Login

तिच्या पगारावर हक्क कुणाचा भाग १

कमावाती असून नवऱ्यावर विसंबून असणाऱ्या गृहिणीची कथा
“अहो ऐकाना, मी काय म्हणते” मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेल्या आपल्या नवऱ्याकडे पहात तेजश्री म्हणाली.

“बोल, ऐकतोय मी” तिच्याकडे न पहाता तो म्हणाला.

“पैसे हवे होते”

“किती?”

“तीस हजार”

“काय?” आकडा ऐकून अनिकेत तीन ताड उडाला.

“कशाला”

“आईने मागितले आहेत. जागृतीच्या डिलिव्हरीच्या वेळी लागले तर दे म्हणाली. दोन तीन महिन्यात एकरकमी परत करेन म्हणत होती म्हणजे त्यांनी सगळी सोय केली आहे पण ऐनवेळी सिझर करावं लागलं तर तू पुढे कर म्हणाली.”

“तुझ्या बहिणीच्या डिलिव्हरीचा खर्च तिचा नवरा करेल मी कशाला करू?”

“पहिलं बाळंतपण माहेरी असतं. जागृतीच्या सासरचे कसे आहेत तुम्हाला माहित आहे ना. उगच पैशावरून वाद नको…असं आईला वाटतं”

“दयायची वेळ आली की छोटा जावई आणि मागायची आली की मोठा हे बरं आहे.”

“काहीही काय बोलताय. इतक्या वर्षात पहिल्यांदाच मागितले त्यांनी पैसे. दिवाळसण असो की अधिकमास दोन्ही जावयांना सगळं सारखं केलंय आईबाबांनी. तुम्हाला तर ज्येष्ठ जावई म्हणून जागृतीच्या लग्नात अंगठी देखील दिली.

“ती त्यांनी दिली मी मागितली नाही.”

“तुझे आई बाबा इथे येऊन रहातात. मागच्या महिन्यात तू जागृतीचं डोहाळजेवण थाटामाटात केलंस मी काही बोललो का?”

“म्हणजे आता माझ्या बहिणीचे पुरवलेले डोहाळे सुद्धा काढणार तुम्ही”

“तस म्हणायचं नव्हत मला…आपण जागृतीच्या लग्नात घसघशीत आहेर केला. बरश्याच्या वेळी पण रीतीप्रमाने सगळं करूच की…रीतिभातीच करायला माझी ना नाही पण असे उचलून पैसे देणे मला जमणार नाही.” जरा जास्तच आणि चुकीचं बोललो लक्षात आल्याने अनिकेतने सारवासारव केली.

“माझी बहिण देखील कधीच रिकाम्या हाताने येत नाही. सानवीचे किती लाड करते ती. सारखं तिला काही ना काही पाठवत असते. आम्ही दोघी बहिणीच. भाऊ असता तर त्याने घेतली असती जवाबदारी. माझं मोठी बहिण म्हणून काहीच कर्तव्य नाही का?”

“थोड समजून घे तेजू, वाढते खर्च आहेत. कार लोन…भविष्यासाठी सेविंग नको का करायला.”

“हा विचार हर्षदच्या ॲडमिशनच्या वेळी पैसे कमी पडत असताना शिवला का तुमच्या मनाला. दहा मिनिटात आरतीताईंच्या अकाउंटला पैसे ट्रान्स्फर केलेलं. तुम्ही तुमच्या बहिणीला मदत करू शकता मी नाही.” तेजश्रीचा आवाज वाढला होता.

खरं तर तेजश्री नोकरी करत होती. पण तिची नोकरी पार्ट टाईम होती. शेजारच्या गल्लीतील डॉ. जोशींच्या क्लिनिक मध्ये ती जॉब करत होती. पार्ट टाईम नोकरीत कितीसा पगार मिळणार, जो मिळायचा तो ही कॅश मध्ये. दूध, भाजीपाला, खाऊ, बिस्किटे यामध्ये पगार खर्च होऊन जायचा. किरकोळ खर्च तेजश्रीच्या पगारातून करायचा आणि मोठे खर्च अनिकेतच्या असं त्यांचं ठरलं होत. सगळा पैसा अनिकेतच्या अध्यारीखेत त्याच्या बँकेत होता. तेजूचा बँक बॅलन्स निल होता. तिने कधी सेवींग केलंच नाही. मागितले की नवरा देणार ह्यावर तिचा ठाम विश्वास होता. पण ह्यावेळी त्याने तो फोल ठरवला होता.

मनात आणलं असत, शोधली असती तर तेजश्रीला सुद्धा चांगली नोकरी मिळाली असती पण तिच्या नोकरी करण्याला अनिकेतचा विरोध होता. आताची नोकरी पाच मिनिटांच्या अंतरावर आहे म्हणून तो तिला करू देत होता.

“सानवीची शाळा, तिचं शेड्युल सांभाळून जमत असेल तर कर अन्यथा नको. तिची अबळ झालेली चालणार नाही” अनिकेतने तेजश्रीला निक्षून सांगितले होते आणि अर्थात तेजश्रीची सुद्धा सानवी हीच फर्स्ट प्रायोरिटी होती. मुलीला डे केअरमध्ये ठेवून तिलाही नोकरी करायची नव्हती.

“नाही जमत कसं सांगू आईला” रडवेल्या झालेल्या तेजश्रीने आशेने अनिकेतकडे पाहिले. तो कूस बदलून झोपला होता. त्याच्या लेखी हा विषय संपला होता.

तेजश्री मात्र रात्रभर तळमळत होती….

क्रमशः

अनिकेत देईल का तेजश्रीला पैसे? ती मदत करू शकेल का आईवडिलांना पाहूया पुढील भागात…