तिचा काय दोष भाग 3
©️®️शिल्पा सुतार
रत्नाताई आरतीकडे बघत होत्या. बघितलं कस बोलते. अजिबात जुमानत नाही. मला शिकवते.
आरती आत आली. ती चिडली होती.
" जाई बेटा माझ्या सोबत रहा. जयेश तिच्याकडे बघ."
" हो आई. " ती म्हणाली.
रत्नाताई जाईला त्रास देत होत्या. म्हणून आरती काळजीत होती. आज रात्री सचिनला सगळं सांगते.
सचिन आला. तो खूप खुश होता. पुढे आई, बाबां जवळ बसलेला होता. ते दोन तीन तास बोलत होते. तो पर्यंत आरतीने स्वयंपाक केला. मुलांना जेवायला दिलं.
" आई पाणी..." जयेश आवाज देत होता.
"जाई त्याला पाणी दे उठ." रत्नाताई ओरडल्या. जाई घाबरली ती जेवणा वरुन उठली. सचिन पटकन पाणी घ्यायला आला.
"बघितलं हे अस सुरू आहे अहो. आई नुसत्या जाईला ओरडत आहेत. ती लहान आहे तरी तिला काम देत आहेत." आरती म्हणाली.
सचिनने आरतीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. तो परत पुढे जावून बसला. त्यांच जेवण झालं. आरती आवरत होती.
"आरती सफरचंद आण."
"हो जरा पाच मिनिट थांबा." तिला राग आला होता. या लोकांची कश्याला ठेप ठेवा म्हणजे त्यांना मला आणि माझ्या मुलांना बोलायला जोर येईल का.
मूल आज आरतीच्या रूम मधे झोपले होते. सचिन खूप उशिराने आत आला.
"आरती झोपली नाहीस."
"अहो जाई नाराज आहे. आई दरवेळी प्रमाणे तिला खूप पाण्यात बघत आहेत. आल्यापासून तिला खूप बोलत आहेत."
" तिला काय समजत आरती. काहीतरी आपलं. थोड हक्काने बोललं तर काय झालं."
" हक्काने नाही. त्या तिला मुलगी आहे म्हणून त्रास देतात."
" काहीही आपलं आरती. " सचिन रागाने म्हणाला.
" जाई किती हुशार आहे. तुम्हाला माहिती आहे. तिला लगेच असा भेदभाव समजतो. असा दुजाभाव केला की कोणालाही त्रास होईल. तुम्ही काय मलाच बोलता आहात? तुम्हालाच हे लोक आमच्याशी कसे वागतात ते दिसत नाही का?" आरती चिडली होती.
"आई बाबा फक्त आठ दिवसांसाठी आले आहेत. मला कटकट नकोय आरती. वर्षभर तू एकटी असते ना. थोड सहन कर." सचिन ओरडला.
"मला तर त्या त्रास देतातच. मी कधीच काही म्हणत नाही. तुम्हाला ही सांगत नाही. पण आता अति होतय सचिन. त्या मुलगा, मुलगी भेद करतात. ते मला चालणार नाही. जाई कश्यात कमी आहे? तीला का त्रास देतात. तीच वय तरी किती. का म्हणून अन्याय सहन करायचा. जावू दे जावू दे करूनच त्या जास्त करायला लागल्या आहेत. "
सचिन नुसत ऐकत होता.
"आज त्या काय म्हणाल्या माहिती का? जाई सगळा खाऊ खाते. जयेशला राहू देत नाही म्हणून तो लहान दिसतो ती मोठी. याला काय अर्थ आहे. आपण आपल्या घरा पासून सुरुवात केली पाहिजे. अश्या वागण्याला विरोध केला पाहिजे. तरच बदल होईल. "
" त्यांचे विचार जूने आहेत. तिने सगळीकडे असचं बघितल आहे. "
"पण आई अस का करतात. विचार जुने असल्यापेक्षा चुकीचे आहेत. जरा स्वतः मधे बदल करा म्हणा. त्या ही स्वतः एक स्त्री आहेत. त्यांना समजून सांगा सचिन . नाहीतर मी माझ्या पद्धतीने सांगेल. जाई खूप लहान आहे तिच्या मनावर परिणाम होतो आहे. मला ते चालणार नाही. मी यावेळी स्टँड घेईल. मग काही का होत नाही. दोघ मुलांना मी पोसू शकते. तितकी हुशार बोल्ड मी आहे. " तिने धमकी दिली.
" ठीक आहे शांत हो. मी बघतो. " सचिन म्हणाला.
" मी सांगायची गरज का पडली? तुम्हाला मुलांची बाजू घेता येत नाही का? आई बाबा आल्यावर तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करतात. "
" आता अस होणार नाही. जाई, जयेश मला किती प्रिय आहेत तुला माहिती आहे. "
आरती रागाने झोपली. सगळीकडे स्ट्रगल आहे. बायकांना भांडल्या शिवाय काही मिळत नाही. घरातच त्रास सुरू होतो.