Login

तिचा न्याय ( भाग दुसरा )

एखाद्या स्त्री ने जर मनात आणलं तर ती कोणत्या थराला जाऊ शकते याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.


तिचा न्याय ( भाग दुसरा )

विषय: तिचं आभाळ

बोर्डाची परीक्षा म्हणून शाळेत एक्स्ट्रा पिरियड होते. तिला थांबायची अजिबात इच्छा नव्हती. तिचं अभ्यासात लक्षही लागत नव्हतं. ती सारखी होणाऱ्या अंधाराकडे बघत चुळबुळ करत होती. भीती मुळे तिच्या डोळ्यातून पाणी वाहात होते. शेवटी न राहवून तिने विचारलं,

" सर, मी जाऊ का घरी"

त्या बरोबर तिच्याकडे रागारागात बघत सर म्हणाले,

" आम्हाला काय काही कामधंदा नाही म्हणून आम्ही ह्या लष्कराच्या भाकरी भाजत असतो. काही जायचं वगैरे नाही. बस खाली."

ती हिरमुसली होऊन खाली बसली. जेव्हा क्लास संपला होता तेव्हा बराच अंधार झाला होता. तिने तिच्या जवळच्या मैत्रिणीला विचारलं .माझ्यासोबत येतेस का तर तिने नकार दिला. कसेबसे पाय ओढत ती घराकडे चालू लागली. जसा जसा पार जवळ येऊ लागला तस तस तिचं हृदय धडधडू लागल. दूरवरून जेव्हा ती येतांना दिसली . तेव्हा मुलं पार चेकाळलेली होती.

" अरे पाखरू आले रे. आज उशीर झाला आहे. अंधाराची मजा दाखवूया." असं काय काय बडबडू लागले. तिने झटपट चालण्याचा निर्णय घेतला आणि ती घाईघाईने चालायला लागली. जशी ती पाराच्या जवळ आली. तसं पाटलाच्या पोराने पाराच्या खाली उडी मारली. तिचा रस्ता अडवून म्हणाला,

" काय ग बरच माज आलाय की तुला. थांब ना जराशी. थोडावेळ गप्पा मारायला काय होते. मी घरी पोहोचवून देईल."

" काही नको उशीर झालाय .जाऊ द्या मला." ती हाताने त्यांना बाजूला करत म्हणाली. तसा तिचा हात धरून पाटलाच्या पोरांनी तिला जवळ ओढल.

*******

जेव्हा ती घरी पोचली होती. तेव्हा तिचे केस विस्कटलेले होते.अंगावरचे कपडे फाटलेले होते आणि तिला प्रचंड वेदना होत होत्या. कशीबशी ती घरी पोहोचली आणि आईच्या कुशीत शिरून तिने आकाश भेदून जाईल असा आक्रोश सुरू केला.

संध्याकाळी बऱ्याच उशिरा तिचे वडील घरी आले तेव्हा ती तापाने फणफणत अंतरावर पडलेली होती. तिच्या आईने तिच्या कपाळावर ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवलेल्या होत्या. तापात ती काय काय बडबड करत होती.

तिच्या आईने तिच्या वडिलांना सगळी हाकिकत सांगितली. तिच्या वडिलांनी पाटलाकडे जाण्याचा निर्णय घेतला. ते जेव्हा वाड्यावर पोहोचले तेव्हा पाटील बंगई वर झोके घेत होते. त्यांना नमस्कार करून तिच्या वडिलांनी त्यांच्या मुलाने त्यांच्या मुलीशी जे गैरवर्तन केलं होतं त्याची गोष्ट सांगितली. ती ऐकल्याबरोबर पाटील उलट त्यांच्यावरच भडकले आणि म्हणाले ,

" माजोरड्यांनो , तुम्हा लोकांना आम्ही गावात राहू देतो हेच आमचे चुकतय. खरं म्हणजे तुम्हाला जंगलात देखील राहू द्यायला नको. तुम्हा लोकांना फासा टाकायला आता माझा मुलगाच दिसला काय रे . अरे पैसे पाहिजे असतील तर तसं बोला ना."

आणि बोलता बोलता त्यांनी मुलाला हाक मारली,

" बाळ तू संध्याकाळी कुठे होतास  ? "तो मुलगा अगदी आज्ञाधारक असल्याप्रमाणे म्हणाला,

" बाबा मी संध्याकाळी देवळात गेलो होतो. खोट असल्यास माझ्या मित्रांना आणि पुजाऱ्याला देखील विचारा "

"ऐकलं का रे हरामखोरा काय म्हणतोय माझा मुलगा ते" असं म्हणून ते आत गेले पसाभर धान्य आणि काही पैसे त्यांनी त्याच्यापुढे ठेवले आणि म्हणाले,

" हे बघ आता गुमान घरी जायचं. हे पैसे घे आणि मुलीचा उपचार कर. कुठे काय बोलू नकोस. आणि माझ्या  मुलाचं नाव तर अजिबातच घेऊ नकोस. नाहीतर माझ्याशी गाठ आहे. आधी स्वतःच्या पोरीला सांभाळायला शिक. मग वाड्यावर ये"

तो नजरेआड झाल्यानंतर ते मुलाकडे वळले आणि म्हणाले,

" धाकटे पाटील ,अजून तुम्ही लहान आहात. शिक्षण घ्यायचं तुमचं वय. एवढ्या लहान वयातच पाटीलकी सुरू केली की काय तुम्ही ."

तिकडे रानातल्या झोपडीत तिची आई मात्र तिचं अंग शेकत होती. तिच्या वडिलांनी पाटलांकडून आणलेले पैसे तिच्यासमोर ठेवताच. तापाने अंथरूणात पडलेली  ती ताडकन उठून बसली. रागारागाने ते पैसे अंधारात फेकून देते ती म्हणाली,

" बाबा त्यांनी विकत घेतलं हो तुम्हाला" असं म्हणत एखाद्या श्वापदाप्रमाणे ती किंचाळू लागली. तशा तापाच्या अवस्थेत ती अंधारात तीरासारखी बाहेर पडली आणि वाटे फुटेल तिकडे जाऊ लागली.