'ती' चा लढा भाग ४

तमाशाच्या बोर्डावर फक्त बाई नाचत नाही तर ती एक कलावंतीण असते हे समाजाला कधी समजणार?
दीर्घ कथा
‘ती’चा लढा
भाग ४.
@ धनश्री भावसार बगाडे

सोना आणि जया आता बोलतील या आशेने रेवा त्यांच्याकडे बघत होती. त्या दोघींना कसं सांगावं हे कळत नव्हतं, मुळात सांगावं का? अशा विचारात त्या दोघी एकमेकींकडे बघत होत्या. पण रेवाच्या आग्रहापुढे त्यांचा नाईलाज झाला.

“ताई तुमी खरंच आमच्या ताईस्नी काई सांगणार न्हाई ना?”

जयाने परत खात्री करून घेत विचारलं.

“तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला अडचणीत नाही येऊ देणार मी. उलट झालीच तर मदतच करेन. म्हणून तर विचारतेय.”

रेवा त्यांना आश्वस्त करत म्हणाली.

तशी सोना सांगू लागली,

“तुमास्नी सोडून म्या नदीकडं निघाले, तवा वेसी जवळच्या मंदीराफुडं काही पोरं बसली व्हती. या सर्व तिथून थोड्याशाच फुडं व्हत्या. म्या तिकडून जात व्हते तवा ती पोरं जोरजोरात हसत यांच्याकडं बघत व्हते. म्या आपलं दुर्लक्ष केलं. खाली मान घालून चालत व्हते. तसा एक जन म्हणाला”,

“जानेमन, जरा आमच्याकडं बी बघ की.”

हे सांगताना सोनाच्या चेहर्‍यावर त्रासिक भाव होते. तसे रेवाच्याही चेहर्‍यावरचे भाव हे वाक्य ऐकताना बदलले.

“म्या धावतच या पोरींस्नी जाऊन मिळाले. ती पोरं तवा तिथंच बसली व्हती. आमी थोडं फुडं आलो तवा ही पोरं आमच्या मागं मागं येताय असं दिसलं.”

ती पुढे सांगत होती.

“पिंकीचा माथा खनकला आन ती काहीतरी बोलणार, तवा म्या तिला अडवलं. कशाला उगी असल्या पोरांच्या तोंडी लागा. काई राडाबिडा झाला तर परत आमास्नीच तरास व्हनार.”

जया सांगू लागली.

“तसा आमी फाष्ट चालू लागलो. नंतर ती पोरं बी गायब झाली. आमाला वाटलं गेली असत्याल. पर न्हाई.”

जया बोलता बोलता थांबली.

“आमी आंघोळ उरकून कपडे बदलत हुतू. राखीचं आवरलं म्हनून ती बाकीची अवराआवरी करत व्हती. तवाच एकानं तिचा हात धरला अन वढू लागला. ती वरडली तशा आमी सगळ्याच धावत आलो.”

सोना सांगत होती.

“तिच्या कमरेत हात घालून तो रांडीचा तिचा जबरदस्ती मुका”,

म्हणतच जया थांबली. आपण रेवासमोर घाण शिवी वापरली म्हणून ती ओशाळली होती.

पण तिच्या भावनेचा आवेग आणि राग रेवा समजू शकत होती. म्हणून तिनेही फार काही प्रतिक्रिया न देता त्यांचं ऐकत राहिली.

“आमी जाऊन त्याला हटवलं. त्याला एक दोन चपला बी दिल्या ठिऊन. आमास्नी चिडलेलं बघून बाकीचे मागच्या मागं पळाले.”

सोनाने जयाचं वाक्य पूर्ण करत सांगितलं.

“ताई, आमी बी मानूस हाओत ना. बोर्डावर नाचतो म्हनून काय आमास्नी भावना न्हाईत का? आमची काई इज्जत न्हाई?”

जयाच्या डोळ्यात पाणी तरळलं.

“आमी परत येताना ती पोरं दबा धरूनच बसली व्हती. पहिलं तर बारीक बारीक दगडं मारत व्हती. ती बी जोरात लागत्यात, पर आमी लक्ष न्हाई दिलं. खाली मान घालून चालत व्हतो.”

“पर त्या पोरला चपली पडल्या त्यो, त्याने तर चांगला मुठी येवडा दगड राखीच्या बाजूनं भिरकावला. त्याचा नेम चुकला अन बिचारी थोडक्यात वाचली.”

हे सांगताना सोनाच्या डोळ्यात राग आणि पाणी असे संमिश्र भाव होते. रेवा त्यांची सर्व कहाणी शांतपणे ऐकून घेत होती. मनातून तिलाही राग येत होता पण चेहर्‍यावर तसं ती जाणूनबुजून दिसू देत नव्हती.

“ताई आमी कलाकार हाओत. आमची कला इकून पोटाला च्यार पैसे कमवतो. चूक हाय का ती आमची?”

जया भाऊक होऊन बोलत होती. तिचं बोलणं प्रश्नार्थक असलं तरी तिला उत्तराची नाही तर कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं अशा सहानुभूतीची अपेक्षा होती.

सध्याचा प्रसंग राखीसोबत घडलेला असला तरी थोड्याफार फरकाने या सगळ्याच अशा प्रसंगांना सामोर्‍या गेलेल्या होत्या आणि जात असतात. त्यामुळे घटना एकीसोबत घडलेली असली तरी वेदना सगळ्याच समजू आणि अनुभवू शकत होत्या.

“ताई त्या मेल्यांनी रस्त्यात काचेचे तुकडे बी टाकलेले व्हते. दोघींच्या पायाला लागलं बी.”

सोनाने सांगितलं तसं आता रेवाला आपल्या भावना दाबणं कठीण झाल्या. ती काळजीनेच त्यांना म्हणाली,

“अगं मग एवढं सगळं तुम्ही गप्प राहून का सहन करताय? खरंतर हे तुम्ही ताईंना सांगायला हवं.”

तशा त्या दोघी पुन्हा घाबरल्या.

“ताई तुमी आमच्या ताईस्नी सांगू नगा. उलट आमीच काईतरी चूक केली आसन असं म्हणत आमालाच मार खावा लागेन.”

जयाचं हे वाक्य पूर्ण होत नाही तोच सोना म्हणाली,

“व्हय ताई, आमास्नी सक्त ताकीत हाय की गावच्या कोनाशीच काय बी बोलायचं न्हाई. खाली मान घालून चालायचं म्हनून. पर आता हे लांडगेच आडवे आलेत त्याला आमी तरी काय करनार?”

यावर फक्त “हम्म” म्हणत रेवा तिच्या विचारात हरवली.

तेवढ्यात जयाचं लक्ष गेलं तर सोनाच्या मागे राक्या उभा होता. ती जरा आश्चर्यानेच जोरात म्हणाली,

“राक्या, तू हितं?”

तशा सोना आणि जया त्याने आपलं बोलणं ऐकलं तर, नाही ना या शंकेने जरा घाबरून त्याच्याकडे बघत होत्या. राकेश फडातल्या ढोलकी वाजवणार्‍या काकांचा मुलगा. जया, सोनापेक्षा दोन, तीन वर्षांनी मोठा असेल. तो पण वडिलांसोबत ढोलकी आणि इतर वाद्य वाजवत.

“काय गं ए, चलाकी लवकर. तिकडे ताई वरडत्यात. त्यांनीच मला बोलवायला पाठवलंय.”

राक्याचं हे वाक्य ऐकून त्या दोघींनी त्याच्याकडे असा कटाक्ष टाकला की ते बघून तो शरमला. जरा लाजतच सोनाकडे बघत म्हणाला,

“मंजी त्या वरडत व्हत्या अजून का नाई आल्या म्हनून. तर म्याच म्हंलो बोलावून आनतो.”

तशी सोनाही लाजली आणि खाली बघू लागली. हे सगळंच रेवा शांततेत बघत होती आणि गालातल्या गालात हसत होती. शेवटी त्या तिघी उठल्या आणि फडाच्या दिशेने चालू लागल्या. या तिघी पुढे आणि राक्या त्यांच्या मागे चालत होता.

“बरं झालं बाई या राक्याने आपलं बोलणं ऐकलं न्हाई ते.”

सोना जयाचा हात दाबत हळूच म्हणाली. तशा दोघी फिदीफिदी हसू लागल्या. तिच्या सुरात सूर मिसळत जया पण म्हणाली,

“म्या तर घाबरलीच व्हती.”

पण या सगळ्यात रेवाच्या डोक्यात वेगळेच चक्र फिरत होते. या मुलींना असा न बोलता बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. आपण काहीच मदत करू शकत नाही का? खरंच ताईंशी बोललो तर या मुलींनाच उलट त्रास होईल का?
---------------------------------------------

क्रमशः
दीर्घ कथा ‘ती’चा लढा
भाग ४
धनश्री भावसार-बगाडे
रेवाला जमेल का या मुलींची मदत करायला? राक्याला बघून त्या का घाबरल्या? राक्या आणि सोनाचं नातं काय? नदीवरच प्रकरण इथेच निवळणार की वाढणार? जाणून घ्या पुढील भागात.

🎭 Series Post

View all