'ती' चा लढा भाग ७

रेवा आणि निखिलची प्रेम कहाणी
दीर्घ कथा
‘ती’चा लढा
भाग ७.
@धनश्री भावसार बगाडे

रेवाला निखिलची आठवण झाली आणि ती भूतकाळात हरवली.

त्या दिवशी एका मोठ्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये तेवढ्याच ‘एलिट’ लोकांसाठी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. तिथे हिर्‍यांचे दागिने, फॅशनेबल डिझायनर ड्रेस, महागड्या हँडलूम साड्या आदी वस्तू विक्रीसाठी होत्या. ते प्रदर्शन रेवा ज्या दैनिकात कामाला होती त्या दैनिकाच्या मालकांच्या मित्राने आयोजित केलं होतं. त्याचं खास आणि चांगलं रिपोर्टिंग व्हावं म्हणून तिला ही असाईनमेंट लावण्यात आली होती.

पण तिला मात्र खूप जिवावर आलं होतं.

“या श्रीमंत लोकांच्या कार्यक्रमांमध्ये खूप अवघडल्यासारखं होतं. मला नको ना हा कार्यक्रम, दुसर्‍या कोणाला सांगा ना.”

अशी ती साठे सरांना विनंती करत होती. पण शेवटी तिलाच त्या कार्यक्रमाला जावं लागणार होतं. जरा नाराजीनेच ती तयार झाली.

तिथे गेल्यावर तिथला तो सगळा हायफाय माहोल बघून ती अपेक्षेप्रमाणेच अवघडलेली होती. एका कोपर्‍यात उभी राहून गोंधळलेल्या नजरेने सगळीकडे बघत होती. आयोजक महत्वाचे क्लाएंट आहेत म्हणून जाहिरात विभागातून निखिलला पाठवण्यात आलं होतं. तो जरा उशिरा तिथं पोहचला होता.

आल्या आल्या तो सरळ जाऊन आयोजकांना भेटला. सगळ्यांना छान हसून बोलून भेटत होता. हे सगळं रेवा लांबून बघत होती. ऑफिसमधला कोणीतरी ओळखीचा चेहरा दिसला म्हणून तिला थोडसं हायसं वाटलं होतं. त्यानेही लांबून तिला ओळखीची स्माईल दिली.

थोड्यावेळाने तो तिच्याजवळ उभा राहिला.

“इकडे कोपर्‍यात एकटी का उभी आहेस? तुला प्रदर्शन नाही बघायचं का? अर्ध पान कव्हरेज द्यायचंय मॅडम आपल्याला.”

तो तिला जरा आठवण करून दिल्यासारखं म्हणाला.

“हो, माहितीये मला. आलेय फिरून मी प्रदर्शन. घेतलीये माहिती.”

ती पण जरा तुटकपणेच म्हणाली.

“आणि प्रतिक्रिया? त्या पण आवश्यक आहेत. तू सोहनी सर आणि त्यांच्या मुलीची प्रतिक्रिया घेतलीस का? ते खूप आवश्यक आहे बरं का.”

तो सांगत होता. त्यावर तिने फक्त “हम्म” एवढीच प्रतिक्रिया दिल्याने त्याने तिच्याकडे आश्चर्याने बघितलं.

ती जरा गोंधळलेली त्याला दिसली.

“काय झालं?”

त्याने काळजीने विचारलं.

“काही नाही. या श्रीमंत लोकांच्या गर्दीत जरा अवघडल्यासारखंच वाटतं.”

ती तोंड वाकडं करत म्हणली.

“हो खरंय.”

तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं.

“तू काय खरं म्हणतोस? तू तर किती कंफर्टेबली बोलत होतास सगळ्यांशी. तुला कसलं अवघडलेपण?”

तो तिच्याकडे बघत हसून म्हणाला,

“अगं सगळ्यांशी हसून बोलणं माझं कामंच आहे. हे आपले महत्वाचे क्लाएंट आहेत. पण असल्या एवढ्या श्रीमंत लोकांच्या गर्दीत मी पण काही रोज नाही जात. त्यामुळे मलाही जरा अवघडल्यासारखं वाटतंच आहे. फक्त फरक एवढाच आहे की, मी तो चेहर्‍यावर येऊ देत नाहीये. कारण बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा आपलं काम महत्वाचं आहे.”

त्याच्या या बोलण्याने तिला प्रभावित केलं. ती त्याच्याकडे नीट बघत होती. तिला जाणवलं की, हा ब्लेजर घालून खूप छान दिसतोय.

तेवढ्यात तो म्हणाला,

“चल, तुझी सोहनी सर आणि त्यांच्या कुटुंबाशी ओळख करून देतो. मग तिथेच तू घे त्यांच्याशी बोलून.”

तशी ती खुशच झाली.

“एरवी यांना भेटले असते तर बोलायला काही वाटलं नसतं रे. पण ते मालकांचे मित्र म्हटल्यावर जरा दडपण येतं.”

तिच्या या बोलण्यावर त्याने “हम्म” करत प्रतिक्रिया दिली. त्याने ओळख करून दिल्यावर मात्र रेवा बर्‍याच वेळ त्यांची मुलाखत घेत होती.

त्यानंतर रेवा आणि निखिल दोघांनाही त्यांनी जेवायला बोलावलं. तिथेही रेवा त्यांच्या कुटुंबीयांशी छान बोलत मुलाखतवजा गप्पा मारत होती. तिचं हे आत्मविश्वासू बोलणं तो फार कौतुकाने आणि लक्षपूर्वक ऐकत होता.

जेवल्यानंतर प्रदर्शन बघायला आलेल्या महत्वाच्या लोकांच्या तिने प्रतिक्रिया घेतल्या आणि ती निघाली. निखिल अजून थोड्यावेळ थांबणार होता.

ती बाहेर आली तर तिची गाडीचं सुरू होईना. किक मारून मारून ती बेजार झाली. शेवटी पर्याय नाही म्हणून तिने निखिलला बोलावलं. तो ही लगेच मदतीला आला, पण गाडी काही सुरू होईना.

“रेवा, गाडी इथेच बाजूला लावूया. जवळपास कोणी मेकॅनिक भेटतो का बघतो.”

म्हणत त्याने गाडी बाजूला घेतली.

“चालेल. पण उशीर होईल रे. मला ही बातमी वेळेत सोडायला लागेल. शिट यार! कसला वैताग आहे. या गाडीला पण आताच बंद पडायचं होतं.”

तिचा वैताग झाला आणि उशीर होतोय म्हणून चिडचिडही.

“एक काम करू, मी तुला आता ऑफिसला सोडतो तू बातमी कर. मग बघू गाडीचं कसं ते.”

तो समजावण्याच्या सुरात म्हणाला.

“अरे पण तुला इथे थांबावं लागणारे ना?”

तिने विचारले

“एका क्लाएंटची वाट बघत होतो. पण काही हरकत नाही. सांगेन सरांना काहीतरी.”

“नको मग, का उगाच? तुला बोलणी बसतील नाहीतर.”

ती म्हणाली.

त्यावर त्याने मान उडवतच

“चलता है यार”

म्हटलं. तसं, तिनेही खांदे उडवत “ओके” म्हटलं.

ऑफिसला पोहचल्यावर दोघे आपापल्या कामाला निघून गेले. रेवाला काम संपवायला रात्रीचे पावणे दहा वाजले. तिची निघण्याची आवाराआवर सुरू झाली तसा निखिल तिथे आला.

“काय मॅडम आटोपलं काम?”

“हो आताच. पण तू अजून ऑफिसला कसा?”

तिने चकित होत विचारलं. त्यावर काहीच न बोलता

“आता घरी कसं जाणार?”

त्याने प्रतिप्रश्न केला.

“कसं म्हणजे काय? माझ्या गाडीने.”

असं म्हणताच तिला आठवलं की गाडी तर त्या हॉटेलजवळ बंद पडलीये. तिने डोक्याला हात लावला.

“अरे देवा! कामाच्या गडबडीत मी पूर्णच विसरले रे. आता एवढ्या उशिरा कोणी मेकॅनिक पण नसेल.”

ती बडबडत होती. तसा तो हसत म्हणाला,

“चला सोडतो.”

त्यावर अवघडून ती म्हणाली,

“नको. मीच जाते घरी रिक्षाने.”

“मॅडम जरा घड्याळ बघा. एवढ्या उशिरा रिक्षा मिळणं पण कठीण आहे. आणि घरी काय? गाडी घ्यायची नाही का?”

त्याने जरा दटावत विचारलं. ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनेच बघत होती. तसा तो म्हणाला,

“मी दुपारीच मेकॅनिकला नेऊन गाडी दुरुस्त केली आहे. पण परत आणायला इतर कोणी गाडी चालवणारं नव्हतं म्हणून म्हटलं तुझ काम संपल्यावर तुलाच नेऊन गाडी परत आणावी.”

त्याच्या या वाक्यावर काय बोलावं तिला कळेना. गाडी दुरुस्त झाल्याचा आनंद तर होताच. पण आपल्यासाठी याने एवढा त्रास घेतला म्हणून ती जरा ओशाळली पण होती. काय बोलावं तिला समजेना. त्याच्यासोबत ती तशीच ऑफिसबाहेर पडली.

ते हॉटेल ऑफिसपासून बरच लांब होतं. तिथे जाऊन गाडी घेऊन निघेपर्यंत सव्वा अकरा, साडे अकरा वाजलेले. उशीर झाला म्हणून निखिलही तिच्यासोबत तिच्या घरापर्यंत जायला निघाला.

“अरे तू कशाला आता उलटा येतोस? आधीच आज तुला खूप त्रास झालाय माझ्यामुळे. आता जाईन माझी मी.”

ती कृतज्ञतेने बोलत होती.

“तेवढीच तुझी सोबत मिळेल.”

तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. तिला ऐकू गेले होते. पण न समजल्यासारखं दाखवत “काय?” म्हणाली.

“काही नाही. रात्र बघ किती झालीये. एवढ्या रात्री तुला एकटीला कसं जाऊ देऊ? त्यात तू राहतेस पण दुसर्‍या टोकाला.”

तो एका दमात म्हणाला.

“मी कुठे राहते तुला माहितीये?”

“हां, म्हणजे कोथरूडला राहते असं कोणाकडून तरी ऐकलं होतं. कोथरूडलाच राहतेस ना?”

एकदम गोंधळून तो म्हणाला. ती गालातल्या गालात हसली आणि मानेनेच होकार देत दोघे निघाले.

पूर्ण रस्ता दोघे काहीही न बोलता शांततेतच गाडी चालवत होते. निखिलच्या मनात मात्र कसली तरी कालवाकालव सुरू होती. रेवाच्या घराजवळ पोहोचल्यावर त्यांनी गाडी थांबवली.

एकदम बाय कसं म्हणणार म्हणून तिने त्याचे आभार मानले. पण तो काही हलायला तयार नव्हता. हे तिने ओळखलं आणि मग तिनेच विषय काढला,

“तू एवढी परस्पर गाडी दुरुस्त केलीस, मग तुझ्या एखाद्या मित्राला नेऊन, परत आणायची पण होतीस की.”

ती जरा चिडवतच म्हणाली.

“असं कसं कोणाला नेणार? मग त्यांचे सतराशे साठ प्रश्न. कोणाची गाडी आहे आणि तू का करतोय वगैरे वगैरे. म्हटलं नकोच त्यापेक्षा.”

तो सहज बोलून गेला. त्यावर तिनेसुद्धा “हम्म” म्हटलं आणि पुन्हा त्याला डिवचत विचारलं,

“खरंच पण तू का एवढं केलंस माझ्यासाठी? एवढा त्रास का घ्यायचा?”

आणि मग स्वतःच हसत सुटली.

“नाही नाही मी उगाच तुझी मस्करी करत होते. खरंचं खूप थॅंक्यू.”

नंतर स्वतःच म्हणाली.

“पण मला द्यायचंय ना तुझ्या या प्रश्नांच उत्तर.”

तो गंभीर होत म्हणाला.

स्वतःच्या गाडीवरून उतरून तिच्या गाडीजवळ आला. तिला तो काय म्हणणार याचा अंदाज आला होता. मुलींना तो सिक्स्थ सेन्स असतो ना, तसच काहीतरी. पण तसं जाणवू द्यायचं नव्हतं. तो तिच्या आणखी जवळ आला,

“रेवा, मला तू खूप आवडतेस. हे असं सगळं तुझ्याऐवजी दुसरी कोणी असती ना तर कदाचित केलं असतं की नाही माहीत नाही. पण तुझ्यासाठी करताना खूप आनंद वाटत होता. त्याचा त्रास किंवा कष्ट नाही वाटले.”

“हां या आधीच बर्‍याचदा तुला सांगावसं वाटलं पण तुला कधी तसं कळू दिलं नाही मी. पण आज माहीत नाही का रहावलं नाही. तुझा धाडसी स्वभाव, समजूतदारपणा, बोलण्याची पद्धत, सगळ्यांना सहज आपलंसं करणं सगळंचं खूप आवडतं मला.”

“तुला काय वाटतं?”

तो तिच्या नजरेत नजर घालून बोलत होता. रेवाला मात्र काय बोलावं समजत नव्हतं.

“मी निघते आता. गुड नाईट. थॅंक्स फॉर एव्हरीथिंग.”

म्हणून ती निघाली. निखिल तिथेच उभा राहून तिला बघत होता.

त्या रात्री ती झोपू शकली नाही. त्याचे शब्द तिच्या कानात घुमत होते. त्याचा विचार टाळावा म्हटलं तरी टाळता येत नव्हता. विशेषतः त्याने केलेली मदत आणि रात्र झाली म्हणून घेतलेली काळजी.

नाहीतर तिला मित्रांची कमी नव्हती. पण रात्री उशिरा किंवा पावसापाण्यातही कोणी तिला असं घरपर्यंत सोडायला आला नव्हता.

“तुला काय गरज आहे? तुला कोण काय करेल? उलट तुझ्यापासून त्याला काही होऊ नये म्हणजे झालं. तुझ्यापेक्षा त्या समोरच्याची काळजी करायला हवी.”

अशी थट्टा सगळे मित्रमंडळी करायचे. पण कोणीतरी आपलीही काळजी घ्यावी, करावी असं तिला मनोमन वाटायचं. तिचा तो हळवा कोपरा आज सुखावला होता.

त्या आयोजकांना कव्हरेज फार आवडलं होतं. त्यामुळे दुसर्‍यादिवशी रेवाचं ऑफिसमध्ये कौतुक सुरू होतं. पण हे कौतुक निखिलच्या पथ्यावर पडलं आणि रेवाला नको असलेली अजून एक जबाबदारी तिच्यावर येऊन पडली.

त्या सोहनी उद्योग समुहाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये जाऊन मुलाखती घेऊन त्याचं कॉफी टेबल बूक बनवायचं होतं. ते काम रेवा आणि निखिलला सोपवण्यात आलं होतं. त्यासाठी त्या दोघांना सगळीकडे एकत्रच फिरावं लागणार होतं. रेवाला हे काम कंटाळवाणं वाटत असलं तरी निखिल मात्र फार खुश होता.

जवळपास २०-२५ दिवस हे काम सुरू होतं. दोघं एकत्रच प्रत्येक ठिकाणी जात होते. कारण ठिकाण निखिलला माहीत होतं तर मुलाखत ती घेणार होती. या काळात त्याने तिची घेतलेली काळजी, तिला वेळोवेळी प्रोटेक्ट करणं एक मुलगी म्हणून तिला फार आवडत होतं. त्यामुळे तिच्याही नकळत ती त्याच्यात गुंतत गेली.

त्यानंतर ऑफिसमधल्या इतर कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने सगळ्यांच्या नजरेपासून लपत त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. पण नंतर ही काळजी अती ‘पझेसिव्हनेस’ मध्ये बदलत गेली आणि तो रेवावर त्याचा हक्क समजू लागला. आणि यातच त्यांच्या नात्याने कलाटणी घेतली.
-------------------------------------------------------

क्रमशः
दीर्घ कथा ‘ती’चा लढा
भाग ७
धनश्री भावसार-बगाडे
असं काय झालं असेल दोघांमध्ये? नव्याने जुळलेलं हे नातं तुटलं असेल का? की मध्ये कोणी आलं असेल? जाणून घ्या पुढील भागात.

🎭 Series Post

View all