'ती' चा लढा भाग ११

देवाशी सोनाच्या लग्नाची तयारी आणि ते थांबवण्यासाठी रेवाची तगमग. कोण कोण येतं रेवाच्या मदतीला, जाणून घ्या.
दीर्घ कथा
‘ती’चा लढा
भाग ११
@ धनश्री भावसार बगाडे

आजची सगळ्यांचीच सकाळ जरा लवकर झाली. एकंदरीतच फडातलं आजचं वातावरण लगबगीचं होतं.

सोनाची आत्या सोडली तर कोणाच्याही चेहर्‍यावर फारसा उत्साह, आनंद दिसत नव्हता. दुपारी बारा वाजेच्या सुमारास सोनाला जवळच्या एका डोंगरावर नेऊन तिथं असलेल्या ग्राम देवतेच्या मंदिरात तिचं देवाशी लग्न लावलं जाणार होतं. पण त्या आधीचे सर्व विधी इथे फडाच्या आवारातच होणार होते, त्यासाठी ही लगबग सुरू होती.

रेवाने दिलेली बातमी आता फडापर्यंत पोहचली होती. त्यामुळे आतापर्यंत तिच्या दीमतीला उभे असलेले लोक तिच्यावर थोडे नाराजच होते. त्यांच्या बोलण्यात ती नाराजी नसली तरी कृतीतून मात्र रेवाल ती जाणवत होती.

आज नेहमीसारखं कोणी तिच्याशी बोलत नव्हतं उलट तिला या सगळ्यापासून कसं लांब ठेवता येईल असाच प्रयत्न जाणवत होता. त्यामुळे रेवाला इथे अधिकच एकटं पडल्यासारखं वाटत होतं. त्यात सुरू असलेल्या सर्व कार्यक्रमांनी तिला हतबल वाटू लागलं होतं.

‘यावेळी निखिल इथे असता सोबत तर किती बरं झालं असतं!’

असा विचार तिच्या मनात डोकावून गेला. पण ती त्याला न सांगता आल्याचं तिला आठवलं आणि त्या विचाराने पुन्हा तिचं मन खट्टू झालं.

सकाळचे साधारण साडे दहा वाजले असतील. तिला पुन्हा एक फोन आला. साठे सर आणि ऑफिसमधले वरिष्ठ सहकारी अशी एक टिम तिथे पोहचली होती. त्यांनी तिला सरपंचाच्या घरी बोलावलं होतं. तिला थोडा दिलासा मिळाला.

“काल रात्री सरांनी फोन केल्याप्रमाणे ते वेळेत आले तर आहेत खरे. आता यातून काहीतरी चांगलं निष्पन्न निघवं.”

अशी मनोमन देवाकडे प्रार्थना करत ती सरपंचांच्या घरी पोहचली. साठे सर त्या पाटलांना या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी समजावत होते.

“हे बघा, गावच्या सरपंच या बाईच आहेत आणि इथेच असं एका मुलीला चुकीच्या प्रथेला बळी पडू देणे तुम्हाला शोभणारं नाही साहेब.”

साठे सर पाटलांना समजावत होते.

“तुमी म्हनता त्ये बरोबर हाय पर ह्यो रितीभातीचा प्रश्न हाय साहेब. लोक न्हाई ऐकत कोनाला बी. तरी बी तुमी म्हंताय म्हनून एकदा अजून करू प्रयत्न.”

विनायकराव पाटील बोलत होते. तेवढ्यात रेवा तिथे पोहचली. तिला समोर वरिष्ठांची टिम बघून हायसं वाटलं. आपल्या एका बातमीसाठी सगळं ऑफिस आपल्या पाठीशी उभं राहिलं हे बघून तिला अजूनच छान वाटलं.

ती येताच सगळ्यांनी तिच्याकडे बघून आणि तिनेही सगळ्यांना बघून गोड स्मित केलं. त्यांच्या डोळ्यात कौतुक तर हिच्या डोळ्यात कृतज्ञतेचा भाव होता.

“या या पत्रकार ताई. तुमी तर कमालच केली की. लई गाजतीए तुमची बातमी.”

पाटील मुद्दाम सर्वांसमोर बोलत होते. यावर ती फक्त कसनुसं हसली. लगेच साठे सर पुढे होत म्हणाले,

“यालाच तर म्हणतात खरी पत्रकारिता. जी बातमी समाजात बदल घडवून आणू शकते तिच्या पाठीशी उभं राहणं हाच तर पत्रकाराचा धर्म आहे.”

त्यांच्या बोलण्याने रेवाचा त्यांच्या विषयीचा आदर द्विगुणीत झाला.

तेवढ्यात सरपंच बाईंनी सगळ्यांना चहा नाश्ता आणला. सगळ्यांचं चहापाणी झाल्यावर आता मात्र रेवा घाई करू लागली.

“सर, अकरा वाजलेत. तिकडे ते लोक सोनाला डोंगरावर नेण्याआधीच आपण काहीतरी हालचाली करायला हव्यात.”

तसे सगळेच उठले. त्यांच्यासोबत पाटील आणि सरपंच बाई पण निघाल्या.

इकडे फडात आल्यावर तंबू बाहेर बरीच नवी लोकं दिसत होती. हिरवं लुगडं नेसलेल्या कपाळभर भंडारा आणि त्यावर मोठा कुंकवाचा टिळा, हातात परडी त्यात देवीची मूर्ती घेऊन बायका मोठमोठ्याने देवीची गाणी म्हणत होत्या. भंडारा उधळत होत्या.

तिकडे सोनाला झिरमिर्‍या लावलेल्या मुंडावळ्या बांधल्या होत्या. पिवळी साडी नेसवून डोक्याला आणि कंबरेला कडूलिंबाची पानं लावून एका पाटावर बसवण्यात आलं होतं. आणि तिच्या डोक्यावरुन हळदीचं पाणी ओतलं जात होतं. हे सगळं डोळे मिटून ती कोवळी सोना निर्विकार चेहर्‍याने सोसत होती.

ते बघून रेवा पुन्हा भाऊक झाली. ती साठे सरांना घेऊन सोनाच्या आत्याकडे गेली. पण त्या हे सर्व विधी पार पाडण्यात व्यस्त असल्याने भेटणं टाळत होत्या. यातच सुमारे साडे अकरा पावणे बारा वाजले.

वेळ हातातून निसटतो आहे म्हणून रेवाची घालमेल वाढली होती. ती हतबलतेने सोनाकडे बघत असते. तेवढ्यात तिची आणि सोनाची नजरानजर झाली. सोनाची ती उदास नजर ‘आपण हरलो का?’ असं विचारत असल्यासारखी तिला भासली.

त्यामुळे व्याकुळ होत ती मागे वळली तर तिला अजून एक धक्का बसला. समोरून निखिल येत असल्याचं तिला दिसलं.

‘नाही. आपल्याला त्याची आठवण येतेय त्यामुळे भास होत असेल.’

अशी स्वतःची समजूत तिने काढली आणि परत वर बघितलं तर खरंच समोरून निखिल येत होता. आता मात्र हा भास नाही याची तिला खात्री पटली. पण

‘हा इथे कसा? याचा राग शांत झाला असावा आतापर्यंत म्हणजे मिळवलं.’

या विचाराने तिच्या चेहर्‍यावरची चिंतेची रेघ गडद झाली होती. त्याच्यासोबत अजूनही काही लोक होते.

“ही रेवा.”

त्याच्या सोबतच्या बाईंना ओळख करून देत तो म्हणाला.

“नमस्कार. मी प्रतिभा.”

रेवानेही त्यांना हाताने नमस्कार करत प्रश्नार्थक नजरेने निखिलकडे बघितलं. तशा त्या बोलू लागल्या.

“आम्हाला निखिल सरांचा फोन आला तसं आम्ही तडक निघालो. आम्हाला इथे पोहचायला फार उशीर तर नाही ना झाला?”

‘हे काय सुरूये?’ रेवाला काही कळत नव्हतं. तिच्या चेहर्‍यावरचा गोंधळ ओळखून त्या बाईच म्हणाल्या,

“तुमची या लग्नाविषयीची बातमी वाचली. आमची समाजसेवी संथा आहे. अशा चुकीच्या चालीरीती, रूढी परंपरांना आम्ही अडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातील पीडितांचं पुनर्वसनही करतो. त्याच संदर्भात इथे आलो आहोत.”

“एका जाहिराती संदर्भात निखिल सरांशी आमची ओळख झाली होती. तुमची बातमी वाचून इथे यायचे तर होतच पण सरांच्या मदतीने वेळेत पोहचणं शक्य झालं.”

त्या सांगत होत्या आणि रेवाच्या डोळ्यात आनंद दाटून आला होता. तिने निखिलकडे बघितलं त्याने डोळ्यानेच

“डोन्ट वरी, मी आहे.”

असं खुणावलं आणि तिला शरीरात दहा हत्तींचं बळ आल्यासारखं वाटलं.

“या फडाचे मालक कुठे आहेत? आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे.”

त्या बाईंनी विचारलं.

“मालक नाहीत. पण मुख्य ताई आहेत.”

म्हणत रेवा मुख्य ताईंना शोधायला आत गेली होती. पण तिथे ताई नव्हत्या. त्या आधीच काहीतरी कामाने तंबू बाहेरच आहेत असं तिला एकीने सांगितलं. तशी ती पण घाईनेच बाहेर आली.

मुख्य ताई आणि समाजसेविका बाई यांची भेट झाल्याचं रेवाने बघितलं म्हणून ती त्यांच्या जवळ आली. पण ताईंच्या कपाळावर दरदरून फुटलेला घाम बघून ती अजूनच गोंधळली. असं काय बोलणं झालं यांच्यात?
------------------

दीर्घ कथा
‘ती’चा लढा
अंतिम भाग
धनश्री भावसार बगाडे

“नमस्कार”

ताई म्हणाल्या.

“नमस्कार मी समाजसेविका आहे. तुम्हाला हे असं देवाशी लग्न लावून देता येणार नाही. या चुकीच्या प्रथा आहेत. अंधश्रद्धा आहे.”

“व्हय ताई, तुमी म्हंतात त्ये बराबर हाये. पर ह्ये आमी न्हाई तिच्या खानदानातले लोक करत्यात. त्यांच्या रीतीरिवाजात आता आमी कसे मदी पडनार?”

ताई सांगत होत्या.

“पण हे सगळं तुमच्या फडात होत आहे. हे चुकीचं आहे. तुम्ही त्याला परवानगी द्यायला नको होती.”

त्या बाई म्हणाल्या त्यावर ताई एकदम हसत म्हणाल्या,

“आमी न्हाई म्हाननारे कोन? आन आमच्या न्हाई म्हनन्याने थांबनार व्हतं व्हय ह्ये?”

ताईंच्या या बोलण्याने त्या बाई जरा चिडल्या.

“हे बघा ताई तुम्ही जर हे लग्न थांबवलं नाही तर आम्हाला नाईलाजने पोलिसांना बोलवावं लागेल. मग पोलिस तुम्हालाही जबाबदार ठरवून अटक करू शकतात.”

हे ऐकून ताई घाबरल्या. त्यांना घाम फुटला. तशी रेवालाही जरा भीती वाटली. आता काय होणार? या विचाराने तिने निखिलकडे बघितलं. तो तिच्या शेजारीच उभा होता. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला आधार दिला.


“मी प्रयत्न करते” म्हणत ताई आत गेल्या.

तसा थोड्याचवेळात तिकडून एकच गोंधळ ऐकू येऊ लागला.

“आमच्या प्रथेला ह्ये कोन इरोध करनारे? देवाच्या कार्यात इघ्नं आनलं तर देवाचा कोप हुईल.”

अशी तिथे आलेल्यापैकी एक बाई जोरजोरात ओरडू लागली. ते ऐकून रेवा, निखिल, सर्व समाजसेवक सगळेच तिकडे पळाले. मुख्य ताईंनी या समाजसेवकांचा निरोप आत देताच हे लग्न लावून देण्यासाठी आलेल्या बायका आणि त्यांच्या सोबत बॉडीगार्ड म्हणून आलेले धटिंगण पुरुष सगळेच गोंधळ घालू लागले. आरेरावी करत होते.

समाजसेविका बाई पुढे झाल्या. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जाते की काय म्हणून रेवा घाबरली.

समाजसेवक, ऑफिसमधून आलेली पत्रकारांची टिम, रेवा सगळेच हे करणं कसं चुकीचं आहे हे समजावून सांगत होते. पण आमच्यातला एक माणूस तुम्ही कसा हिरावून घेत आहात, अशा आविर्भावात ते लोक यांच्याशी भांडत होते. एकीने तर चक्क सोनाचा हात जोरात खेचत तिला आपल्या भागात ओढून घेतलं.

सोना या सगळ्याच प्रकारात जणू सुन्न, बधीर झाली होती. जणू ती या कशातच नव्हती. तिची ही अवस्था रेवाला बघवली नाही. ती जोरात ओरडली,

“ये, सोनाला हात लावायचा नाही.”

तिचा हा अवतार सगळ्यांनाच घाबरवणारा होता. तिने सोनाला बाजूला घेतलं. तसे ते धटिंगण अंगावर धावून आले. त्यातून सगळ्यांनी सोनाला आणि रेवाला बाजूला केलं. या सगळ्या अनपेक्षित गोष्टींनी तिला काही सुचेना तेवढ्यात तिथे पोलीसही पोहोचले.

पोलिसांना बघून सगळेच घाबरले होते. पण लग्नाला विरोध करणार्‍यांच्या जरा जीवात जीव आला.

‘पण पोलिस इथे कसे?’ असा प्रश्न सगळ्यांनाच होता.

तेवढ्यात निखिल तिला म्हणाला,

“घाबरू नको. मी आधीच पोलिसांना बोलावलं होतं. अशी वेळ येऊ शकेल याचा अंदाज होता मला.”

त्याच्या या बोलण्याने रेवाला त्याला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालं होतं, पण ही वेळ वेगळी होती.

पोलिस आल्यावर मात्र त्यांची आरेरावी थांबली. पोलिसांनी सगळी परिस्थिती सावरत त्याचा ताबा घेतला.

समाजसेविकेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. अंधश्रध्दा पसरवणं कायद्याने गुन्हा आहे. म्हणत त्यांनी आत्या आणि मुख्य ताईंना ताब्यात घेतलं. तसे बाकीचे अजूनच वरमले. पण एक बाई पुढे आली.

“साहेब ही रीत हाये आमची. आन आमी काय कोनाला जबरदस्ती न्हाई करत. तिच्या खानदनाची रीत हाय म्हनून तर ती तयार हाय नव्हं. तिच्या मर्जीनं व्हातय समदं.”

असं म्हटल्यावर पोलिसांचा मोर्चा सोनाकडे वळला. सोना आधीच शून्यात हरवलेली होती. ती काय उत्तर देणार या विचाराने रेवा चिंतेत पडली.

‘ही हो म्हणाली तर मग सगळंच मुसळ केरात जाणार.’

या विचाराने रेवा अस्वस्थ झाली. ती सोनाला हलवून म्हणत होती,

“सोना, तुलाही हे सगळं मान्य नाही ना? सांग पोलिसांना”

रेवाच्या तिला जोरात हलवल्याने ती जरा भानावर आली.

“अं, काय झालं?”

ती तंद्रीतच विचारत होती. मग रेवानेच पोलिसांना सगळी हकीकत सांगितली. तिला पूर्ण माहिती न देता कसं लग्नाला तयार केलं आणि जेंव्हा तिला वास्तव समजलं तेंव्हा तिला ते मान्य नसतानाही कोणी ऐकणार नाही म्हणून ती हे करत आहे.

हे सगळं ऐकून पोलिसांना हकीकत समजली असली तरी हे सोनाच्या तोंडून येणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

तेवढ्यात सोनाला चक्कर आली आणि ती खाली पडणार तोवर रेवाने तिला पकडलं.

जयाने धावत जाऊन तिच्यासाठी साखर पाणी आणलं त्यामुळे तिला थोडं बरं वाटलं.

“सर, सोना अजून अल्पवयीन आहे. त्यामुळे तिच्यावर दबाव आणून हे लग्न होऊच शकतं ना?”

रेवाचं हे म्हणणं पोलिसांना पटलं. सोनालाही थोडं बरं वाटू लागलं होतं. तशी तीच म्हणाली,

“न्हाई मले देवदाशी न्हाई व्हायचं.”

तिचं एवढच म्हणणं पुरेसं होतं. पोलिसांनी आधीच ताई आणि आत्याला ताब्यात घेतलं होतं.

“पर साएब तुमी कोनाला पकडू नगा. ताई आन आत्यासीवाय कोनी न्हाई मले.”

सोना विनंती करत होती. तशा समाजसेविका बाई पुढे आल्या,

“तू आमच्यासोबत चल.”

त्यावर ती एकदम घाबरून म्हणाली

“न्हाई. म्या हितच र्‍हानार. ह्यो फडच म्हायं जग हाय.”

“अगं तू इथे राहिलीस तर हे लोक परत तुझं देवाशी लग्न लावायचा प्रयत्न करू शकतील. आमच्या सोबत आलीस तर आम्ही तुला स्वतःच्या पायावर उभं रहायला मदत करू.”

त्या समाजसेविका तिला समजावत होत्या. पण ती काही तयार होत नाही म्हटल्यावर जया तिच्या जवळ आली,

“लई भाग्यवान हाईस तू बग, तुला संदी मिळतीया. असं समद्यास्नी न्हाई मिळत. देवदासी होऊन जिणं आन फडात नाचणारीन र्‍हानं यात लोक लई फरक करत न्हाई ह्ये तुले बी म्हाईत हाय. ऐक आमचं जा तू त्या बाईंसंग. तूह्या आविष्याच भलं हुईल बघ.”

रेवाला बघून सोना पुन्हा भावूक झाली.

“ताई, यास्नी सांगा ना ताई आन आत्याला सोडाया.”

“हो, तू म्हणतेस तर पोलिस सोडतीलही त्यांना. पण मग परत त्यांनी तुझं लग्न लावायचा प्रयत्न केला तर?”

रेवा तिला समजावत होती.

“त्यापेक्षा तूच इथून बाहेर पड. म्हणजे बघ तुझं आयुष्य नक्कीच सुधारेल.”

सोनाचा रेवावर विश्वास होता हे आतापर्यंत फडातल्या सगळ्यांनीच ओळखलं होतं. तिच्या सांगण्यावरून ही निघून जाऊ नये म्हणून फडाच्या ताई म्हणाल्या,

“न्हाई, हिचं परत देवासंग लगीन न्हाई लावनार कोनी. म्या तसं हुच देनार न्हाई आता.”

तिच्या जवळ जात त्या म्हणल्या,

“तू घाबरू नको पोरी. कूटं बी जायची गरज न्हाय. तू हितंच र्‍हाऊन मोटी कलावंतीन व्हय. म्या शिकवतू तुले.”

तेवढ्यात पाटील पण पुढे झाले,

“म्या सोता हिचं एखाद्या चांगल्या पोराशी लाऊन देतो.”

हे वाक्य ऐकताच एवढ्या वेळ लपून सगळं बघणारा राक्या अचानक समोर आला.

“म्या करीन सोनाशी लगीन.”

असं एकदम ओरडत सोनासमोर येऊन उभा राहिला.

त्याला बघून सोनाच्या डोक्यात तिडीक गेली. तिच्या कपाळावर आठ्या आल्या.

“कोन तू? तुह्या काय संबंध?”

तिने चिडून विचारलं. तसे सगळेच दचकले. कालपर्यंत काहीही बोलू न शकणारी मुलगी आज हे काय बोलतेय म्हणून सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघत होते.

“असं काय करती? आपलं पिरेम हाय नव्हं?”

आवाजात आर्जव आणत राक्या म्हणाला. तशी ती अजूनच चिडली.

“व्हयं? तुला आठीवतय? मंग तवा का पळून गेलता?”

तिने संतापत विचारलं. तो जरा एक पाऊल पुढे होत

“म्या घाबीरलो व्हतो”

त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच ती चवताळत म्हणाली,

“वा रे वा! म्हंजी तुला पाईजे तवा तू येऊन म्हाया हात धरणार आन न्हाईतर अंगावर पाल पडल्यागत झिडकरून निघून जानार. आन म्या काय हितच तुह्यी वाट बगत बसू व्हय रं?”

“पिरेम हाये म्हने. तू म्हायासंग कसं बी वागनार, कसं बी बोलनार, म्हायावर हात बी उगारनार आन म्हंतू पिरेम हाये. पिरेमाच्या नावावर पाईजे तवा हक जतवनार. म्हाया मनाचा कदी ईचार केला हुता का तवा?”

सोना एवढी फडाफडा बोलू शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. सगळेच तिच्याकडे आवाक होऊन बघत होते.

“तुमा पुरुषांची जातच मेली अशी हाये. तुमास्नी बाई फकस्त वापराया पाईजे. तुमी उठ म्हटलं की उठनारी आन बस म्हटलं की बसनारी. आन तिने जरा तिचा हक मागितला की गांड फाटती तुमची. मंग तिला टाचेखाली कसं दाबून ठिवता यील त्येच बगता.”

“बाई तुमास्नी फकस्त तुमच्या तालावर नाचवाया हवी असतीया. आता बस. मले आता कोनाच्या बी तालावर नाचायचं न्हाय. समद्यांनी ऐकून ठिवा आता म्हाये निर्नय म्या घेनार”

तिच्या बोलण्यातला आवेग, आत्मविश्वासाने बोलणं यामुळे सगळेच आवासून तिच्याकडे बघत होते. ती सरळ रेवाकडे वळली.

“ताई, म्या तुमास्नी म्हंले व्हते नव्हं मले साळा शिकाची लई इच्छा व्हती. पर परिस्थितीनं न्हाई झालं. आता काई होऊ शकेल? म्या शिकू शकेन साळा? माझी म्या चार पैकं कमवून शिकीन. तुमी मदत करान म्हाई?”

तिच्या या बोलण्याने रेवाच्या मनातला आनंद डोळ्यांतून वाहू लागला आणि तिने सोनाला घट्ट मिठी मारली.

समाप्त.

Disclaimer – ही सत्य घटनेवर आधारीत कथा असून यात काही ठिकाणी पात्र आणि घटनांमध्ये थोडासा काल्पनिक बदल केला आहे.


------------------

क्रमशः
‘ती’चा लढा
भाग ११
धनश्री भावसार बगाडे
आता थांबेल का सोनाचं लग्न? निखिल काय करेल? मुख्य ताई का घाबरल्या? नक्की काय होईल रेवाच्या आणि सोनाच्या या लढ्याचं? जाणून घ्या पुढील अंतिम भागात.


🎭 Series Post

View all