'ती' चा लढा भाग ६

एकटी मुलगी घराबाहेर राहताना तिला जगाला कसं सामोरं जावं लागतं, दुनियेचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी रेवाला आलेला, अंगावर काटा आणणारा अनुभव.
दीर्घ कथा
‘ती’चा लढा
भाग ६.
@ धनश्री भावसार बगाडे

रेवा बारावी झाल्यावर पदवीच्या शिक्षणासाठी लहान शहरातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात आली होती. तिच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. आई गृहिणी, लहान बहिणीचं शिक्षण, हिचं शिक्षण आणि वडील एकटे कमावणारे होते.

आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी स्वप्न मोठी होती. त्यामुळे पुण्यात येऊन उच्च शिक्षण घेण्याचं तिनं ठरवलं. घरच्यांनीही मानसिक पाठबळ दिलं. पण आर्थिक पाठबळ थोडं कमी पडणार होतं. त्यामुळे नोकरी करून शिक्षण घ्यायचं ठरलं.

त्यांच्या नात्यातल्या कोणाच्यातरी ओळखीने एका वकिलाकडे टायपिंग आणि वर कामासाठी जागा आहे असं समजलं. वडिलांना घेऊन रेवा तिथे गेली. पण वडील त्या ऑफिसपासून थोड्या दूर एका बस स्टॉपवर थांबले. आता मोठ्या शहरात एकटीलाच रहायचंय तर ‘बोल्ड’ व्हायला हवं ना.

रेवा एकटी त्या वकिलांच्या ऑफिसमध्ये गेली. जेमतेम १८-१९ वर्षांची कोवळी पोर होती. जुन्या वाड्यामधल्या अगदी छोट्याशा दोन खोल्यांचं ते ऑफिस होतं. बाहेरच्या खोलीत त्या वकिलाची टेबल, खुर्ची, बाजूला एक फायलींचं कपाट, टेबलासमोर भेटायला येणार्‍यांसाठी दोन खुर्च्या आणि तिथे टेबलावरच एका कोपर्‍यात कम्प्युटर ठेवलेला होता. यात ती खोली भरून गेली होती.

तर आतल्या खोलीत एक कपाट, एक सिंगल बेड आणि एका बाजूला चहा करून पिता येईल यासाठी गॅस, पातेलं वगैरे सामान एका टेबलावर ठेवलेलं होतं.

तो वकील म्हणजे साधारण सत्तरी ओलांडलेला वृद्ध व्यक्ती होता. एवढे मोठे वकील, आपल्या आजोबांच्या वयाचे आहेत असे वाटून रेवाला त्यांच्याविषयी आदर वाटला. ती आदरानेच त्यांना

“गुड मॉर्निंग सर” म्हणाली.

फायलीत काहीतरी वाचत बसलेल्या त्या वकील गृहस्तांनी वर बघितलं. रेवाला बघून त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली.

“काय काम आहे?”

त्यांनी विचारलं.

“सर, तुमच्याकडे टायपिंग आणि इतर कामासाठी जागा असल्याचं समजलं.”

“सर, मी रेवा. काल तुम्हाला फोन केला होता.”

तसं त्या वकिलच्या चेहर्‍यावर स्मित आलं.

“हां हां. ये बस.”

खुर्चीकडे हात दाखवत ते म्हणाले. त्यांनी रेवाची इतर चौकशी केली. इथे कशी? नोकरी का हवी वगैरे. एकंदरीतच तिच्या विषयीची माहिती घेऊन तिच्या परिस्थितीचा अंदाज त्यांना आला.

“हे बघ, या कामाचा पगार ५ हजार रुपये महिना देईन. पण या व्यतिरिक्त जर तुझं काम आवडलं तर जास्तीचे पैसे, नवे कपडे, खाण्यापिण्याची चंगळ सगळच होईल बघ.”

त्यांचं हे बोलणं रेवाला जरा वेगळं वाटलं; पण एवढ्या मोठ्या माणसावर संशय घेणं तिचं मन मान्य करेना. शिवाय नोकरीची गरज होतीच. माहिना काढायला ५ हजार पुरतील असा विचार ती करत होती. तेवढ्यात ते वकील तिच्या खुर्चीजवळ आले.

“चल तुला आतल्या फायली दाखवतो.”

असं म्हणत त्यांनी तिचा खांदा दाबला. ती ताडकन उठून उभी राहिली. त्यांच्या मागे आतल्या खोलीच्या दरातच उभी होती. तसं त्यांनी तिला ओढून पलंगावर ढकललं. तिला काही कळायच्या आतच ते तिच्या खूप जवळ आल्याचं तिला जाणवलं. तिने त्यांना ढकललं आणि तिथून पळाली.

तिचं डोकं बधीर झालं होतं. डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

‘एवढ्या वयस्कर माणसाविषयी आपण असं काही सांगितलं तर कोणी आपल्यावर विश्वास तरी ठेवेल का? शिवाय तो माणूस वकील आहे. आपल्यालाच तर कशात अडकवणार नाही ना?’

असे काहीबाही विचार तिच्या डोक्यात सुरू झाले.

याविषयी वडिलांनाही सांगता येणार नव्हतं. नाहीतर ते ‘इथे नको राहू’ म्हणत परत घरी नेतील.

म्हणून तिने स्वतःचे अश्रू आवरले. स्वतःला सावरत चेहर्‍यावर उसणं हसू आणत ती वडिलांसमोर गेली.

“काही नाही, मला नाही आवडलं तिथे.”

एवढंच तिने वडिलांच्या प्रश्नार्थक नजरेला उत्तरादाखल म्हटलं.

“ठीक आहे. मिळेल दुसरीकडे.”

असं म्हणत ते दोघंही तिथून निघाले. पण त्या वकिलाचा तो स्पर्श, ती नजर रेवाला खोलवर जखम करून गेली.

ते सगळं आठवून आजही तिच्या अंगावर काटा आला. या विचारतातून स्वतःला बाजूला करत तिचा डोळा लागला.

आजचा तमाशा आदल्या दिवशीपेक्षा लवकर म्हणजे रात्री दोन वाजता संपला होता. साधारण तीन वाजता परत रेवाला जेवणासाठी उठवण्यात आलं होतं.

सकाळी सात-साडेसात वाजता आज सगळ्यांचीच सकाळ झाली. कारण गाव वेशी जवळच्या मंदिरासमोर खास महिलांसाठी या फडाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मंदिरा समोरच्या मोकळ्या जागेत एका झाडाखाली एक लहानसा स्टेज बांधण्यात आला होता. स्टेजच्या मागच्या बाजूला कनात (प्लॅस्टिकवजा कापड) लावली होती. आणि तिथे मागे मंडपाचे पडदे लावून खोली बनवण्यात आली होती.

फडाच्या टेंपोत सर्व कलाकार, मुली आणि सोबत रेवा यांना भरून कार्यक्रमाच्या जागेवर आणलं होतं. त्या खोली सदृश जागेत सर्व मुली थांबल्या होत्या. स्टेजवर पोवाडा, लावणी सिनेमाच्या इतर गाण्यांवर डान्स सादर झाले. रात्रीच्या तमाशाची सर याला नक्कीच नव्हती. याला कारणं दोन होती. एकतर कार्यक्रम महिलांसाठी आहे म्हणून भडकपणा नको असं सांगण्यात आलं होतं. आणि दुसरं म्हणजे अर्धवट झोपेतच सर्वजण कार्यक्रम सादर करण्यासाठी आले होते.

पण आश्चर्य म्हणजे खास महिलांसाठीच्या या कार्यक्रमाला महिलांची संख्या बोटावर मोजण्याएवढीचं होती. तर तरुण पोरांचीच जास्त गर्दी होती. काल या मुलींना छेडणारी टवाळ पोरंही तिथे होती.

सादरीकरण करून मुली मागच्या त्या कापडी खोलीत थांबत होत्या. काहीतरी आणायला म्हणून सोना तिथून बाहेर थोड्याच अंतरावर असलेल्या टेम्पोकडे गेली.

“जानेमन आज तरी बघ आमच्याकडं.”

“काय नाचते राव ही, आयहाय!”

“पदर जरा वर घे की, कंबरेत चिमटाच काढतू बघ.”

अशी शेरेबाजी करत ती पोरं सोनाकडे बघून अचकट विचकट हसत होती.

हे सगळं लांबून राक्या बघत होता. सोना तिथून निघून परत त्या खोलीत आली तसा राक्याही तिच्या मागोमाग आला.

तिथंच बाजूला नेत त्याने तिचा हात पिरगळला.

“काय गरज व्हती तुला भाहेर निगाची? लई शानी हाईस व्हय. पोरांसमोर शायनिंग मारती काय?”

राक्या दात ओठ खात तिला दम देत होता.

“राक्या आरं सोड माहया हात, लागतंय. आरं त्ये सामान आनाया गेलती म्या.”

पण राक्या तिचं काहीही न ऐकत तीच कशी चुकली हे सांगत तिचा हात पिरगळत होता. शेवटी तिला जोरात ढकलून निघून गेला. ती शेजारच्या खांबावर आदळली. खांद्याला जोरात मुकामार बसला.

बाकीच्या लगेच तिला सावरायला आल्या. रेवा तेंव्हा बाहेर स्टेजजवळ होती. तेवढ्यात पुढच्या सदरीकरणासाठी सगळ्या स्टेजवर आल्या. सोनाला जोरात लागलं होतं. तिचा तो हात काही हलेना. ती अवघडून नाचतेय हे रेवाच्या लक्षात आलं.

ती अशी का नाचतेय? म्हणून रेवाने तिच्या हाताकडे बघितलं तर कोपरा पासून हात सुजलेला होता, मनगट लाल झालेलं होतं. ते बघून ती अस्वस्थ झाली.

‘आता थोड्यावेळा पूर्वी तर बरी होती. आता काय झालं हिला?’

रेवा काळजीत पडली. नाही म्हटलं तरी सोनाशी तिची आता बर्‍यापैकी मैत्री झाली होती. कार्यक्रम संपवून सगळे निघाले. सगळ्यांसमोर सोनाला काही विचारणं तिला योग्य नाही वाटलं. तिने नजरेनेच सोनाला विचारलं.

“काय झालं?”

“काही नाही” असं तिनेही मान हलवतच सांगितलं.

फडाच्या तंबूत पोहोचल्यावर जेवणाची वेळ झाली होती. तयारी होईपर्यंत वेळ होता.

‘आता सोनाशी बोलूया’

म्हणून रेवा तिला शोधत होती. पण ती कुठे दिसत नव्हती. जेवणं वाढली तशी रेवा जेवायला गेली पण सोना तिथेही नव्हती. ती जेवायलाही उशीराच आली. त्यावरूनही

“कुटं कलमडली व्हती?”

असा ताईंचा तिने ओरडाही खाल्ला. पण तिचा कार्यक्रमात कोमेजलेला चेहरा आता मात्र खुलला होता. हात दुखतंच होता. पण तरीही ती खुश दिसत होती. हा विरोधाभास बघून रेवाला आश्चर्य वाटत होतं पण ती थोडी रिलॅक्स झाली होती.

जेवणं आटोपल्यावर मात्र तिने सोनाला बाजूला घेतलं.

“चल माझ्या बरोबर”

म्हणत तिला जरा खेचतच आपल्या बॅगेजवळ घेऊन आली. त्यातून बाम काढत तिच्या हाताला चोळत होती.

“किती सुजलाय हात. तुला हलवता पण येत नाहीये.”

“व्हय ना ताई.”

तेवढ्याच साधेपणाने सोनाने उत्तर दिलं.

“व्हय काय व्हय? कशाने सुजला एवढा? खरं सांग मला कोणी तुझा हात पिरगळला का?”

त्यावर सोना ओशाळली.

“काई न्हाई ताई, तुमी नगा लक्ष देऊ.”

म्हणत तिने रेवाला टाळण्याचा प्रयत्न केला.

“नाही कसं? कालच्या त्या मुलांनी तर काही?”

रेवाच्या विचारण्यात काळजी, भीती, राग सगळंच एकदम दाटून आलं होतं.

“न्हाई न्हाई, त्यांनी काय नाय केलं. त्यो राक्या.”

आणि ती बोलता बोलता एकदम अडखळली.

“राक्या?”

रेवाच्या या प्रश्नाला टाळत,

“मला काम हाय, म्या येते जरा.”

असा पळ काढण्याचा तिने प्रयत्न केला. पण रेवाने तिला धरून ठेवलं. मोठ्या बहिणीच्या मायेने जवळ घेतलं. तशी सोनाही वरमली. डोळ्यातल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. थोड्या वेळाने शांत होत ती म्हणाली,

“माफ करा ताई, म्या अशी तुमच्याजवळ रडली, म्हंजी”

ती अडखळत बोलत होती.

“या आदि कदी कोनी मायेनं जवळ न्हाई घेतलं ना. आन तुमी असं अचानक मायेने जवळ घेतलं तर कसं रडू फुटलं, मला बी कळलं न्हाई.”

“अगं त्यात काय एवढं. मला ताई म्हणतेस ना तू? माझी लहान बहीण पण तुझ्या एवढीच आहे. तुझ्याकडे बघून मला तीच आठवते. तिला लागलं असतं तर, तिलाही असंच मायेने जवळ घेतलं असतं ना मी.”

रेवाच्या असं समजावण्याने दोघींच्या चेहर्‍यावर छान हसू फुललं.

“बरं, आता सांग बरं काय झालं?”

सोना पण आता तिच्याशी खुलली होती. तिने सगळी हकीकत सांगितली. तसा रेवाला राग अनावर झाला.

“ही, पुरुषांची जातच मेली तशी. हक्क समजतात स्वतःचा बाईवर. तो निखिल पण तसाच आणि हा राक्या पण.”

असं स्वतःशीच ती बडबडत होती. त्यावर सोना पटकन म्हणाली,

“न्हाई ताई. तसा तो लई चांगलाय. म्हायावर लई माया करतो.”

लाजत म्हणाली.

“आता बगाना, जेवना अगुदर म्या त्याच्या संगच व्हते. म्हयासाटी या बांगड्या घेऊन आलाय.”

रेवाला बांगड्या दाखवत म्हणाली. त्यावर

‘ही इतकी कशी भोळी?’

म्हणून रेवा सोनाकडे राग, विस्मय अशा संमिश्र भावाने बघत होती.

‘मी तिला तरी काय बोलतेय? मी तरी कुठे वेगळी आहे? निखिल कितीही भांडला, कसाही वागला तरी नंतर त्याच्या थोड्याशा गोड बोलण्याला भुलतेच की मी पण.’

रेवाचा विचार सुरूच होता.

“ताई हयो निखिल कोन?”

तिने तेवढ्याच भोळेपणाने विचारलं. त्यावर गडबडून

“कोणी नाही.”

म्हणत रेवा पुन्हा तिच्या विचारांत हरवली.
--------------------------------------------------

क्रमशः
दीर्घ कथा ‘ती’चा लढा
भाग ६
धनश्री भावसार-बगाडे
निखिल कोण आहे? सगळ्या पुरुषांची जात एकसारखी असं रेवा का म्हणाली? एवढा राग का? जाणून घ्या पुढील भागात.

🎭 Series Post

View all