'ती'चा लढा भाग ९

सोनाच देवाशी लग्न होणार हे ऐकून गोंधळलेली रेवा काय करणार?
दीर्घ कथा
‘ती’चा लढा
भाग ९.
@ धनश्री भावसार बगाडे

रेवाने सोनाला पुन्हा विचारलं

“माझ्यावर विश्वास आहे ना?”

त्यावर सोनाने खाली बघत मानेनेच होकार दिला.

“झालं तर मग, मला सांग काय झालं? आणि कोणाच्या लग्नाला जाणारेस तू?”

सोनाने थोड्यावेळ तिच्याकडे बघितलं आणि एक मोठा श्वास घेत तिच्याजवळ मन मोकळं करू लागली.

“ताई, म्या आन राक्या तिकडं तंबूच्या मागं बसलू हुतू. त्यो म्हाया हात पकडतू त्ये आवडतं मला. पर आज त्यो लईच जवळजवळ करत व्हता. कोनी बघितलं असतं म्हंजी? म्हनून म्या त्याला जरा दूर व्हयला सांगितलं. तसा त्यो अजूनच चेकाळला आन.”

असं कसं बोलावं या विचाराने ती परत अडखळली. रेवाने तिला नजरेनेच परत विश्वास दिला तशी ती परत बोलती झाली.

“त्यो म्हाया चेहरा धरून व्हटांना. मला लई इचित्र वाटलं म्या त्याला दूर ढकललं. त्याचा त्याला लई राग आला. म्हाया थोबाडीत मारली आन काइबाई बोलला त्यो मला.”

सोनाच्या या बोलण्याने तिला निखिलसोबतचा तो प्रसंग आठवला.

त्या दिवशी निखिलच्याच विचारात असताना अनावधानाने रेवाच्या हातून बातमीत एक मोठी चूक झाली. ती तेंव्हा तिच्या लक्षात आली नाही. पण दुसर्‍यादिवशी बातमी छापून आल्यावर मात्र तिला फार ओरडा बसला. अगदी संपादकही मीटिंगमध्ये तिला रागावले. त्यामुळे तिचा मूड चांगला नव्हता.

चूक अनावधानाने झाली असली तरी मोठी होती. त्यामुळे ते प्रकरण लवकर निवळणारं नव्हतं. म्हणून रेवा टेंशनमध्येच होती. निखिल आणि रेवा दोघं वेगवेगळ्या विभागात असले तरी एकाच ऑफिसला असल्याने हे प्रकरण त्याला माहीत होतं.

ऑफिस संपल्यावर घरी जाण्याआधी रोजप्रमाणेच रेवा आणि निखिल रात्री झेड ब्रीजवर भेटले. नदीच्या वर हा पूल असल्याने छान गार मंद मंद वारा वहात होता. वातावरण आल्हाददायक होतं. पण रेवा मात्र टेंशनमध्येच होती.

निखिलने तिचा हात हातात घेतला. तशी तीही त्याच्याजवळ सरकली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून लांब कुठेतरी बघत होती. त्याचा मूड रोमॅन्टिक होता. तो बरच काही बोलण्याचा प्रयत्न करत होता. ही फक्त ‘हम्म’ करून प्रतिसाद देत होती.

“हम्म काय? बोल की काहीतरी. आज फार रोमॅन्टिक वातावरण आहे.”

तो पुन्हा म्हणाला. तिला त्याचा मूड घालवायचा नव्हता पण तीच खूप टेंशनमध्ये होती. ते ती त्याच्याशी शेअर करत होती. पण त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्याने एकदम तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले.

तिला काहीच कळेना. तिला ते नको होतं असं नाही पण तिची ती मनस्थिती नव्हती म्हणून ती थोडी लांब झाली.

तसं त्याने तिला अजूनच आवेगाने ओढत पुन्हा कीस करण्याचा प्रयत्न केला.

“नको यार निखिल. आज खरंच मूड नाहीये.”

ती त्याला दूर करत म्हणाली.

त्यावर तो चिडला.

“मूड नाही काय? किती छान वातावरण आहे आणि मला तू हवी आहेस या वातावरणात. आपण प्रेम करतो ना एकमेकांवर, मग एवढं तर तू मला देऊच शकतेस.”

आणि परत तिला जवळ खेचत जबरदस्ती कीस केलं.

त्यावर काही क्षणांनी भानावर येत ती वैतागली.

“तुला फक्त स्वतःचच पडलंय. इथे मी किती टेंशनमध्ये आहे त्याचं तुला काही नाही. तुला फक्त माझ्यावर अधिकार गाजवायचा असतो.”

असं म्हणून ती निघून गेली. नंतर दोन दिवस भेटी नाही. ऑफिस मधलं प्रकरण निवळल्यावर परत तीच गेली त्याच्याशी बोलायला.

हे सगळं आठवून तिच्या हृदयात एक बारीकशी कळ आली. पण भावना आवरत तिने सोनाकडे लक्ष वळवलं.

“हम्म, काय म्हणाला तो?

रेवाने विचारलं.

“त्यो म्हनला की, म्या त्याला आता मुद्दाम दूर लोटतेय. दुसरे मिलनार हायती म्हनून. असं कुटं असतय का ताई? म्हायं पिरेम हाये त्याच्यावर.”

“दुसरे मिळणार म्हणजे? असं का म्हणाला तो?”

तिने पुन्हा गोंधळात पडल्यासारखं विचारलं.

“ती पोरं मला तरास देत व्हती. आन हयो म्हंतोय म्याच त्यास्नी असं काइबाइ कराया उकसवते. त्यो म्हनतो परवा म्हायं देवा संगी लगीन हाय तर मंग म्या त्याला इसरून जाईन. असं कसं इसरून जाईन? पिरेम तर म्या त्याच्यावरच करते ना.”

“काय!”

रेवा एकदम चकीत होऊन ओरडली. त्यावर सोना पण एकदम दचकली.

“काय झालं ताई?”

सोनाच्या या प्रश्नावर तिने प्रतिप्रश्न केला,

“काय होणारे तुझं?”

आपण काहीतरी चुकीचं ऐकलं आहे असं तिला वाटत होतं.

“देवाशी लगीन. परवा हाय.”

हे ऐकून रेवाला धक्काच बसला. डोकं बधीर आणि कान सुन्न झाले. काही वेळ तिला काहीच सुचेनासे झाले, आजूबाजूचे आवाजही ऐकू न आल्यासारखे वाटायला लागतात. जर आवाज कानापर्यंत पोहोचलेच तर मेंदू पर्यंत मात्र पोहोचत नव्हते. तिचा चेहरा एकदम उतरला. या धक्क्याने चेहर्‍यावरचे बदललेले भाव बघून सोना घाबरली.

“ताई, ओ ताई.”

रेवाला हलवत ती आवाज देत होती. काही क्षणांनी ती भानावर आली. पण आज एवढ्या आधुनिक काळातही अजून लोक असे प्रकार करतात; यावर तिचा विश्वास बसेना. त्यात सोनाला ती लहान बहिणीसमान बघत असल्याने तिच्याबाबतीत तर हे तिला पटण्यासारखंच नव्हतं.

आपण काहीतरी चुकीचं ऐकलं म्हणून तिने पुन्हा पुन्हा सोनाला तेच ते विचारलं.

शेवटी तिने जरा चिडूनच तिला विचारलं,

“तुला माहितीये देवाशी लग्न म्हणजे काय?”

त्यावर सोना तेवढ्याच भोळेपणाने म्हणाली,

“व्हय. म्हायं देवसंग लगीन झाल्यावर मला दुसर्‍या कोनासंग लगीन न्हाई करता येनार. पर म्या पिरेम करू शकते. मले आईबापकडं र्‍हाता न्हाई येनार. पर तसं बी कुटं र्‍हाते?”

ती अगदी सहज बोलत होती. यावरून रेवाला समजलं की तिला देवाशी लग्न म्हणजे काय हे नीटसं माहीतच नाही.

“अगं, राणी देवाशी लग्न म्हणजे फक्त एवढंच नसतं.”

तिच्या या बोलण्याला तोडत तिची आत्या तिथं आली.

“आमच्या खानदानात पद्धत हाय तशी. पहिल्या मुलीस्नी देवाला सोडायची. म्हायं बी झालतं देवसंग लगीन. ही म्हाया भावाची पोर हाय. तिचं बी परवा हुनार हाय.”

आत्या सांगत होती.

“म्हाया येळी कोन बी नवतं म्हाया बगाया. त्यो काळ येगळा हुता. कसं पोट भरलं म्हायं मला म्हाईत. पर आता सोनाला तमाशात काम करता यील. म्हाया पोराने घराभाहेर काडलं. मंग या तमासानं आधार दिला.”

आत्या भावूक होत म्हणल्या.

“हिला बी व्हतील की पोरं.”

त्या पटकन बोलून गेल्या. त्यांच्या या वाक्यावर मात्र रेवा चिडली.

“कशाला? तुमच्यासारखे हाल व्हायला? तुम्ही हिला नीट सांगितलं तरी आहे का, एका देवदासीचं जीणं काय असतं ते? तुम्ही आत्या ना हिच्या, मग असं कसं करू शकतात तिच्यासोबत? किती लहान आहे ती. तिला काही कळतही नाही यातलं.”

ती तावतावाने बोलत होती. त्यावर आत्या जरा वरमली.

“त्यी बी आता वयात आली हाये. आन तशी रीतच हाये घरची.”

त्या जरा भीत पण ठामपणे म्हणल्या.

‘यांच्याशी बोलून काही उपयोग नाही’

हे तिच्या लक्षात आलं. ती सरळ सोनाकडे वळली.

“हे बघ बाळा, देवाशी लग्न म्हणजे आख्खं गाव तुला त्यांच्यासाठी खुलं समजेल गं.”

ती समजावण्याच्या सुरात बोलत होती.

“खुलं म्हंजी?”

सोनाने भोळसटपणे विचारलं. यावर काय बोलावं तिला कळेना.

“तुझ्या आत्याचं पण देवाशी लग्न झालं होतं. मग मूल कसं झालं?”

रेवाने तिला विचारलं.

“तिचं ज्याच्यावर पिरेम होतं त्याच्याकडून.”

ती सहज उत्तरली. आता मात्र रेवाची सहनशक्ती संपते की काय असं तिला वाटलं. तिने जरा चिडूनच म्हटलं,

“त्याचं खरंच प्रेम होतं का तुझ्या आत्यावर विचार जरा तिला. आणि मग तिला मूल झाल्यावर सांभाळलं का त्याने? त्या मुलाला त्याने त्याचं नाव दिलं का?”

आता मात्र आत्याच्या दुखर्‍या नसेवर रेवाने बोट ठेवलं होतं.

“तुमी नगा यात लक्ष घालू. ही आमची घरची भानगड हाय.”

असं म्हणून त्या सोनाला तिथून घेऊन गेल्या. पण आत्याच्या या वागण्याने सोनाच्या डोक्यात विचार सुरू झाले. राक्याची चिडचिड, आत्याचं वागणं आणि रेवाची चिंता याचा संबंध ती लावू लागली.

रेवाही चिंतेत कसल्यातरी विचारात हरवली. ती तडक उठली आणि ऑफिसला साठे सरांना तिने फोन लावला.
----------------------------------

क्रमशः
दीर्घ कथा ‘ती’चा लढा
भाग ९
धनश्री भावसार-बगाडे
रेवा देवाशी लग्न म्हणजे काय हे समजावू शकेल का सोनाला? यातून सोनाला ती कशी वाचवणार? कसल्या विचारात असेल ती? ऑफिसला फोन का लावला असेल? जाणून घ्या पुढील भागात.

🎭 Series Post

View all