'ती' चा लढा भाग ८

रेवा आणि सोना दोघींच्याही आयुष्यातील महत्वाच्या वळणाविषयी सांगणारा भाग.
दीर्घ कथा
‘ती’चा लढा
भाग ८.
@ धनश्री भावसार बगाडे

गेली ५-६ वर्ष रेवा पुण्यात एकटी राहत होती. नवीन असताना आलेल्या पहिल्याच विचित्र अनुभवाने तिला सावध केलं होतं. तर तिच्या पत्रकारितेच्या क्षेत्राने निडर आणि खमकं बनवलं होतं. आईवडिलांच्या पंखाबाहेर पिल्लं पडली की जग त्यांना लहान वयातच बरच काही शिकवून देतं, तशीच तीही तयार झाली होती.

तसंही तिच्या घरी प्रत्येकाला स्वतंत्रपणे विचार करण्याचं, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य होतं. त्याच वातावरणात ती वाढली होती. त्यामुळे आजही ती प्रत्येक निर्णय एकटीने घेत होती. पण ही गोष्ट निखिलला खटकायची. त्यावरून त्यांचे वादही व्हायचे.

त्या दिवशी ते एका कॉफी शॉपमध्ये बसले होते. तिथे निखिल आधीच तिची वाट बघत बसला होता. ती कोणाशी तरी फोनवर बोलतच आत आली आणि त्याच्यासमोर बसली.

“हो हो, सोडलीये ती बातमी मी. येईल उद्या किंवा पर्वाच्या अंकात. तुम्ही नका काळजी करू. मी सांगते सरांना. हो परत आठवण करून देते.”

तिचं बोलणं सुरूच होतं. तसा निखिल वैतागला. फोन ठेव म्हणून तो तिला खुणावत होता. तिनेही बोलणं आवरतं घेत फोन ठेवला.

“काय हे किती वेळ फोन? इथे मला भेटायला आलीयेस ना? मग फोनवर काय बोलत बसलीयेस?”

तो चिडला होता.

“अरे हो. कामाचा फोन होता म्हणून बोलत होते ना. एवढा का वैतागतोय?”

ती समजावण्याच्या सुरात बोलत होती. त्यांनी कॉफी मागवली. तशी ती त्याला तिच्या नव्या बातमीविषयी सांगू लागली.

“सध्या मी एका खास बातमीवर काम करतेय. त्या वेश्या व्यवसाय करणार्‍या वस्तीत जाऊन त्यांच्या समस्यांसंदर्भात.”

तिचं हे वाक्य पूर्ण होत नाही तोच तो तिच्यावर चिडला.

“तुला कोणी सांगितलंय झाशीची राणी बनायला? कशाला असल्या वस्तीत जायचं? तुला काही झालं म्हणजे?”

“अरे, काही नाही होणार. त्या वस्तीत काम करणारी एक समाजसेवी संस्था आहे तिच्या सोबतच करतेय मी काम. आणि मी ऑफिसमध्येही सांगितलंय या विषयावर काम करतेय म्हणून.”

ती त्याला समजावून सांगत होती. पण तो काहीही ऐकायला तयार नव्हता.

“नाही. तू त्या वस्तीत जायचं नाही आणि काही अशी बातमी करायची गरज नाही. सांग तुझ्या सरांना तू नाही करणार म्हणून.”

“अरे असं काय करतोएस तू? ते काम आहे माझं आणि तुला वाटतोय तेवढा काही धोका नाही त्यात. मी घेईन ना स्वतःची काळजी.”

“मी सांगतोय ना तू तिथं जायचं नाही म्हणजे नाही.”

तिच्या समजावण्याकडे दुर्लक्ष करत तो त्याचा हट्ट सोडायला काही तयार नव्हता. ती त्याचं ऐकत नाही म्हटल्यावर त्याला अजूनच राग आला. जुने वादही तो उकरून काढू लागला.

“तुला माझं कधी ऐकायचंच नसतं. किती किती वेळ फोनवर बोलत असते. कोण कसा असतो हे पण तुला समजत नाही. अनोळखी नंबर पण तुला रिसिव्ह करायचाच असतो. त्या पी.आर. लोकांशी का बोलायचं असतं तुला एवढ्या वेळ? ते त्यांचं काम काढण्यासाठी लावतात तुला मस्का आणि तू पण देतेस लिफ्ट.”

त्याच्या या बोलण्यावर मात्र आता तिचाही पारा चढला.

“निखिल, उगाच तोंडाला येईल ते काहीही बोलू नकोस. तुझी काळजी समजते मला. पण म्हणून वाटेल ते नाही ऐकून घेणार मी. ते कामाचेच फोन असतात मला. मी पत्रकार आहे म्हटल्यावर मला अनोळखी नंबरचे फोन पण घ्यावे लागतात. बातमी संदर्भात असतात ते.”

“आणि तू काय मला बोलतोस रे? स्वतः किती वेळ फोनवर असतोस. तुझ्या कामात मी कधी लुडबूड करते का?”

“ते माझं काम आहे रेवा. मला कोणी काही करू शकत नाही. पण मला तुझं हे अती धाडसी होणं पटत नाही.”

“अरे, ह्याच स्वभावावर तर भाळला होतास ना तू?”

ती त्याच्याकडे त्रासिक मुद्रेने बघत विचारत होती. तेवढ्यात परत तिचा फोन वाजला. एका दिग्गज कलाकाराचं निधन झालं होतं. तिला ताबडतोब निघावं लागणार होतं.

तो फोन ऐकताच ती तशीच निघाली. खुणेनेच ‘मी निघाले’ असं तिने निखिलला सांगितलं.

तो रागावलेलाच होता. पुढचे २,३ दिवस त्याने तिचा एकही कॉल घेतला नाही की तिच्या मेसेजला उत्तर दिलं नाही.

त्यातच तिला ही तमाशा फडाची असाइंमेंट मिळाली. तो परत चिडेल म्हणून ती मुद्दामच त्याला न सांगता आली होती.

तिला अचानक कसलीतरी कुजबुज ऐकू आली आणि ती भानावर आली. फडातल्या सगळ्या मुली सोनाला समजावत होत्या. आणि सोना रडत होती.

“अरे देवा! आता काय झालं असेल?”

म्हणतच रेवा उठली. तिला येतांना बघून लगेच सगळ्यांच्या डोळ्यांनी खाणाखुणा सुरू झाल्या. तशा त्या बोलायच्याही थांबल्या. आणि उठून बाजूला झाल्या. रेवा सोनाजवळ गेली.

“काय झालं? राक्या परत काही बोलला का?”

ती विचारत होती. त्यावर तिने मानेनेच होकार दिला. आता यावर काय बोलावं तिला कळेना. पण तरीही तिने विचारलं,

“नेमकं काय झालं सांगशील का?”

“ह्या राक्याला माजी संम्दी कहाणी ठाव हाय. म्हया ईषयी ह्ये पन म्हाईत असून बी त्यो असा का वागतू त्येच कळत न्हाई.”

ती रडत रडत सांगत होती.

“हे माहितीये म्हणजे काय? काय माहितीये?”

तिचा हा प्रश्न ऐकताच बाकी सगळ्यांनी डोळे मोठे केले. सोनाला डोळ्यांनीच खुणावत काही सांगू नको म्हणत होत्या. तशी सोना पण गप्प झाली.

तेवढ्यात सोनाची आत्या नवीन हिरवं लुगडं घेऊन आली. सोनाला दाखवत म्हणाली,

“ह्ये बघ. छान हाये नव्हं? लग्नात ह्योच नेस.”

रेवाला काही कळेना.

‘कोणाचं लग्न?’

‘सोना आणि राक्या का भांडले?’

‘सोनाच्या आयुष्यात असं कोणतं गुपित आहे? जे सांगायला सगळे नाही म्हणताहेत?’

‘सोना आणि राक्याने काही चूक तर’

या विचाराने रेवा एकदम अस्वस्थ झाली. तिथे सुरू असलेली सगळी गडबड आणि सोनाचं रडणं याचा ताळेबंद मात्र तिला काही लावता येईना.
---------------------
क्रमशः
दीर्घ कथा ‘ती’चा लढा
भाग ८
धनश्री भावसार-बगाडे
खरच काय असेल सोनाचं गुपित? राक्या असा का वागला तिच्याशी? आत्या कोणाच्या लग्नाविषयी बोलत होती? जाणून घ्या पुढील भागात.

🎭 Series Post

View all