'ती' चा लढा भाग २

फडातल्या जीवनात तिथल्या लोकांना सोसावे लागणारे बरेच काही
दीर्घ कथा
‘ती’चा लढा
भाग २.
@ धनश्री भावसार बगाडे

पहाटे पावणेपाच, पाच वाजता या फडात रात्र सुरू झाली. उगवतीच्या सूर्याबरोबर इथे सारेच दमलेले जीव ढाराढूर झोपलेले होते. रेवाला मात्र पहाटे झोपमोड झाल्याने परत काही शांत झोप लागली नाही. तिची आपली चुळबुळ सुरू होती. सगळे कधी उठतात या प्रतिक्षेत ती होती.

ऊरूस एका मोठ्या मैदानावर भरवण्यात आला होता. जे गावापासून थोड्याच अंतरावर होतं. गाव आणि मैदान यांच्यामध्ये गावाच्या वेशीच्या आत खंडोबाचं मंदिर होतं. काडगावकरांच्या या फडाचा तंबू मैदानाच्या दुसर्‍या टोकाला शेवटी ठोकण्यात आला होता. त्यामुळे तंबूच्या मागच्या बाजूला लांबच लांब पसरलेली काळी माती, अधेमध्ये डोलणारे हिरवेगार शेत आणि वर अथांग पसरलेलं आकाश.

लोळत पडून कंटाळा आला म्हणून शेवटी रेवा अंथरुणावरून उठली आणि तंबू बाहेर आली. समोरच हे रमणीय दृश्य बघून ती एवढी हरखून गेली की, तिथल्या मातीतच ती मांडी घालून तो निसर्ग डोळ्यांत साठवत बसली.

‘आपण शहरात या सगळ्यापासून किती दुरावतो. मोकळी जमीन तर सोडाच मोकळं आकाशही बघायला मिळत नाही. उगवतीच्या या छटा या आधी कधी बघितल्याएत आठवतही नाही. अगदी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरचं घरसुद्धा हे सुख देत नाही.’

असे तिचे विचार सुरू असतानाच सोना मागून आली.

“ताई हितं काय करताय? झोप न्हाई लागली का?” तिच्या प्रश्नानं रेवा भानावर आली.

“अं... हां म्हणजे झोपले थोड्यावेळ. सहज बाहेर आले तर हे दृश्य बघून इथेच रेंगाळले. किती सुंदर आहे सगळंच. इथली लोकं किती भाग्यवान आहेत, असं त्यांना रोज अनुभवता येतं.”

रेवा अजूनही त्याच विश्वात होती. तेवढ्यात सोना फटकन म्हणाली,

“ह्या, त्यात काय सुंदर, नुसती दगड, माती अन मोकळं आकाश. रोजचच तर हाय.”

“तोंड धूतलं का तुमी, या हिकडं पानी देते.”

तशी रेवाही उठली आणि ब्रश घ्यायला तंबूत गेली.

आता तंबूत बर्‍यापैकी हालचाल सुरू झाली होती. सकाळचे साधारण दहा वाजले असतील. पाच तासांच्या झोपेनंतर सारेच लोक नव्या दमाने दिवसाची सुरुवात करायला उठले होते.

रेवा ब्रश, पेस्ट घेऊन सोनाकडे गेली. सोनाने तिला पाणी दिलं आणि स्वतः कडूलिंबाची काडी चावत शेजारी उभी राहिली.

“ताई तुमच्या बुरूशचा रंग भारी हाय. गुलाबी रंग म्हायापन आवडता हाय.”

सोनाच्या बोलण्याने तिच्या हाताकडे रेवाचं लक्ष गेलं. काल लागलेल्या बाटल्यांनी हिचा हात सुजला होता. पण काहीही न झाल्यासारखी अगदी सहजच ती वावरत होती. याविषयी रेवा विचारणार तेवढ्यात तिथे कोणीतरी आलं म्हणून तिनेही विषय टळला. तोंडातला फेस थुंकतच तिने सोनाला विचारलं,

“तू ब्रश नाही वापरत?”

तिनेही तेवढ्याच सहजपणे नकार दिला.

‘का?’ असा प्रश्न रेवाच्या तोंडावर आला पण आजूबाजूची वर्दळ बघून तिने तो गिळला. पण हे सारंच तिच्या डोक्यात घोळत होतं. शेवटी पत्रकार ना ती! प्रश्न विचारल्याशिवाय राहणार कशी? पण सध्या थांबली आणि तोंड धुतलं.

तेवढ्या मागून जया आली,

“ये सोना आम्ही नदीवर जातूय, तू येणार हाय का? चलच आता न्हाईतर परत नंतर मागे लागशील चला म्हनून.”

“ताई, तुमी बी येनार का?”

रेवलाही विचारणा झाली.

तेवढ्यात मागून मुख्य ताई ओरडल्या,

“ये पोरींनो आवरा की गं. काय बाई सारखंच सांगाव लागतय.”

जवळ येत परत त्याच म्हणल्या,

“ताई तुमी नका जाऊ ह्यांच्यासंग. नदीवर, झुडपात तुमाला न्हाई जमायचं. म्या सरपंच बाईंशी बोललेय तुमी त्यांच्या घरला जावा न्हानीधुनी कराया. आमचं काय, आमाला सवय हाय रोजची.”

असं म्हणताच सर्व मुली फिदीफिदी हसत निघाल्या.

“ये पोरींनो नुसत्या हसत बसू नगा, आवरा पटापटा. अन जाताजाता ताईंनापण सरपंचाचं घर दावा.”

असं फर्मान सोडलं गेलं.

रेवाला खरतर त्या मुलींसोबतच जाण्याची इच्छा होती, पण हिम्मत नव्हती. म्हणून तिने गुपचूप सरपंचबाईंच्या घरचा पर्याय स्वीकारला. शिवाय मोबाईलला रेंज तिथेच मिळत होती. फडात आल्यापासून तिने घरी फोन केलेला नव्हता. शिवाय निखिललाही याविषयी,

तिने विचार जाणून बुजून थांबवला आणि आपली हँडबॅग घेऊन त्या मुलींसोबत निघाली.

या फडात ८ मागे नाचणार्‍या मुली, एक मुख्य ताई ज्या फड मालकांच्या पत्नी होत्या, त्यांचं वय साधारण ४० ते ४५ वर्षे असेल. शिवाय दोन माध्यमवयीन बायका ज्या कधी बोर्डावर मागे नाचणार्‍यांमध्ये तर कधी फडात इतर कोणत्याही कामात मदत करत. यातच एक सोनाची आत्या होती. या शिवाय वाद्य वाजवणारी ४-५ पुरुष मंडळी होती आणि जेवण बनवणार्‍या जथ्यात दोन महिला आणि तीन पुरुष होते. असं एवढा सर्व लवाजमा घेऊन हा तमाशा फड महाराष्ट्रभर तमाशा सादर करत; तर एक-दोन वेळा परदेशातही तमाशा सादर केल्याचे त्या फड मालकांनी मोठ्या उत्साहात सांगितलं होतं.

या नाचणार्‍या सर्वच मुली साधारण टीनएज म्हणजे १४ ते १८ या वयोगटातल्या होत्या. त्यामुळे रेवाला त्यांच्याविषयी प्रचंड उत्सुकता आणि कणव होती. तशा त्या सगळ्याच बुजर्‍या होत्या. पटकन बोलत नव्हत्या. त्यात सोना जरा मोकळी बोलत असल्याने दोघींची हळूहळू मैत्री होत होती. सरपंचाच्या घरी जायचं म्हणजे वेस ओलांडून गावात जावं लागणार होतं. या मुलींना मंदिराजवळून नदीच्या दिशेने जायचं होतं.

“म्या ताईंना सरपंचबाईंच्या घरी सोडून मंग येते नदीवर. तुमी व्हा फुडं.”

असं सोनाने सांगितल्यावर सगळ्या मुली नदीच्या दिशेने आणि त्या दोघी गावाच्या दिशेने निघाल्या. हीच संधी साधून सोनाची चौकशी करूया असं रेवाला वाटलं.

“खूप दुखतायेत का गं तुझे हात पाय?” रेवाने हळूच विचारलं.

“हं... नाई मंजी सवय हाय आमाला. सुरूवातीला लय दुखायचं पन नंतर दुखन्याची पन हळूहळू झाली सवय. रोजच्याच दुखन्याला किती कवटाळनार?”

ती अगदी सहज बोलत होती.

“रोजचं म्हणजे? लोकं असे रोजंच बाटल्या फेकून मारतात?”

रेवाने आश्चर्याने विचारलं

“हां... मंजी रोज बाटल्याच असतील असं नाय. पन जे हाताला येईल त्ये मारत्यात म्येले. लागलं की दुखनारच ना ताई. मंग येतं टचकन डोळ्यात पानी.”

“काल तुमी व्हता म्हणून मले फार वरडा न्हाई पडला.”

एक छानसं स्मित करत रेवाकडे बघत ती म्हणाली. त्यात एक अनामिक कृतज्ञता होती.

“म्हणजे तुम्हाला सारखा ओरडा बसतो?”

“मंग काय, कदीकदी तर”

रेवाच्या प्रश्नावर सहज उत्तर देताना ती एकदम थांबली आणि आपण हे बोलायला नको लक्षात येऊन कचकन जीभ चावली.

तिचा ‘तर’ मात्र रेवाच्या डोक्यात फिरत राहिला. याचा भुंगा तिचा पिछा सोडेना. असं काय काय सहन करावं लागत असेल यांना?
------------------------------------------------
क्रमशः
दीर्घ कथा ‘ती’चा लढा – २
धनश्री भावसार बगाडे
नेमकं काय म्हणायचं असेल सोनाला? अजून किती अन काय सहन करत असतील या मुली? रेवाला हे सगळं जाणून घेण्यात यश मिळेल का? तिला त्यांची मदत करता येईल का? जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचा.

🎭 Series Post

View all