तिचा न्याय ( भाग एक )
विषय: तिचं आभाळ
विषय: तिचं आभाळ
शाळा सुटली. तसं तिला छातीत धडधडायला लागलं. शाळा सुटुच नये असं तिला वाटतं होतं. एकतर शाळेत येवूच नये किंवा आलं तर एकटं घरी जाऊच नये असं तिला रोज वाटायचं. घरी जातांना ती सारखी कोणाची ना कोणाची सोबत शोधायची. तिच्या घरची परिस्थिती चांगली नसल्याने ती नेहमी बुजलेली असायची.त्यामूळे तिला फारशा कोणी मैत्रिणी देखील नव्हत्या. पण ती हुशार असल्यामुळे तिच्या आई वडिलांना, तिने खूप शिकावं आणि नावं मोठं करावं असं वाटतं असे. त्या मुळे तिच्या मनात नव्हतं तरी ती रोज शाळेत येत असे. पण संध्याकाळ झाली की तिला कापरं भरे.
शाळेच्या समोर एक किलोमीटर पर्यंत एकच सरळ डांबरी रस्ता होता. तो रस्ता संपे पर्यंत बरीच गर्दी राहात असे. तो रस्ता संपला की तेथून त्या रस्त्याला तीन फाटे फुटत. एक रस्ता सरळ एस्टी स्टँडवर जाई. एक गावात जात असे आणि एक कच्चा रस्ता पिंपळाच्या पाराला वळसा घालुन नदीच्या कोरड्या पात्रातून रानातल्या तिच्या घराकडे जात असे. या रस्त्याचा वापर गावातले लोक फार कमी वेळा करतं. म्हणजे कधी कधी नदीच्या काठाचा स्मशान म्हणून उपयोग करत. त्याच वेळी त्या रस्त्यावर गडबड दिसे. दोन तीन दिवस माणसांची वर्दळ दिसत असे. नंतर पूर्ण शांतता असे. नदी ओलांडून थोडया अंतरावर काही दाट झाडी होती. आणि त्या पलीकडे तिचं घर होतं. तिच्या घराच्या आसपास दूरवर तुरळक वस्ती होती.
याचं पिंपळाच्या पाराखाली बसून पाटलाचा शहरात शिकणारा पोरगा तिची छेड काढत असे. आज महीना झाला, आठवडा बाजारात एकदा त्याची नजर तिच्यावर पडली . तेंव्हा पासून तिला बघून तो चेकाळला होता. वेड लागल्या सारखा तिच्या मागे मागे फिरत होता. त्याच्या ध्यानी मनी तिच त्याला दिसत असायची. त्याच्या सोबत गावातली काही मोकाट पोरं पणं असायची.
शाळा सुटल्या नंतर ती येतांना दिसली की ही मुलं पिसाळल्या सारखं करीत. शिट्टया वाजवत अश्लील हावभाव करीत. कधी द्वि अर्थाची गाणी म्हणत.
ती बिचारी, झाली मान घालून. जणू काही ते आपल्याला काही बोलतच नाहीत असं समजून घाईघाईने घराकडे येत असे. घरी पोहोचल्या वर, जरी घरी कोणी नसायचं तरी तिला हायसे वाटत असे.
पण घरी पोहोचेपर्यंत तिच्या जीवात जीव नसायचा.
पण घरी पोहोचेपर्यंत तिच्या जीवात जीव नसायचा.
त्या मुलांच्या खोड्या एव्हढ्या वाढल्या होत्या की तिला खरोखर शाळेत जाणं नकोसं झालं होतं. काही काही कारणं काढून ती शाळेत जायचं टाळायची. तर तिकडे शाळेत गैरहजर राहिली म्हणून शिक्षक तिला शिक्षा करायचे.
शेवटी तिने घरी तिच्या आईला ही गोष्ट सांगीतली. आईने वडिलांना सांगितलं. वडील म्हणाले,
" अग पोरी, आपण गुमान आपल्या रस्त्यानं चाललं तर कोण कशाला त्रास देईल बरं. अशा काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करावं बेटा. हे तुझं शिकायचं वय आहे. तिकडेच लक्ष दे "
तिची तगमग कोणाच्याच लक्षात येतं नव्हती. रोज ती जीव मुठीत धरून शाळेत जात येत होती. दिवसेंदिवस मुलांचं धाडस वाढतच चालल होतं.
एकदिवस...
( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी
लेखक: दत्ता जोशी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा