तिचा प्रतिशोध ( भाग २ )

एका आत्म्याचा झालेल्या अन्यायाचा सूड
तिचा प्रतिशोध.
भाग २

"अरे सुमित, ही ऋतुजा नाही आहे. काय बडबडतो आहेस? नीट बघ ही सावनी आहे." सीमाताई म्हणाल्या.

सुमितने परत एकदा नीट फोटो पाहिला आणि ती ऋतुजा नाही हे त्याच्या लक्षात आले. ऋतुजाची आठवण येताच त्याचे मन त्याला खाऊ लागले अन् तो भूतकाळात शिरला.


सुमितचे बाबा त्याच्या लहानपणीच वारले असल्याने त्याच्या आईने नोकरी करून त्याला मोठे केले, चांगले शिक्षण दिले होते. त्याने एका प्रख्यात कॉलेजमधून एम.बी.ए.ची डिग्री घेतली होती. साहजिकच त्याला कॉलेजच्या प्लेसमेंटमधून लगेचच जॉब मिळाला होता.


सुमित जरी अभ्यासात हुशार असला तरी आईच्या अति लाडाने तो हट्टी झाला होता. सुमित दिसायला रुबाबदार असल्याने त्याच्या मागेपुढे मुली गोंडा घोळवत असत त्यामुळे मुली म्हणजे केवळ टाईमपासचे साधन असे त्याला वाटे. कित्येक मुलींना त्याने नादी लावले होते. काही मुली त्याच्यावर खरेखुरे प्रेम करत होत्या तर काही त्याच्याबरोबर टाईमपास. एकंदरीत त्याचे सारे काही आलबेल चालले होते.


पहिल्या नोकरीत अनुभव घेतल्यावर त्याने दुसरीकडे अर्ज केला. ह्या जॉबमध्ये त्याला पद आणि पगार दोन्हीही उत्कृष्ट मिळणार होते. लगेचच त्याने पहिली नोकरी सोडली आणि दुसरीकडे रुजू झाला.


नवीन ऑफिसमध्ये रूजू झाल्यावर त्याची ओळख ऋतुजाशी झाली. ऋतुजा जरी सावळी असली तरी अतिशय रेखीव होती. तिची पाच फूट सात इंच उंची, कंबरेपर्यंत तिचे रुळणारे दाट काळेभोर केस याने तिला पाहून कोणीही प्रेमात पडेल अशी होती. तिच्यासाठी अनेक मुले झुरत होती; पण तिने कोणाला कधी भाव दिला नव्हता. सुमितला पाहून मात्र तिची विकेट उडाली होती.


मुलींच्या बाबतीत कधीच सिरीयस नसलेल्या सुमितने ऋतुजाशी प्रेमाचे नाटक करण्यास सुरुवात केली. ऋतुजा त्याच्या गोड बोलण्याला फसली आणि त्याच्या जाळ्यात अडकली.


सुमितचे ह्या जॉबमधील पद उच्च असल्याने आपल्या इमेजला कुठला धक्का लागता कामा नये ह्याची काळजी घेऊन तो ऋतुजाबरोबर फ्लर्ट करत होता. ऋतुजा त्याच्यामध्ये इतकी गुरफटली होती की सुमितचे देखील आपल्यावर खूप प्रेम आहे असे तिला वाटत होते. हळूहळू सुमितने तिच्या स्वभावाचा फायदा घेत तिला आता तो दोनचार दिवस कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला नेऊ लागला. अश्यातच निसर्गाने त्याचे काम चोख केले आणि ऋतुजाला दिवस गेले होते.


"सुमित, मला दिवस गेले आहेत. आपण लवकरात लवकर लग्न करूया." ऋतुजाला समजताच तिने हे सुमितच्या कानावर घातले.


"काय? काय बोलते आहेस? तू वेडी आहेस का? मला इतक्यात लग्न करायचे नाही. मला माझे ध्येय साध्य करायचे आहे. ते काही नाही. तू लवकरात लवकर अबॉर्शन कर." सुमितचे ठरलेले उत्तर.


"सुमित, मी अबॉर्शन करणार नाही. मला हे बाळ हवे आहे आणि तू देखील. आपल्या दोघांच्या घरी आपण सांगूया आणि लग्न करूया. आपण लग्नानंतर सुद्धा आपले ध्येय पूर्ण करू शकतो. चल आता घाई करावी लागेल. मी माझ्या घरी आजच कल्पना देते. तू देखील तुझ्या आईला सगळं सांग." ऋतुजा म्हणाली.


लग्नबंधनात अडकल्यावर वेगवेगळ्या मुलींबरोबर फ्लर्ट करता येणार नाही शिवाय मला माझ्या जीवनात खूप पुढे जायचे आहे. आतापासूनच जर मी बंधनात अडकलो तर तिथून बाहेर पडायचे मुश्किल होऊन जाईल. असा विचार डोक्यात येताच त्याला एक भयंकर कल्पना सुचली.

"ऋतुजा, तू म्हणतेस तर आपण लग्न करूया. अगदी लवकरात लवकर. माझी चार दिवसांनी महाबळेश्वरला एक मिटींग आहे. मी एक काम करतो, मी तिथून आल्यावर तुझ्या घरी माझ्या आईलाच घेऊन येतो आणि तुला डायरेक्ट मागणी घालतो. ठीक आहे? खुश ना?

बाय द वे, तूही माझ्याबरोबर महाबळेश्वरला चल ना. माझी मिटींग पण होईल आणि आपलं फिरणं देखील होईल." सुमित म्हणाला.


"सुमित, मी येईन तुझ्याबरोबर महाबळेश्वरला. पण पावसाच्या दिवसात अशा अवस्थेत महाबळेश्वरमध्ये मी कशी फिरू शकेन?" सुमितच्या बोलण्याने हरकलेल्या ऋतुजाने विचारले.

"अगं मी तुझ्यासोबत असताना तुला कसली आली आहे भीती? आता जन्मोजन्मासाठी आपण दोघे एकत्र बांधले जाणार आहोत. तुझ्या आईला फक्त एक कल्पना देण्यासाठी म्हणून सांगून ठेव की मी तुला मागणी घालायला येणार आहे आणि तू माझ्याबरोबर महाबळेश्वरला येते आहेस हे देखील सांग. चल आज लंचसाठी बाहेर जाऊया." सुमित म्हणाला.


“हॅलो माय फ्रेन्ड्स! मी तुम्हा सर्वांना एक गुड न्यूज देतो आहे.” सुमितने केबिनच्या बाहेर येऊन सगळ्या स्टाफचे लक्ष त्याच्याकडे वेधले.

“अँड द न्यूज इज.. मी आणि ऋतुजा आम्ही दोघे लवकरच लग्न करणार आहोत." सुमितच्या वाक्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दोघांचे अभिनंदन केले आणि त्याच्याकडून पार्टीसाठी घोषा लावला.


"येस! पार्टी तो बनती है. आज सगळ्यांसाठी माझ्यातर्फे लंच. मी सगळ्यांना ऑफिसमध्येच जेवण मागवतो. सगळे खुश ना? आणि हो, आमच्या लग्नानंतर तुम्हा सर्वांना माझ्याकडून ग्रँड पार्टी देखील देईन मी."

सुमितने ऋतुजाकडे पाहिले असता ती प्रेमाने सुमितकडे पाहत होती. सुमितसारखा प्रेम करणारा नवरा तिला लाभणार होता म्हणून तिला अत्यानंद झाला होता. त्यात सुमितने सगळ्या स्टाफसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिल्याने सुमितबद्दल तिचे प्रेम अजून घट्ट झाले.


ऋतुजाने तिच्या आईला सुमितबद्दल सगळी कल्पना दिली. सुमित ऋतुजाच्या आईवडिलांना भेटून आला. महाबळेश्वरवरून आल्यावर त्याच्या आईला तो त्यांना भेटवेल असे सांगून आला. ऋतुजाच्या आईवडिलांना सुमित पसंत पडला होता. सुमितसारखा कर्तबगार आणि रुबाबदार नवरा आपल्या लेकीला मिळणार आहे ह्या गोष्टींमुळे ऋतुजाची आई खूप खुश होती. तिने अगदी हसत हसत ऋतुजाला सुमित सोबत जाण्याची परवानगी दिली.

ऋतुजाने मात्र तिला दिवस गेले आहेत ही गोष्ट तिच्या आईपासून लपवून ठेवली. तिला वाटले, आता लगेचच तिचे लग्न होणार आहे तर कशासाठी आईला ही गोष्ट सांगायची?


इकडे सुमितने देखील त्याच्या आईला ऋतुजाबद्दल सगळी कल्पना देऊन ठेवली होती. सुमितच्या आईला आपली सून कधी घरी येते असे झाले होते.


चार दिवसांनी भल्या पहाटे पाच वाजता सुमित आणि ऋतुजा महाबळेश्वरला जाण्यासाठी निघाले. बरोबर दहा वाजता ते महाबळेश्वरला पोहोचले. दोन तासाने त्याची मिटींग संपल्यावर तो हॉटेलवर ऋतुजाला घ्यायला आला. दोघेही फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडले.

पावसाळ्याचे दिवस असल्याने काळेकुट्ट ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. रस्त्याच्या कडेला एका आडोश्याला ते दोघे थांबले. सुमितने सगळा अंदाज घेतला, रस्त्याच्या बाजूला खोल दरी होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने सगळीकडे धुके पसरले होते. समोरचे काहीच दिसत नव्हते आणि रस्त्यावर एक चिटपाखरूही नव्हते.

हीच चांगली संधी आहे असे वाटून त्याने ऋतुजाला मिठीत घेऊन बोलत ठेवले. बोलत बोलत अगदी रस्त्याच्या कडेला येऊन त्याने तिला एक जोरदार धक्का दिला. त्या धक्क्याने ऋतुजा कोलमडून खोल दरीत पडली.

“ऋतुजाऽऽ माझी ऋतुजा पाय घसरून दरीत पडली. कोणीतरी तिला वाचवा. माझ्या ऋतुजाला कोणीतरी वाचवा.” रस्त्याच्या कडेला उभा राहून आक्रोश करत सुमित उर बडवत होता.


ऋतुजाचे छिन्न-विच्छिन्न शव दरीतून बाहेर काढण्यात आले. सुमितची सखोल चौकशी पोलीस करत होते; पण त्याच्याबद्दल सगळीकडून चांगलीच माहिती पोलिसांना मिळत होती.

ऋतुजाच्या आईवडिलांकडून, सुमितच्या स्टाफकडून, सुमितच्या आईकडून सगळीकडून हेच सांगण्यात आले की, सुमितचे ऋतुजावर जीवापाड प्रेम होते आणि ते दोघे लग्न करणार होते. सुमितने एवढा जबरदस्त प्लॅन केला होता की त्याच्यावर कुठलेच आरोप सिद्ध झाले नाहीत.


ऋतुजा त्याच्या आयुष्यातून गेल्यावर त्याने आजारपणाचे नाटक असे बेलाशक वठवले की, सगळ्यांना त्याचे भयंकर वाईट वाटत होते. काही दिवसांनी लोकं ऋतुजाला विसरले आणि आपापल्या मार्गी लागले.

ऋतुजा त्याला स्वतःला विसरू देईल?
:
क्रमशः
©®नेहा उजाळे.
______

🎭 Series Post

View all