'ती' चा लढा भाग १०

सोनाच देवाशी लग्न लागणार हे ऐकून रेवा अस्वस्थ होते. हे लग्न होऊ नये म्हणून ती समजवण्याचा प्रयत्न करते. तो किती यशस्वी होईल जाणून घ्या.
दीर्घ कथा
‘ती’चा लढा
भाग १०.
@ धनश्री भावसार बगाडे

"सर, एक महत्वाची बातमी पाठवते आहे. विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे आज जर डिजिटलसाठी लावता आली तर फार बरं होईल."

असं म्हणत रेवाने सर्व हकीकत साठे सरांना सांगितली आणि या कामसंदर्भात तिथे अजून दोन दिवस थांबण्याची परवानगी देखील घेतली.

तिची बातमी डिजिटलला छापून आली तशी त्याविषयी चर्चा सुरू झाली. 'सोनाचं देवाशी लगीन' ही बातमी तेवढ्याच वेगात व्हायरल पण झाली. २१व्या शतकातही लोक अजून अशा प्रथांना बळी पडतात याची वेगवेगळ्या स्तरातून हळहळ व्यक्त होत होती.

बातमी उत्तम असल्याने रेवा ऑफिसला नसली तरी तिचं कौतुक सुरू होतं. विषय अर्थात निखिलपर्यंत पोहोचलाच होता. ती आपल्याला न सांगता निघून गेली म्हणून त्याला राग आला होताच. त्यात

'हिला नसतं धाडस का करायचं असतं?'

असा विचार त्या बातमीमुळे त्याच्या मनात घोळत होता.

"तिथं ही एकटी आहे. उगाच गावात राहून तिथल्या प्रथांना विरोध करायचा म्हणजे 'आ बैल मुझे मार' करण्यासारखंच नाही का?"

तो रेवासाठी काळजीत पडला होता. तर दुसरीकडे ऑफिसमध्ये सुरू असलेल्या तिच्या कौतुकाने तो थोडा वरमला पण होता.

'आपण हिला नको म्हणत असलो तरी हिचे विषय सामाजिक दृष्टीने फार महत्वाचे आहेत.'

याची त्याला मनोमन जाणीवही झाली होती. पण तरीही तो तिच्या काळजीने व्याकुळ झाला होता.

इकडे फडात मात्र अजून ही बातमी पोहचलेली नव्हती. रेवाची मात्र सोनासाठी घालमेल सुरू होती.

'काय करावे? हे लग्न होण्यापासून कसे थांबवावे?' हे तिला समजत नव्हतं.

तिची अस्वस्थता बघून फडाच्या मुख्य ताई तिच्याजवळ आल्या.

"ताई, तुमी शिकली सवरलेली लोकं अशा गोष्टी मानत न्हाई त्ये ठाव हाय आमास्नी. म्हनून तर तुमाले कळू नए असं वाटत व्हतं. पर कोंबडं कितीबी झाकलं तरीबी दिस उजाडायचा र्‍हातू व्हय?"

"तुमची काळजी आन म्हननं दोनी बी समजतय आमास्नी. पर हितली ही अडानी लोकं आपल्या रिती परंपरांना लई कवटाळून असतात बगा. आपन त्यास्नी कितीबी समजावलं तरीबी त्ये न्हाई ऐकायचे बगा."

ताई रेवाला समजावून सांगत होत्या. मग उठून तमाशाच्या तयारीला लागल्या. आज सोनाही जरा विचारांतच हरवलेली होती. सगळ्या मुली तयार होऊन तमाशासाठी बाहेर पडल्या. पण आज रेवाचं चित्त काही थार्‍यावर नव्हतं. ती तमाशा बघायला तंबूच्या बाहेर पडलीच नाही. तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं.

त्या रात्री तिला नीट झोपही लागली नाही. सकाळी डोळे थकलेलेच होते. ती तशीच उठून सरपंचबाईंकडे आवरायला गेली. आदल्या दिवशीची डिजिटल बातमी गावात पोहचली नसली तरी पेपरमध्ये छापून आलेली बातमी मात्र विनायकराव पाटलांपर्यंत पोहचली होती.

"व्हय ओ पत्रकार ताई, ही ‘सोनाचं लगीन’ची बातमी तुमीच दिली नव्हं?"

बातमी बायलाईन सहित छापून आल्याने त्यांनी खात्री करून घेत विचारलं. त्यावर आपल्या तंद्रितून बाहेर येत तिने मानेनेच हो म्हटलं.

"न्हाई बातमी चांगली हाय पर आदी तुमी आमच्यासंग बोलल्या असत्या तर बरं झालं असतं."

रेवाने प्रश्नार्थक नजरेने विचारलं

"ते का?"

"न्हाई कसं हाय ना, त्यो फड आता आमच्या गावात हाय. तर प्रकरण आपून हितच मिटवायचा प्रयत्न केला असता. आता तुमी बातमी दिली म्हंजी गावभर झालं नव्हं का?"

त्यांच्या या वाक्यावर रेवा झटकन म्हणाली,

"आजूनही प्रकरण मिटवता येईल. खरंतर ते मिटावं म्हणूनच तर बातमी दिली आहे."

"तुम्ही काही मदत करू शकाल का?"

तिने आशेने त्यांच्याकडे बघितलं.

"हम्म, त्ये लोक काही ऐकतील असं वाटत न्हाई. कसं देवधर्माचा ईषय असतू ना ह्यो. तरी बी आम्ही बोलू त्यांच्या संग. आमच्या शब्दाला बी मान हाये अजून गावात."

पाटील जरा अंग काढत पण तसं जाणवू न देता बोलत होते. ते रेवाला जाणवलं. तिने त्यांच्याकडून फार काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही हे ओळखलं होतं.

ती तिचं आवरून परत फडात गेली. या लोकांना कसं समजावावं तिला समजत नव्हतं. तिला वाटलं सोनाला आपलं म्हणणं पटलं तर तीच यासाठी विरोध करेल. शिवाय जर,

रेवाला एक युक्ती सुचली.

'राक्या आणि सोनाला सामोरासमोर उभं करून विचारूया. उत्तर काहीही आलं तरी सोनाचं भलं होऊ शकेल.'

या विचाराने तिने सोना आणि राक्या दोघांनाही एका बाजूला बोलावलं.

"तुमचं प्रेम आहे एकमेकांवर?"

तिच्या या प्रश्नावर सोना अगदीच चटकन मान हलवत हो म्हणाली. राक्या थोडा अडखळला. थोडा विचार करत बळबळ हो म्हटल्यासारखी त्याने मान हलवली.

"लग्न करशील सोनाशी?"

रेवाने त्याला थेटच विचारलं. तसा तो पूर्णच गोंधळला. त्याला काय बोलावं सुचेना. घाम फुटू लागला. शहरातून शिकलेली आणि ते पण पत्रकार बाई आलीये म्हणून नाही म्हटलं तरी तिचा धाक वाटत होता.

तिने परत तोच प्रश्न केला त्याला. तेवढ्यात जयाने सोनाला बोलावलं. त्याला वाटलं

'चला सुटलो आपण.'

पण रेवा काही त्याला सोडेना. तीनेच ओरडून जयाला सांगितलं,

"ती थोड्यावेळाने येईल गं."

आणि परत राक्याकडे वळली. सोना आशेने त्याच्याकडे बघत होती. राक्या घाबरला आणि एकदम बोलला,

"उद्या हिचं देवाशी लगीन व्हनार. म्हंजी गाव जेवनच की. कोन कोनत्या पंगतीस बशीन काय सांगता येतू. अशा बाईशी कोन लगीन करनार आन पायावर धोंडा मारून घेनार?"

त्याच्या या वाक्यावर सोनाला फार मोठा धक्का बसला. ती मटकन खालीच बसली. तर रेवाला त्याच्या थोबाडीत दोन ठेवून द्याव्याशा वाटल्या. पण तिने स्वतःला सावरलं. राक्याने घाबरून तिथून पळ काढला.

रेवाने सोनाला फक्त जवळ घेतलं. काहीही न बोलता तिला मनसोक्त रडू दिलं. नंतर शांत होत सोना तिथून उठून गेली. राक्याचं हे बोलणं तिच्या जिव्हारी लागलं होतं. काल रेवा तिला जे समजावू पाहत होती ते तिला समजलं होतं.

दुपारी जेवणं झाल्यावर फडात अचानक लगबग वाढली. सोनाची आत्या तिच्या लग्नाच्या तयारीला लागली होती. त्यासाठी बाकी पोरींकडून मदत करवून घेत होती. हे बघून रेवा अजूनच अस्वस्थ झाली.

तिची अस्वस्थता सोनाच्या लक्षात आली. ती रेवाजवळ आली.

"ताई, तुमी का अस्वस्थ हायसा आनी काय समजावता हाय त्ये समदं येतंय म्हाया ध्यानात. लोकांचं खरं रूप समजावं म्हनून तुमी राक्याला बी म्हायासमोर उभं केलं. तुमचे लई उपकार झाले बगा म्हायावर. म्हाये डोले उघडलात तुमी."

तिच्या या कृतज्ञतेच्या बोलण्याने रेवा अजूनच गोंधळली आणि अस्वस्थ झाली. ती काहीतरी बोलणार तेवढ्यात सोनाच परत बोलू लागली,

"ताई, तुमी म्हायासाटी अस्वस्थ नगा होऊ. तुमी म्हंताय तसं फुडं जे व्हनार हाय त्ये भयानक असंल बी पर म्या आता त्ये म्हायं नसीब म्हनून सिकारायचं ठरिवलय. ज्याच्यावर येवडा जीव वोवळून टाकीत व्हते त्यो बी असला निगाला. ह्ये चूक असलं तरीबी म्हायात येवडी ताकत न्हाई की, म्या ह्ये थांबवू शकेन. म्या नसीबावर सोडलं हाय समदं. तवा तुमीबी तरास नगा करून घेऊ."

ती बोलत होती. दोघींच्याही डोळ्यांच्या कडांना अश्रुंच वजन पेलवे ना अन ते वाहू लागले. दोघींनी एकमेकींना मिठी मारली. नंतर सोनाने रेवाला दूर करत तिथून निघून गेली.

पुन्हा संध्याकाळी रोजच्या प्रमाणे तमाशाची तयारी सुरू झाली. रेवा चिंतेतच होती. अस्वस्थ होऊन आपल्या जागेवर फेर्‍या मारत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला.

"हॅलो"

रेवाला फोनवर समोरून मिळालेल्या उत्तराने तिचा सगळा नुरंच बदलला.
---------

क्रमशः
दीर्घ कथा ‘ती’चा लढा
भाग १०
धनश्री भावसार-बगाडे
रेवाला कोणाचा फोन आला असेल? तिला हे लग्न थांबवण्यात यश मिळेल का? हे सगळं ती एकटीने कसं करू शकेल? जाणून घ्या पुढील भागात.

🎭 Series Post

View all