'ती'चा लढा भाग १

तमाशाच्या फडात काही दिवस गेलेल्या पत्रकाराचा अनुभव अन् तिथल्या लोकांची कहाणी
‘ती’चा लढा
दीर्घ कथा भाग १.
@ धनश्री भावसार बगाडे

रात्रीचे साडे बारा वाजलेले. सोना लगबगीने फडाच्या तंबूत शिरली. डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा पुसत, ओघळणाऱ्या आसवांना सावरत ती घाईघाईत मेकअप ठीक करू लागली. मध्येच हाताच्या कोपराला तर कधी पायांच्या बोटांना फुंकर घालत तिची गडबड सुरू होती. तिच्या पाठोपाठ रेवा पण तंबूत गेली.

"अगं, किती सुजलाय तुझा पाय?

हाताचा कोपरा पण लालबुंद झालाय. त्याला काहीतरी औषध तर लाव. थांब माझ्याकडे बाम आहे तो लावते."

रेवा तिला म्हणतच होती तोवर फडाच्या ताई आत आल्या.

"ये बये, आवरकी पटापटा. आपल्याला काय हे नवीन हाय का, हात पाय धरुन बसायला? चल आवर, मला पण लुगडं बदलून लगेच फुडच्या गाण्याला उभं ऱ्हायचय."

ताईंचे हे शब्द ऐकताच सोना अजूनच वेगात आवरत जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात परत स्टेजच्या दिशेने पळाली.

तशा अजून दोघी जणी आत आल्या. त्यांची पण तीच लगबग. डोळ्यातल्या आसवांना आवरत दुखणं दुर्लक्षित करत कपडे बदलत होत्या.

रेवानं न राहून विचारलंच, “काय गं हे?” त्यावर रूपा म्हणाली,

"हे आमच्यासाटी रोजचंच असतं ताई. आता काय सांगणार, रात चढती तसा खेळला रंग अन् या बेवड्यांची दारू बी चढती. मंग काय मिळेल त्या बाटलीत दगड, माती भरून फेकून मरतात. राक्षस मेले, बाटली काचेची हाय की पिलास्टिकची त्ये पन न्हाई पाहत. लई जोरात लागतं ताई, पन सांगणार कुणाला? हित सगळ्यांची एकच कथा."

कपडे बदलत घाईघाईत बोलत ती पण स्टेजकडे निघून गेली.

रेवा आपली सुन्न नजरेने रूपाच्या दिशेने बघत राहिली.

‘अवघ्या जेमतेम सोळा, सतरा वर्षांच्या आहेत या मुली. एवढ्याशा वयात किती न काय काय सहन करताएत! परिस्थिती माणसाला लहान वयातच किती मोठ्ठं बनवते आणि आपण त्यांचं लहानपणं हरवलं म्हणत हाताची घडी घालून दुरूनच शेरेबाजी करत निघून जातो.’

रेवा स्वतःशीच विचार करत उभी होती.

रेवा पुण्यात एका प्रतिष्ठीत दैनिकात बातमीदार होती. नारायणगावचा ऊरूस खूप खास असतो असं ती ऐकून होती. तिथं राज्यभरातले वेगवेगळे तमाशाचे फड येतात हे संस्कृतिक बीट बघत असल्याने तिला माहीत होतं. त्यामुळे तिथे जाऊन या सगळ्याचा अनुभव घेण्याची संधी ती सोडेल कशी? ती तशी शहरी वातावरणात वाढलेली. फड, तमाशा ऐकून माहीत होतं. पण त्यांचं प्रत्यक्ष जगणं अनुभवण्याची ही पहिलीच वेळ होती.

सामान्य मध्यमवर्गीय आणि सो कॉल्ड चांगल्या घरातल्या लोकांनी विशेषतः मुलींनी या सगळ्यापासून लांबच राहावं, अशी तिच्या घरची पार्श्वभूमी. मुख्य बातमीदार साठे सरांनी तस थोडं अवघडतच या असाईनमेंटला जाण्याविषयी विचारलं होतं. तिने लगेच उत्साहात हो पण म्हटलं. पण मग सरांनीच आधी घरून परवानगी घेऊन यायला सांगितली.

मुलीनं एकटीनं तमाशाच्या फडात जाणं तेही दोन-तीन दिवस रहायला, तिच्या आई-वडिलांना हे पचायला जरा अवघडच होतं. पण शहरात वाढलेल्या तिला वेगळं वातावरण, गाव, शेत, तंबूत राहायचं, गावचा उरूस, बातमीदारीबरोबर खूप काही नवं शिकायला, अनुभवायला मिळणार यामुळे जायचं तर होतच. म्हणून घरच्यांची जरा नाराजी पत्करूनच या असाईनमेंटला ती आली होती.

बाहेरून पिक्चरच्या लावण्यांचा, शिट्ट्यांचा, कोणी मध्येच रिकामे डब्बे वाजवण्याचा आवाज जोरजोरात येत होता. खरंतर कानठळ्या बसतील एवढा मोठा तो आवाज होता. पण रेवाच्या मनाचा आसमंत जणू फक्त त्या दुखऱ्या पावलांमधल्या घुंगरांच्या आवाजाने व्यापला होता.

ती पण त्यांच्या मागेमागे स्टेजच्या दिशेने निघाली. गाण्यांच्या जोरजोरात वाजणार्‍या रेकॉर्डिंग बरोबरच ढोलकीची थाप आणि ताल धरत थिरकणार्‍या पावलांची जुगलबंदी चालू होती. मुख्य नाचणार्‍या ताईंच्या चेहर्‍यावरचे जरा शृंगारिक हावभाव सोडले तर बाकीच्या सर्वच चेहर्‍यावरच्या त्रासिक मुद्रा लपवत उसणं हसू आणून थिरकत होत्या. त्यांच्याबरोबर स्टेजही हलत होता. ‘पडतो का काय’, याचं भान ठेवतच सगळ्यांचा तिथला वावर होता.

“यार ती तिसर्‍या नंबरची बघ ना” एकाने दुसर्‍याच्या खांद्यावर हात टाकत म्हटले. तर दात विचकवत दुसर्‍याने त्यात हामी भरली,

“बघ तिचा पदर सरकलाय, याsssर माझे हात लई शीवशीवतायेत!” अन दोघही बिभत्स हसले.

हा सगळा प्रकार स्टेजच्या जवळ उजव्या बाजूला घडत होता, त्यामुळे रेवाला स्पष्ट ऐकू येत नसलं तरी हावभाव सगळं थेट सांगत होते. हा प्रकार तिला शिसारी आणणारा होता. सर्र्कन अंगावर काटाच आला. तिने निरखून बघितले तर ती पोरं जेमतेम १५-१६ वर्षांची असतील बहुतेक.

तो उधळलेला प्रेक्षकवर्ग जणू काही ती पहिल्यांदाच पाहत होती. सामान्यत: प्रौढ, सज्ञानी पुरुष मंडळी अशा फडाच्या तमाशांना येतात किंबहुना यावेत, असा तिचा समज इथे पार धुतला गेला. नुकतेच मिसरूड फुटलेल्यांची गर्दीही भरपूर दिसत होती. नव्हे नव्हे तेच अधिक जोशात माती, दगडाने भरलेल्या बाटल्या फेकून मारत होते. ज्यांना शिट्ट्या मारता येत नव्हत्या त्यांनी विकतच्या शिट्ट्या वाजवून आनंद घेतला. इथे उधळणारे फेटे नव्हते पण उधळलेले प्रेक्षक बघून चुकलेला काळजाचा ठोका सावरत ती विंगेत जरा मागे आडोशालाच उभी राहिली. तशी फड मालकांची सक्त ताकीदच होती.

तिच्यासाठी हे सगळं अनपेक्षीत नसलं तरी अंगावर येणारं होतं.

तमाशा पहाटे तीन, साडेतीन वाजेपर्यंत चालला. त्यानंतर सर्व मंडळी तंबूत परतली. रेवा साधारण दीड-दोन वाजेपर्यंत जागली नंतर तंबूत येऊन झोपी गेली होती. तिला जाग आली ती थेट मुख्य ताईंच्या आवाजाने. त्या तिला जेवायला उठवत होत्या.

“अहो, रिपोर्टर ताई उठता का? थोडं खाऊन मग झोपा. ऊठा की.” त्यांच्या या प्रेमळ हाकेने तिला जाग आली. पण डोळ्यावरची झोप आवरेना.

“किती वाजलेत?” तिने विचारलं.

“फाहटेचे च्यार वाजल्यात बघा. आज जरा उशीरच झाला.” सोना म्हणाली.

तसं डोळे चोळतच तिने सोनाकडे बघितलं. मेकअप उतरवून ती जेवायला बसत होती. तिच्या त्या सोज्वळ सौंदर्याकडे बघून हिला आपल्या लहान बहिणीची आठवण झाली, अन एक वेगळीच कणव मनात दाटून आली. एवढ्याशा या १४-१५ वर्षाच्या पोरीला इथं बोर्डावर का नाचवं लागतंय, काय असेल हिची कहाणी?
------

क्रमशः
दीर्घ कथा ‘ती’चा लढा - १
@ धनश्री भावसार-बगाडे

फडातल्या या २,३ दिवसात रेवाला अजून काय काय बघावं लागणार? इथे नाचणार्‍या या कोवळ्या मुलींची काय आहे कहाणी? रेवाला सोनाची कहाणी समजेल का? जाणून घ्या पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all