. सशासारख्या टॉमी वरती तिचा खूप जीव होता .तो थोडासाही नजरेआड झाला की ती कासावीस होऊन जात असे. तिचं आणि त्याचे एक वेगळच गुपित होत.ती त्याला सगळ्या गोष्टी सांगायची आणि तो देखील सगळं समजल्या सारखं तिचं ऐकायचा.


तिचे वडील कामावर जाण्याची ती वाट बघत होती .अगदी नेहमीसारखं तिच्या घरचं वातावरण होतं. तिने अंदाज केल्याप्रमाणे थोड्याच वेळात तिचे वडील बाहेर आले. आता ते कामावर चालले होते. संध्याकाळपर्यंत ते घरी येणार नव्हते. ते नजर आड गेल्यानंतर तिने आपली कवितांची वही काढली आणि आपल्या मनातल्या उर्मी, भावना व्यक्त करणाऱ्या कविता ते त्यात लिहू लागली. हो ते नजरेआड झाल्यावरच कारण त्यांना तिच्या या गोष्टी आवडत नसत. मुळात म्हणजे तिचाच त्यांना खूप राग येत असे.

खरं म्हणजे या कविता लिहिण्याच्या छंदा पासून तिला आता कोणीच दूर करु शकणारं नव्हतं. तिच्या त्या विश्वाची ती साम्राज्ञी होती. जिथली प्रत्येक गोष्ट तिच्या मतानुसार घडत असे. तिची जशी ईच्छा असे तसे तिच्या कथा, कविता मधील पात्र वागत असत. याचा तिला खूप आनंद होई. एक कविता म्हणजे जणू काही आपले बाळच आहेत असं तिला वाटत असे.

पण आज का कुणास ठाऊक तिचं कविता करण्याकडे लक्ष होतं ना काही लिहिण्याकडे .ती सारखी वाट पाहत होती पोस्टमनची. कितीतरी वेळ गेला आणि अखेर तिच्या इच्छेनुसार पोस्टमन तिच्या दारात आला. अनेक पत्रांची चळत त्याने तिच्याकडे दिली. आजकाल ही पत्र म्हणजे जणू काही तिचा श्वासच झालेली होती. तिच्या कवितांची समीक्षण ,वाचकांची पत्र या गोष्टींनी तिला वेड लावलेल होत. घरातल्यांना कल्पनाही नव्हती इतक्या दूरवर तिच्या कविता पोहोचलेल्या होत्या .दूर देशातल्या रसिकांना देखील तिच्या कवितांनी वेड लावलेलं होतं.

पण ती शोधत होती नेहमीच्या त्या पत्राला . आपल्याला काय झाले आहे हे तिला कळेना. सगळ्या पत्रांमध्ये तिची नजर फक्त त्या वेगळ्या वाटणाऱ्या अक्षराकडे लागली होती. त्याच पत्राला ती शोधत होती .त्या पत्रातील अक्षरानेच नव्हे तर लिहिणाऱ्या रसिकाने तिला वेड लावलेलं होत. त्या न पाहिलेल्या रसिकाचं तिला इतका आकर्षण वाटायला लागलं होतं की तो कसा असेल .कसा दिसत असेल. कसा बोलत असेल .कसा वागत असेल . अशा त्याच्याबद्दल ती कल्पना करत असे आणि तिच्या नकळत त्याच प्रतिबिंब तिच्या कवितात उमटत असे.

कुठल्यातरी दूरदेशीच्या या रसिकाचं तिच्या कवितांवर अफाट प्रेम होतं . तिचं छापून आलेलं अक्षर आणि अक्षर तो वाचून काढत असे त्याच्यावर सुंदर अक्षरात समीक्षा लिहित असे. त्याच्या तिच्या कित्येक कविता त्याच्या तोंडपाठ होत्या. त्याच्या लिखाणा वरून तो देखील एक कवी हृदयाचा असावा असा तिचा अंदाज होता कारण त्याच्या लिहिण्यात घेण्यात एक लय होती .ताल होता. त्याचं साधं वाक्य देखील त्याला कविता वाटत असे हा आपला भास आहे का खरोखरच त्याचं लेखन अतिशय सुंदर आहे याबद्दल ती साशंक झालेली होती. तिच्या नकळत ती त्याच्या पत्राची वाट पाहत असे .पण अशी वाट पाहणं आणि त्याचं पत्र कोणाच्या नजरेस न पडणे ही गोष्ट चांगली नाही हे तिला माहीत होतं. पण आज तिचं मन तिच्या ताब्यात नव्हत. आपणास हे काय होत आहे हे तिला समजेना. आलेल्या पत्रांवरून तिने घाई घाईने नजर फिरवली. काही पत्र तिच्या वडिलांना आलेली होती. त्यात काही नोटीसा, काही बिल, काही विम्याची पत्र होती. अनेक पत्रांमधून तिची नजर हव्या त्या पत्रावर पडली. ते ओळखीच्या अक्षरात तिचा पत्ता लिहिलेलं, तिचं नावं लिहिलेल पत्र दिसताच तिची छाती धडधडू लागली. किती लांब वरुन ते पत्र तिला भेटायला आलेलं होत. त्या पत्राला न फोडता असच धरून बसावं असं तिला वाटलं. कारण त्या पत्राला त्याचा स्पर्श झालेला होता. ते पत्र हातात घेताच तिचा चेहरा लालबुंद झाला. मुळचीच गोरीपान असलेली ती अजूनच सुंदर दिसायला लागली. सगळ्या जगाला आपल हे गुपीत माहीत पडलेलं आहे. असं क्षणभर तिला वाटलं. त्या पाकीटाला तिने अलगद बाजूला ठेवलं.

तिने सावधपणं आजूबाजूचा कानोसा घेतला. तिचा लाडका टॉमी दुरवर खेळत होता. घरातले सगळे कामात दंग होते. कोणाचंच तिच्या कडे लक्ष नव्हत. तिने अलगद ते पत्र उघडलं आणि वाचता वाचता ती जागच्या जागी थरथरू लागली. तिचा श्वास जोराजोरात झाला. तिच्या कानामधून उष्ण वारा वाहतो आहे असं तिला वाटलं. आणि हृदयाची धडधड तर बाहेर ऐकू येत आहे की काय असं तिला वाटलं. पत्र वाचून झाल्यावर ती जागच्या जागी थरथरू लागली.

लेखक: दत्ता जोशी
( क्रमशः)

0

🎭 Series Post

View all