Login

तिच्या पगारावर हक्क कुणाचा भाग २ ... अंतिम भाग

कमवती असूनही नवऱ्यावर अवलंबून असणाऱ्या गृहिणीची कथा
“तुम्हाला इन्सेनटिव्ह मिळाला ना मागच्या आठवड्यात. त्यातून देऊ यात का?” दोन दिवसांनी तेजश्रीने पुन्हा विषय काढला.

“मार्केटिंगचा जॉब म्हणजे खायचं काम नाही. उन्हातान्हात फिरावं लागतं. ऑर्डर मिळवण्यासाठी वणवण भटकाव लागत. तेव्हा कुठे टार्गेट पूर्ण होत, इन्सेनटिव्ह हातात येतो. डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये बसून पुड्या बंधण्या इतकं सोपं नसतं. माझ्या कष्टाचा पैसा असा उधळणार नाही. तुम्हा दोघींना नाही म्हणतो का मी कशाला?” अनिकेतचा आवज वाढला होता.

तसं पहायला गेलं तर कशाचीच कमी नव्हती तेजश्रीच्या संसारात. अर्थात ती देखील निगुतीने संसार करत होती. अनिकेत तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होता. ह्याच वेळी तो का अडून बसला आहे तिला कळत नव्हतं. कदाचित जागृतीच्या नवऱ्याच आणि त्याच फारस पटत नव्हत म्हणून…..अनिकेत पैसे देवो अगर न देवो मी मदत करणार मनाशी ठरवत तेजश्री निमूटपणे आपल्या कामाला लागली.

पण कशी?... हा प्रश्न सारखा तिला सतावत होता.

नोकरी करत नसते तर गोष्ट वेगळी होती. नोकरी करून सुध्दा आईला मदत करता येत नाही, मेल्याहून मेल्यासारखी आवस्था झाली होती तेजश्रीची. आईने आपल्या लेकिकडे पहिल्यांदा हक्काने पैसे मागितले. आईला काय माहित आपली मूर्ख मुलगी कमवती असून देखील पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून आहे. अडीच तीन वर्षापासून नोकरी करत असून तिच्या गाठीशी दमडी नाही. तिचं विचारचक्र सतत चालू होत. कशात लक्ष लागत नव्हत.

“काय होतय तेजू, बरं वाटत नाही का?” क्लिनिक मध्ये तेजश्री सोबत काम करणाऱ्या सावंत मॅडमने विचारले.

“थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे” तिने आपली अडचण त्यांना सांगितली.

“डॉक्टरांकडून अॅडव्हान्स घे. नंतर पगारातून वळते करून घ्यायला सांग. दिवाळीच्या वेळी गावी जाताना मी सुध्दा घेतले होते. सर नक्की देतील आणि समजा नाही म्हंटले तर, माझ्या ओळखीच्या एक बाई व्याजाने पैसे देतात त्यांच्याकडून घेऊन देऊन. मी गॅरेंटर म्हणून सही करेन.”

सावंत मॅडमने झटक्यात प्रश्न सोडवल्यामुळे तेजश्री रिलॅक्स झाली.

पुढे थोडे दिवसांनी जागृतीची डिलिव्हरी नॉर्मल झाल्याने आईला लेकिकडे पैसे मागायची वेळच आली नाही.

“अग खरचं नकोत. बारस पण दोन अडीच महिन्यांनी जागृती सासरी गेल्यावर तिकडे करायचं तिच्या सासरचे म्हणत आहेत. बारश्याचा सगळा खर्च तेच करणारं आहेत. त्यामुळे आता काहीच टेन्शन नाही.” आई म्हणाली.

‘भगवंता माझी लाज राखलीस’ म्हणत त्यादिवशी तेजश्री हूमसून हमसून रडली.

झालं ते झालं ह्यावेळी निभावलं गेलं. परत कधी गरज लागली आणि अनिकेतने पैसे दयायला नाही म्हणाला तर…आता तरी शहाणं व्हायचं तेजश्रीने मनोमन ठरवलं.

“अहो, दूधाच बिल दयायचं आहे” काही दिवसांनी तेजश्री नवऱ्याला म्हणाली.

“मग दे की. तुझा पगार झाला असेल ना.”

“नाही अजून. यापुढे माझा पगार पण बँकेत जाणार. चेक टाकला आहे एक दोन दिवसात क्लिअर होईल.”

“ठीक आहे. मग दोन दिवसांनी दे दूध बिल”

“माझा पगार मी सेव्ह करायचा ठरवला आहे. दूध, भाजीपाला, किराणा अश्या किरकोळ गोष्टीत खर्च न करण्याचं ठरवलं आहे. कधी मोठा खर्च आ वासून उभा राहिला तर ते पैसे आपल्याच कामी येतील.” ती रागाने म्हटंली.

“आईला हवे असतील ते दे पैसे. मी करतो ट्रान्स्फर.” तिच्या बोलण्याचा रोख त्याला कळला होता.

“नको. त्यांनी केलं मॅनेज. परत कधी लागले तर त्यांना कोणापुढे हात पसरायला नकोत म्हणून मी सेविंग करायचे ठरवले आहे. यापुढे दर महिन्याला घरखर्चासाठी तुम्ही मला पैसे दयायचे. माझा पगार बँकेत जमा राहील.”

तेजश्रीला पैसे देऊन टेबलावर ठेवलेला डबा घेवून काही न बोलता चूपचाप अनिकेत ऑफिसला गेला.

त्याचवेळी चेक पास झाल्याचा, पगार बँकेत जमा झाल्याचा मेसेज आला. 'माझ्या पगारावर हक्क माझाच' मेसेज पाहून तिचा स्वाभिमान सुखावला. यापुढे आपला पगार किरकोळ गोष्टीत खर्च न करण्याचा, आपल्या बचतीच्या निर्णयावर ठाम रहाण्याचा दृढ निश्चय तेजश्रीने केला.