तिचा प्रतिशोध ( भाग १ )

एका आत्म्याचा झालेल्या अन्यायाचा सूड
तिचा प्रतिशोध.
भाग १

"आज मी तुझं काहीही ऐकणार नाही. कुठे जमवलं नाहीस असे म्हणतोस ना? तर माझ्याबरोबर आज मॅरेज ब्युरो मध्ये यायचं आणि स्वतःची प्रोफाइल तयार करायची. समजलं ना? माझ्या मैत्रिणीने चार वर्षांपूर्वी तिच्या लेकीचे नाव 'लग्नबंध' मॅरेज ब्युरो मध्ये घातलं होतं. तेव्हापासून ती माझ्या मागे लागली आहे की या संस्थेमध्ये लेकाचे नाव घाल. बघ, तिच्या लेकीला कसा मनाजोगता नवरा मिळाला. मला देखील वाटत ना आता सून घरी यावी म्हणून?

थोडीथोडकी नाही तर बत्तीशी झाली रे तुझी. मला माहिती आहे तू लग्नाला का तयार नाहीस; पण बाळा, आपण आपलं जीवन पुढे नेले पाहिजे ना? किती दिवस असा एकटा राहणार आहेस? ते काही नाही, आज ऑफिसमधून सुट्टी घ्यायची असेल तर सुट्टी घे नाहीतर हाफ डे ये. आता खूप झाली तुझी चालढकल. व्यवस्थित सेटल देखील आहेस." सीमाताई आपल्या लेकाला सुमितला ओरडत होत्या.


"काय ग आई! रोज काय माझ्यामागे लागते आहेस? मला इतक्यात लग्न नाही करायचं आहे. तुला सगळं माहिती आहे; पण तू म्हणतेस तर आज संस्थेमध्ये नाव घालूया. ठीक आहे? झालं ना तुझं समाधान?" सुमित वैतागून म्हणाला.


"माझं गुणाचं ग लेकरू." सीमाताईंनी सुमितच्या तोंडावरून हात फिरवून सुमितची दृष्ट काढली आणि सीमाताईंनी लगेचच त्यांच्या मैत्रिणीला फोन करून मॅरेज ब्युरोमध्ये स्वतःचा रेफरन्स द्यायला लावला.


'आज काही आई आपलं ऐकणार नाही. चला सुमितजी, आईबरोबर मॅरेज ब्युरो मध्ये चला.' सुमित मनाशी पुटपुटला.

त्याने सुट्टीसाठी ऑफिसमध्ये मेल टाकला आणि आईबरोबर निघाला. सीमाताई अगदी लगबगीने सुमितच्या गाडीत बसल्या. आता त्यांना त्यांच्या लेकाच्या लग्नाचा ध्यास लागला होता.


सुमितने त्याची गाडी मॅरेज ब्युरोच्या आवारात पार्क केली. गाडीतून उतरल्यावर त्याला त्याच्या बाजूने काहीतरी सळसळत गेल्यासारखे वाटले. ती एक वेगळी शक्ती आहे असे त्याला जाणवले. सुमित एकदम दचकला; पण आपल्याला काहीतरी भास झाला असेल असे वाटून त्याने विचार झटकला आणि तो संस्थेमध्ये शिरला.

'लग्नबंध' ही संस्था एक पन्नाशीतील महिला चालवत होत्या. सीमाताई आणि सुमित त्यांच्यापाशी गेल्यावर त्या अदबीने उठल्या.

"या, या मिसेस रणदिवे. तुम्ही येत आहात ते मला कांचन पाध्येंनी सांगितलंय." संस्थेच्या सर्वेसर्वा शीला प्रभुणे म्हणाल्या.

"हो. कांचनकडून तुमच्याबद्दल बरंच ऐकलं आहे त्यामुळे लेकाचं नाव इथेच घालायचे ठरवले. हा माझा मुलगा सुमित. बत्तीस वर्षांचा आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, ऑफिसमध्ये उच्च पदावर असून त्याला सहा आकडी पगार आहे. त्याला अनुरूप अशी मुलगी संस्थेमधून मिळेल ना?" सीमाताई म्हणाल्या.

"हो नक्कीच. माझ्याकडे खूप छान आणि शिकलेल्या मुली आहेत. तुम्हाला पाहिजे तशी सून मिळेल ही माझी हमी. बरं हा फॉर्म भरून द्या. तुमची सगळी माहिती आणि अपेक्षा सगळं नमूद करा." सौ. प्रभुणे म्हणाल्या.


सुमितने सगळी माहिती व्यवस्थितशीर भरली. फॉर्म वर एक नजर प्रभुणेंनी टाकली.

"ओके! मी आता ही सगळी माहिती फीड करते. तुमचे दोन-तीन फोटो आणि आधार कार्ड वगैरे आणले आहेत ना?" प्रभुणेंनी सुमितला विचारले.


"हो मी सगळं आणलं आहे." सुमित म्हणाला आणि त्याने हवी ती कागदपत्रे सबमिट केली.


"ओके. मी तुमची सगळी माहिती फीड केली आहे. दोन तासांनी तुमची प्रोफाइल ऍक्टिव्ह होईल. त्यानंतर तुम्ही मुलींच्या प्रोफाइल पाहू शकता." प्रभुणे म्हणाल्या.


संस्थेमध्ये पैसे वगैरे भरून सुमित आणि त्याची आई घरी जाण्यास निघणार इतक्यात सुमितला दारात एक अस्पष्ट आकृती दिसली. ती आकृती जणू त्याच्याकडे पाहत होती असे त्याला जाणवले. तो पुन्हा घाबरला; पण त्याला वाटले की हा देखील एक भास झाला असेल. गाडीत बसताना पुन्हा त्याच्या बाजूने काहीतरी सळसळत गेल्यासारखे त्याला वाटले. आता मात्र त्याला दरदरून घाम फुटला.


"काय झालं सुमित? इतका घाबरल्यासारखा का वाटतो आहेस?" सीमाताईंनी विचारले.


"काय माहित आई, मगासपासून सारखे कसलेतरी भास होत आहेत गं." सुमितने सीमाताईंना सांगितले.


"कसले भास होत आहेत तुला? कितीवेळा सांगितलं की त्या मेल्या हॉरर मुव्ही बघत जाऊ नको; पण ऐकतं कोण? चल आता घरी जाऊया. मी तुला मस्तपैकी चहा करून देते. मग आपण मुलींच्या प्रोफाइल पाहूया. ठीक आहे?" सीमाताईंनी समजावले.


आईने समजावून देखील सुमितचे चित्त थाऱ्यावर नव्हते. आज असे अचानक त्याला भास होत असल्याने मनातून तो पुरता घाबरून गेला होता.


सीमाताईंनी सुमितला आले, गवती चहापात घालून चहा करून दिला. सुमितचा चहा पिऊन झाल्यावर सीमाताईंनी लॅपटॉपवर संस्थेची साईट उघडली. लगेच बऱ्याच मुलींच्या प्रोफाइल दिसू लागल्या. तितक्यात त्यांचे लक्ष गेले एका मुलीने सुमितच्या प्रोफाइलसाठी इंटरेस्ट दाखवला होता. तिचा इनबॉक्स मध्ये मेसेज आला होता. सीमाताईंनी प्रोफाइल ओपन केली. त्या मुलीचे नाव सावनी दांडेकर होते. ती दिसायला अतिशय सुंदर होती आणि तिचे शिक्षण, नोकरी सारं काही सुमितला साजेसे होते. सीमाताईंना सावनीची प्रोफाइल खूप आवडली. त्यांना वाटू लागले की हीचं मुलगी आपली सून म्हणून यावी. लागलीच त्यांनी सुमितला तिची प्रोफाइल दाखवली.

तिचा फोटो पाहून सुमितच्या घशाला कोरड पडली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले आणि त्याच्या तोंडून नाव बाहेर पडले, "ऋतुजा.."

कोण आहे ही ऋतुजा? आणि तिचा सुमितशी काय संबंध आहे? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©® नेहा उजाळे
_________

🎭 Series Post

View all