'ती' चा लढा भाग ५

नदीवरच्या त्या एका प्रसंगाने रेवाला पूर्ण हलवले.
दीर्घ कथा
‘ती’चा लढा
भाग ५.
@धनश्री भावसार बगाडे

ते लोक फडात पोहचले तेंव्हा साधारण संध्याकाळचे ५ वाजले होते. बहुतेक सगळ्यांचीच वामकुक्षी घेऊन ते पुन्हा फ्रेश झाले होते. बाजूलाच असलेल्या किचनवजा तंबूतून मस्त गरमागरम कांदा भजी आणि वाफाळलेला चहा सगळ्यांसाठी आला होता. बोर्डावर चढताना कोणीही काहीही खाऊन उभं राहत नसे, त्यामुळे हाच नाश्ता जरा पोटाला आधार देणारा असे.

तंबूत शिरताना मुद्दाम रेवा पुढे झाली. ताई समोरच होत्या.

“कशी वाटली जत्रा?”

ताईंनी रेवाला विचारलं आणि सोना, जयाकडे फक्त कटाक्ष टाकला. तशा त्या दोघी आपापल्या कामाला गेल्या. रेवाने पण फक्त मान हलवत “छान” म्हटलं.

“घ्या, चा, नाश्ता घ्या. रातच्याला थेट तमासा संपल्यावरच जेवन होतं नव्हं, तवा आता खाऊन घ्या थोडं.”

मुख्य ताई शिस्तीच्या फार कडक होत्या पण त्या बरोबर आईच्या मायेने त्या सगळ्यांची काळजीपण घ्यायच्या. हे बघून रेवाला फार छान वाटे.

‘इथल्या लोकांना कोणकोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे त्यांनी शिस्त ठेवणं पण गरजेचंच आहे म्हणा’,

असा विचार करत रेवा चहा पिऊ लागली.

रेवाचं सहज लक्ष सोनाकडे गेलं. समोर बघून तिच्या काहीतरी खाणाखुणा सुरू होत्या. त्या दिशेने रेवाने बघितलं तर तिकडे राक्या होता. तो तिला बोलवत होता. त्यांच्या नजरेतल्या त्या खाणाखुणा हिला गोड वाटल्या. तिला निखिलची आठवण झाली. तेवढ्यात ताईंच्या आवाजाने ती भानावर आली.

“भजी खावा की ताई. तुमास्नी आमच्यासारखं येवडं तेलकट, तिकट खायची सवय नसन नव्हं?”

“नाही नाही, तसं काही नाही. खूप छान झालीत भजी. अगदी चविष्ट. चुलीवरच्या जेवणाची चवच भारी असते.”

रेवा लगेच स्वतःला सावरत म्हणाली.

ताई उठून दुसरीकडे गेल्याबरोबर रेवापण लगेच त्या मुलींच्या घोळक्यात शिरली.

“काय गं काय सुरूये? मला पण सांगा ना, मी पण हसेन. की माझ्यावरच हसताय?”

तिने जरा लाडिक स्वरात विचारलं.

“नाई ओ ताई. तुमच्यावर कशाला हसू? ही पिंकी काईबाई बोलतेय.”

“सांगू का आता ताईस्नी?”

सरिता पटकन म्हणाली.

“सांगा की मग. मला पण ऐकायचंय.”

रेवाचं बोलणं ऐकताच सोना म्हणाली,

“आओ ताई मानसानं आपलं अंथरुन पाऊन पाय पसरावं की नाय.”

“ही येडी म्हनतीये की तुमची गळयातली चेन भारीये, अन ती बी अशीच चेन करेन.”

“अरे वा! नक्कीच करशील की. पैसे साठव म्हणजे नक्की एक दिवस तू पण अशी चेन करशील. मी पण पैसे साठवूनचं केलीये ही चेन.”

रेवा छान गोड हसत तिला म्हणाली. तिच्या या वाक्याने फक्त पिंकीच्याच नाही तर सगळ्यांच्याच डोळ्यात एक वेगळी चमक आली होती.

“तुमाला कशाला पैसे साठवण्याची गरज हाय?”

जया पटकन बोलून गेली.

“अगं म्हणजे काय? मी पण काही खूप श्रीमंत नाही. सर्वसामान्य घरातलीच आहे. आम्हालाही महिन्याच्या शेवटी पैशांची जुळवाजुळव करताना कसरतच करावी लागते.”

रेवाचं हे बोलणं ऐकताना सगळ्यांच्या चेहर्‍यावर एक आपलेपणाचं हसू होतं. डोळ्यात तिच्याविषयी वाढलेला विश्वास होता.

“बरं, हे बघा मी तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी आणलंय.”

असं म्हणत तिने एकेकीच्या हातावर त्या जत्रेत खरेदी केलेली चेन ठेवली. ती चेन खोटी असली तरी त्या मुलींच्या चेहर्‍यावर तेंव्हा उमटलेला आनंद लाख मोलाचा होता.

“ताई, तुमी कशाला?”

असे शब्द प्रत्येकीच्याच ओठांवर होते आणि डोळ्यात पहिल्यांदाच कोणीतरी काही कारण नसताना भेटवस्तू दिल्याचा आनंद होता. ते बघून रेवापण सुखावली होती.

मग तिने एकेकीला त्यांची इथे फडात येण्याआधीची पार्श्वभूमी विचारली.

यातल्या बहुतांश मुली या आधी ऑर्केस्ट्रामध्ये नाचत होत्या. वयाच्या बारा, तेराव्या वर्षीच आई-वडिलांनी पैसे कमावण्यासाठी त्यांना या कामाला लावलेलं होतं. कोणाच्या मामाने तर कोणाच्या चुलत्याने त्यांना हे काम मिळवून दिलेलं होतं. परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते ते ऐकून रेवाचं संवेदनशील मन पिळवटलं जात होतं.

“मग ऑर्केस्ट्रामधून फडात कशा आलात?”

रेवाच्या या प्रश्नावर सोना म्हणाली,

“तिकडं ओर्केष्ट्रामधी तोकडे कपडे घालून शिनेमाच्या गान्यांवर नाचाया लगायचं. रात्री लय उशिरापातूर, लय दमायला व्हायचं. आन पैसे बी हितल्यापेक्षा कमी व्हते. माह्यि आत्या हाय नव्हं हितं मंग तिने बोलावून घेतलं हिकडं.”

त्यावर रूपा म्हणाली,

“ताई काल रातच्याला लोक त्या बाटल्या मारून फेकतात म्हनून तुमास्नी वाईट वाटलं. पर तिकडं ओर्केष्ट्रामधी त्ये तोकडे कपडे घालून आमी नाचतो तवा लोक तर थेट आमचा हातबीत धरत व्हते.”

“आमी लहान पोरी हाओत याची बी सुदिक नसायची कोनाला. येकदा तर”,

असं म्हणत ती एकदम थांबली. भावनेच्या भरात आपण खूप बोलतोय असं तिला वाटलं. रेवा तिच्याजवळ गेली. तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला विश्वासात घेतलं. तशी ती परत बोलती झाली.

“ताई हित नाचणार्‍या पोरींमधी म्या सर्वात मोटी हाय. पर तवा म्या १४ वरिसची व्हती. लोकांस्नी वाटतं तमाशाला सगळे गावकडचे अडाणी लोक आनी ओर्केष्ट्राला सुसिक्षित लोक येत्यात म्हनून. पर तसं काय नसतं. त्या सुसिक्षितांपरिस ह्ये अडाणी परवडले.”

“त्या दिवशी आमी ओर्केष्ट्रा मदल्या पोरी पहाटं साडेतीन वाजेस्तोर नाचत हुतू. लई दमलो हुतू. सगळ्या पोरी लहानच हुत्या नव्हं. त्यात एक बेवडं मेलं माया बापाच्या वायाचं आसन माया हात धरून वाढाया लागलं. नको तितं, कुटं कुटं हात लावत व्हतं. म्या लागले वरडाया, तसं येक बॉडीबिल्डर आलं आन त्याने दिली त्या पेताडला येक ठिऊन.”

“हितं किमान मालक आन ताईंच्या भीतीनं कोनी थेट आमास्नी हात तरी न्हाई लावत.”

ती सांगत होती.

“बॉडीबिल्डर?”

रेवाने विचारलं.

“हां, हे असलं तिकडं नेहमीच हुतं म्हनून ओर्केष्ट्राचे मालक असे २, ३ बॉडीबिल्डर ठेवत्यात.”

“त्याच्याशीच म्या आता लगीन करणार हाय.”

लाजतच रूपा बोलली, तशा बाकीच्या लगेच तिला चिडवायला लागल्या.

तेवढ्यात ताईंच फर्मान सुटलं

“पोरींनो आवरा गं बोलत काय बसल्या? आज बोर्डावर उभं र्‍हायचं न्हाई का? आवरा पटापटा.”

हे ऐकताच पोरींची गडबड सुरू झाली. रेवा पण तिथून उठली. तिच्या जागेवर बसून ती दिवसभराच्या सर्व नोंदी लिहून घेत होती. मध्येच या मुलींची तयारी बघत होती.

नेहमीप्रमाणे नमन, गण, गौळण होऊन लावणीला सुरुवात झाली.

‘पाडाला पिकाला आंबा’ पासून ते थेट ‘रूपाने देखणी सुपारी हेकणी’ पर्यंत वेगवेगळ्या लावण्या सादर झाल्या. रोजच्याप्रमाणे आजपण तोच गोंधळ, बाटल्या फेकून मारणे प्रकरण सुरू होतं.

आज मात्र रेवा थोड्यावेळच बाहेर होती नंतर आत येऊन तिच्या जागेवर आडवी पडली. तिला दिवसभरातल्या घटना आठवू लागल्या. नदीवर मुलींसोबत घडलेली घटना, रूपाने सांगितलेला ओर्केष्ट्रामधला अनुभव, तिला सगळं आठवू लागलं आणि तिचं विचारचक्र सुरू झालं.

‘कसं आहे ना बाईचं जिणं? आपण एकीकडे स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे बघतो तर पुरूषांना अजूनही बाईचं फक्त शरीरच दिसतं. मग ती बाई कोणत्याही सामाजिक स्तरातली असू दे, या पुरुषी नजरा तिला कायम नग्नच करतात.’

असा विचार करताच तिच्या अंगावर सर्र्कन काटा आला आणि ती जेंव्हा शहरात शिकायला आली तेंव्हाचा तिच्यावर बेतलेला प्रसंग तिला आठवला.
----------------------------------------------------------------------

क्रमशः
दीर्घ कथा ‘ती’चा लढा
भाग ५
धनश्री भावसार-बगाडे
नेमकं काय घडलं असेल? रेवावर असा कोणता प्रसंग बेतला असेल? फडातल्या जगण्यात तिला अजून काय अनुभवायला मिळालं? जाणून घ्या पुढील भागात.

🎭 Series Post

View all