'ती'चा लढा भाग ३

तमाशात नाचणाऱ्या कोवळ्या जिवांचं निरागस जिणं.
दीर्घ कथा
‘ती’चा लढा
भाग ३.
@ धनश्री भावसार बगाडे

अजून रेवा आणि सोनामध्ये एवढी मैत्री नव्हती की रेवा तिला काही खोदून विचारू शकेल. म्हणून अजून थोडा वेळ घेणंच तिला योग्य वाटलं. मग तिनेच विषय बदलला.

“तू दात घासायला ब्रश का नाही वापरत? ती कडू काडी कशी काय चावली जाते?”

जरा तोंड वाकडं करत रेवाने विचारलं. तिच्या चेहर्‍यावरचे भाव बघून सोनाला एकदम हसूच आलं.

“होतं ओ ताई सवयीनं. आनी आमाला कुटं परवडतोय बुरूश नी फिरूश. आमच्यासाटी आपली फुकटातली काडीच जिंदाबाद. ५० रूपड्यात काय काय करनार?”

असं म्हणत आपले हात झोक्यात हलवत ती चालत होती.

“म्हणजे दिवसाला ५० रुपये मिळतात का तुम्हाला?”

“व्हय. पन त्येबी महिन्याच्या शेवटाला एकदम सगळे. तवा रक्कम मोटी दिसते पर घरला बी धाडावे लागतात ना. मंग न्हाई पुरत.”

सोना सांगत होती.

“घर कुठेय तुझं?”

“लई लाम हाय. त्ये सोलापूरच्या फुडं कर्नाटकच्या जवळ हाय. शेमगेवाडी. लई वरीस झालेत गावी जावून.”

मध्येच स्वतःत हरवल्यासारखी ती सांगत होती.

“तुझे आई-वडील असतात का तिथे?”

“आई न्हाई मले. म्हाया लहानपनीच गेली त्यी. बा अस्तुया तिकडं. लोकाच्या शेतात राबतो अन दारू ढोसून पडतो म्हने.”

भावूक होत शिणलेल्या आवाजात ती बोलली.

रेवाला हे उत्तर फार अनपेक्षीत नसलं तरी तिच्या संवेदनशील मनाला हळव करणारं नक्कीच होतं.

“ताई, हे बगा आलं सरपंचबाईंच घर. परत यायला सापडेल नव्हं रस्ता?”

सोनाच्या या प्रश्नावर मानेनेच होकार देत रेवाने तेंव्हा पुरता सोनाचा निरोप घेतला.

सरपंचबाई दरातच उभ्या होत्या. गावातल्या इतर कोणत्याही घरांदाज पण सामान्य गृहिणीप्रमाणेच. साधीशीच पण काठपदराची साडी, खांद्यावर पदर, गळ्यात जाड सोन्याची चेन असलेलं भारदस्त मंगळसूत्र, हातात सोन्याच्या पाटल्या अन हिरव्या काचेच्या डझनभर बांगड्या असं ते रूप मनात भरत होतं. चेहर्‍यावर हलकसं स्मित करत त्यांनी आदराने रेवाला आत बोलावलं.

सरपंचाचा दरारा त्या घरात शिरल्यावर जाणवला. पण तो त्या बाईंचा नाही तर त्यांच्या पतीचा होता. पांढरा शुभ्र शर्ट आणि पायजमा घालून विनायकराव पाटील सोफ्यावर विराजमान होते. गळ्यात सोन्याची चेन, हातात कडं, बोटांमध्ये अंगठ्या आणि हातात टीव्हीचा रिमोट घेऊन बातम्या बघत होते.

रेवा घरात जाताच त्यांनी टीव्ही बंद केला आणि उठून नमस्कार करत

“या या पत्रकार ताई.”

असं स्वागत केलं. त्यावर हसून तिनेही नमस्कार म्हटलं.

“तुम्ही बघा ना. बंद कशाला केलात?”

असं ओशाळून रेवा म्हणाली. खरंतर प्रातःविधी, आंघोळ करायला असं कोणाच्या घरी जायला तिला अवघडल्यासारखंच वाटत होतं.

“आवो असं कसं. घरी आलेल्या पावण्यांचं स्वागत करण्याची रीत असती ती. काडगावकर बाईंनी सांगितलं हाय आमाला आदिच. आमच्या गावची जत्रा बघाया पुन्यातून पत्रकार येणार म्हटल्यावर स्वागत करनं आमचं कर्तव्य हायती.”

“तुमी संकोच नका करू. आमच्या सौभाग्यवतींना सांगा काय हवं नको ते. आवो, ताईंच्या जरा चा, नाश्त्याचं बघा, काय.”

असं फर्मान त्यांनी सरपंचबाईंना सोडलं आणि पुन्हा टीव्ही सुरू केला. रेवाही आवरायला बाईंसोबत आत गेली.

साधारण साडे आकाराच्या आसपास रेवा आणि सर्व मुलीही फडाच्या तंबूत परत आलेल्या होत्या. या मुलींची आपापसात काहीतरी कुजबूज सुरू होती. कोणाला तरी शिव्या घालणे कार्यक्रम सुरू होता. मुख्य ताईंना कळू नये म्हणून काहीतरी आवरायचा आविर्भाव आणत कुजबूज सुरू होती. रेवाचं सगळं लक्ष त्यांच्याकडेच होतं. ती हळूच सोनाच्या बाजूला जाऊन उभी राहिली.

“रानडुकरं मेली! पोरगी दिसली की ह्यांची गांड खाजवायला लागते.”

राखी त्रागा करत होती. तिचे शब्द ऐकून रेवाला भोवळ येते की काय असं वाटलं. पण लगेच सावरली. नदीवर काहीतरी घडलंय हे तिला कळलं.

तेवढ्यात ती जवळ उभी आहे हे लक्षात आल्याने मुलींनी चर्चा थांबवली. हे ओळखून तिनेही तिथून काढता पाय घेतला. थोडावेळ गेला नाहीतर सोना आणि जया तिच्याकडे आल्या.

“ताई, चला नां, तुमाला जत्रा फिरवून आनतो.”

“अरे व्वा्! चालेल. पण ताईंना चालेल का?”

“तुमी इचरा की त्यास्नी.”

या उत्तरातून रेवाने ओळखलं की जत्रा बघण्यासाठी त्यांनी हिचं निमित्त केलं होतं. त्यांची ही ट्रिक तिला फारच गोड वाटली. शेवटी यापण लहानच आहेत की, त्यांनाही फिरावसं वाटूच शकतं. असा विचार करत तिने सरळ आपला मोर्चा मुख्य ताईंकडे वळवला.

ताई कपड्यांच्या घड्या घालत बसल्या होत्या.

“ताई, मला जरा जत्रेत फिरून यायचं होतं. पहिल्यांदाच बघतेय ना. म्हटलं थोडं फिरून यावं. आता काही खास नाहीये ना इथे?”

“न्हाई. जावा तुमी. आता सर्व पांगापंगच हाय.”

“मी नवीन आहे ना इथे, तर म्हटलं या मुलींना बरोबर घेऊन जावं. चालेल ना? तुमची काही हरकत नाही ना?”

सोना आणि जया तिथे जवळच उभ्या होत्या.

“हम्म ठिके. जरा जपून जावा. पोरींनो ताईंना नीट न्या अन लवकर परत या, काय?” असा जरा नाराजीनेच त्यांनी होकार दिला. पण डोळ्यांनी मुलींना त्या दरडवून काहीतरी खुणावत होत्या.

तशा मुली पण खुशीत पण जरा घाबरतच तिथून निघाल्या. दोघींनीपण साड्या नेसल्या होत्या.

एवढ्याशा या १५-१६ वर्षांच्या पोरी पण साडी नेसून मोठ्या दिसत होत्या.

‘साडीत मुली लगेच किती मोठ्या दिसतात, नाही.’

हे घरातल्या थोरामोठ्यांचं टिपिकल वाक्य रेवाला आठवलं. त्यावर ती मनातच हसली आणि पर्स उचलून मुलींबरोबर तंबू बाहेर पडली.

दुपारची वेळ असल्याने जत्रेत तशी फारशी गर्दी नव्हती. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे एका मोठ्या पंडॉल खाली सर्वप्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते. त्याच्या पलीकडे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे, झुले होते.

पंडालमध्ये शिरताच कुठून जिलेबीचा सुगंध तर कुठून समोसा, भजी, वडे तळण्याचा खमंग सुवास येत होता. इथे ताजा सेंद्रिय गूळ, ज्वारी, बाजारीसारखे धान्यदेखील विक्रीला होते. काही स्टॉलवर फळंही विक्रीला होती. हे फळ विक्रेतेच फ्रूटप्लेट, ज्यूस पण विकत होते. त्याच्याच थोड्याअंतरावर टिकल्या, बांगड्या, कानातले, नाकातले, गळ्यातले असे बायका-मुलींना आवडणार्‍या वस्तू, दागिन्यांचे लहान लहान स्टॉल होते.

गरमागरम ताज्या तळल्या जाणार्‍या जिलेबीच्या सुगंधाने सोनाचे लक्ष वेधले.

“ताई चला, जिलेबी खाऊया.”

“हो चालेल, चला.”

तशा त्या तिघी जिलेबीच्या स्टॉलजवळ पोहचल्या. वर कनात टाकून जसा पंडाल बांधण्यात आला होता, तशीच प्लास्टीकची कनात जमिनीवर पण घालण्यात आली होती. त्यावर बसूनच सगळे खात होते. वर्तमानपत्राच्या कागदात बांधून दिलेली जिलेबीपुडी घेऊन तिथेच जरा बाजूला या तिघी पण बसल्या.

जया आणि सोना दोघीही खुशीत दिसत होत्या. त्यांनी एकमेकींना प्रेमाने जिलेबीचा घास खाऊ घातला. हे लोभस दृश्य रेवा बघत होती. न राहवून तिने आपल्या फोनमध्ये हा क्षण अचूक टिपला. जिलेबी खाऊन झाल्यावर रेवा पैसे द्यायला उठली.

“न्हाई ताई, तुमी थांबा. आमी देतो पैसे.”

लगेच जया म्हणाली.

“अगं नको, मी देते पैसे.”

तसं रेवाही म्हणाली.

“न्हाई तुमी न्हाई द्यायचे पैसे. तुमी पावन्या हायती.”

असं म्हणत सोनाने तिला मागे खेचलं आणि पैसे दिले.

एवढ्या लहान वयात असलेली ही समज बघून रेवा हरखून गेली.

‘असं प्रेम फक्त गावकडेच अनुभवायला मिळतं. रोजच्या आवश्यक गोष्टींसाठीही दहा वेळा विचार करावा लागतो यांना, पण मला किती प्रेमानं खाऊ घातलं यांनी. फार कौतुक वाटतं.’

असा विचार करत ती बाजूला झाली.

“चला आपण त्या वस्तूंच्या स्टॉलकडे जाऊया. बघू तर काय काय आहे?”

रेवाने असं म्हणताच जया आणि सोनाने एकमेकींकडे बघितले.

“तुमी या फिरून, आमी थांबतो”, असं म्हणत नकार दिला.

त्यांच्या नजरेतली मेख ओळखत रेवानेही फार आग्रह केला नाही. ती फिरून आली. त्या तिथेच गप्पा मारत बसल्या होत्या. काहीशा काळजीत पण खुश होत्या.

“आल्या फिरून ताई? निघूया का आता?” जयाने विचारलं.

“हो आले फिरून. मस्त आहे जत्रा. छान वाटतंय इथे. थोड्यावेळ थांबूया ना.”

ती जरा आग्रहानेच म्हणाली. तशा दोघींनी मानेनेच होकार दिला.

“काय गं मागाशी फडात तुम्ही काय बोलत होतात? कोणाला एवढ्या शिव्या घालत होतात?”

शेवटी रेवाने विषय काढलाच. खरंतर याचसाठी तिने थांबवून घेतलं होतं.

तशा दोघींनीही चमकून एकमेकींकडे बघितलं. सोना काही बोलणार तेवढ्यात जयाने तिचा हात दाबत थांबवलं.

“काई न्हाई ओ ताई. नेहमीचंच.” जया विषय टाळत म्हणाली.

“काही नाही कसं? त्यावेळी ताई तिथंच होत्या म्हणून मी पण काही बोलले नाही. पण आता सांगा पाहू. ती राखी किती चिडली होती. काय झालं असं?”

तिने जरा दटावतच विचारलं.

सोनाने जयाकडे बघत डोळ्यांनीच तिला आश्वस्त करत संमती घेतली.

“तसं काई न्हाई ताई. नेहमीचंच हाये ते. ती राखी ना जरा चीडकीच हाय. तिला लई लवकर राग येतू. तुमी नगा लक्ष देऊ.”

सोनाची ही सारवासारव बघून जया जरा शांत झाली. पण रेवाचं काही समाधान झालं नाही.

“अगं सांगा ना. असं काय झालं? तुम्ही म्हणताय तसं काही हलक्यात घेण्याएवढी साधी गोष्ट नव्हती हे तेंव्हाच कळलं होतं मला. म्हणून आग्रहाने विचारतेय. तिकडे नदीवर काही तरी घडलंय ना? तुम्ही सांगा नाहीतर ताईंनाच विचारते.”

तिच्या या धमकीने दोघीही घाबरल्या.

“आता कसं सांगाव तुमास्नी? सांगते म्या. पर तुमी ताईस्नी काई बोलू नगा. न्हाईतर आमची अडचण व्हईल.”

असं सोना म्हणाली खरं. पण दोघींच्याही चेहर्‍यावर भीती आणि काळजी दिसत होती.

त्यांच्या कपाळावर चक्क घामाचे थेंब जमल्याचं रेवाच्या नजरेने टिपलं होतं. हे सगळं बघून तिच्या डोळ्यात काळजी दाटून आली. नकळतच अघटीत तर घडलं नसेल ना? अशी शंका येऊन धडकी भरली. मनात काळजीनं आणि डोक्यात शंकांनी थैमान घालायला सुरुवात केली, नक्की काय घडलं असेल नदीवर?
---------------

क्रमशः
दीर्घ कथा ‘ती’चा लढा
भाग ३
धनश्री भावसार-बगाडे
नेमकं काय घडलं असेल? रेवाला सत्य समजेल का? एवढ्या का घाबरल्या या मुली? रेवाच्या डोक्यात नेमक्या शंका का येताएत? जाणून घ्या पुढील भागात.

🎭 Series Post

View all