तिचा प्रतिशोध ( भाग ३ अंतिम )

एका आत्म्याचा झालेल्या अन्यायाचा सूड
तिचा प्रतिशोध.
भाग ३ ( अंतिम )

सुमितचा खोटा चेहरा फक्त सुमितलाच माहिती असल्याने तो आता कुठल्याही मुलीला स्वतःच्या जाळ्यात ओढत नव्हता. मधे मधे मात्र ऋतुजाच्या बाबतीत आपण किती भयंकर प्रकार केला आहे ह्याची जाणीव होऊन त्याचे मन त्याला खात होते. लोकांना आणि त्याच्या आईला वाटत होते की सुमित अजूनही ऋतुजाला विसरला नाही आणि म्हणून तो लग्नाला देखील तयार होत नाही.

ऋतुजाला जाऊन आता पाच वर्षे झाली होती म्हणून सुमितच्या आईला वाटत होते की सारे पूर्वायुष्यात घडलेले सुमितने विसरावे आणि लग्न होऊन तो मार्गी लागावा आणि म्हणून त्यांनी त्याच्या पाठीमागे लागून सावनीचा फोटो त्याला दाखवला.


सुमितने सावनीने पाठवलेल्या मेसेजला उत्तर दिले. दोघांनी बराच वेळ चॅटिंग केले. दोघांनाही आपापली मते, आवडीनिवडी एकमेकांना शेअर करावयाचे असल्याने त्या दोघांनी भेटायचे ठरवले. त्या दोघांनी एकमेकांना स्वतःचे फोन नंबर दिले. आता व्हाट्सएपच्या मार्फत एकमेकांच्या संपर्कात राहायला त्यांना सोप्पे जाणार होते.


अखेर त्यांचा भेटण्याचा दिवस उजाडला. सुमित थोडा नर्व्हस होता. कित्येक वर्षे त्याच्या जीवनात कोणी मुलगी आली नव्हती. इनफॅक्ट त्यानेच कुठलीही मुलगी आयुष्यात येऊ दिली नव्हती. तो लोकांच्या नजरेत जरी निर्दोष असला तरी स्वतःच्या नजरेत तो एक दोषी होता. कित्येक रात्री त्याने दचकून उठून काढल्या होत्या. ऋतुजाची आठवण आली की त्याला त्याच्या वाईट कृत्याबद्दल पश्चाताप होत होता; पण वेळ कधीच निघून गेली होती.


सुमित आणि सावनी ठरलेल्या हॉटेलमध्ये, ठरलेल्या वेळेत भेटले. दोघांनी एकमेकांच्या अपेक्षा, मते जाणून घेतली. दोघे एकमेकांसाठी एकदम अनुरूप होते. सावनीला सुमितचा आणि सुमितला सावनीचा कॉन्फिडन्स भलताच आवडला होता.


"सावनी, तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय अपेक्षा आहेत?" सुमितने सावनीला विचारले.


"खरे म्हणजे माझ्या फार काही अपेक्षा नाहीत. तसं तर तुझी प्रोफाइल मला आवडली कारण तू माझ्या निकषांमध्ये बसतोस. नोकरी, शिक्षण, पगार ह्यापेक्षा तू माणूस म्हणून कसा आहे हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. कारण खूप शिकलेली व्यक्ती आणि लाखभर पगार असलेली व्यक्ती विचारांनी प्रगल्भचं असते असे नाही. त्यांची मते पुढारलेली असतात असेही नाही. त्यामुळे मी हे सगळे गुण पाहणार आहे माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये. बाय द वे, तुझ्या काय अपेक्षा आहेत?" सावनी म्हणाली.


"माझ्या देखील खूप मोठ्या अपेक्षा नाहीत. मला समजून घेणारी, माझ्या सुखदुःखात मला साथ देणारी आणि मुख्य म्हणजे माझ्या आईला आपली आई समजणारी मला बायको हवी. माझ्या आईने माझे बाबा गेल्यावर खूप कष्टाने मला वाढवले आहे. तिला सुखी ठेवायचे आहे मला." सुमित म्हणाला.


दोघांनी एकमेकांबरोबर खूप गप्पा मारल्या. अगदी लहानपणापासून ते आतापर्यंतच्या काही आठवणी, काही प्रसंग एकमेकांशी शेअर केले.


आता ते दोघे वारंवार भेटू लागले. जोपर्यंत ते दोघे एकमेकांना नीटसे जाणून घेणार नाहीत तोपर्यंत ते त्यांच्या पालकांना आपली पसंती सांगणार नव्हते.


सहा महिन्यांनी एकमेकांना पारखून त्यांनी होकार दिला. त्यांच्या पालकांना देखील पसंती सांगितली. विशेष म्हणजे ह्या सहा महिन्यांत सुमितला ऋतुजाची स्वप्ने पडली नाहीत का कसले भास झाले नाहीत.


"सावनी, आपण लग्नानंतर कुठे जाऊया? तू म्हणशील तिथलं बुकिंग करून ठेवतो मी." सुमित म्हणाला.


"सुमित, अनायसे आपले लग्न डिसेंबरमध्ये होते आहे तर आपण काश्मीरला जाऊया. तिथे मला बर्फात खेळायला आवडेल आणि मुळात म्हणजे तो ऑफ सिझन असल्याने खूप गर्दी नसेल. छान निसर्गाच्या सानिध्यात, बर्फाने आच्छादलेले डोंगर हे सारे अनुभवायचे आहे मला." सावनी म्हणाली.


एकमेकांना पसंती दर्शवल्यावर लगेच तीन महिन्यांच्या आत दोघांचे लग्न झाले. सुमितचे लग्न खूपच धुमधडाक्यात झाले. सुमितच्या आईने आपली सगळी हौस लेकाच्या लग्नात पूर्ण केली.


लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा, गोंधळ, कुलस्वामिनीचे दर्शन वगैरे आटपून सुमित आणि सावनी हनिमूनसाठी काश्मीरला निघाले. सावनीने त्याला कुठल्याही ट्रॅव्हलचे बुकिंग करायला लावले नाही कारण तिच्या मते आपण प्रत्येक ठिकाण मनसोक्त फिरू शकत नाही आणि ट्रॅव्हल्सवाले सांगतील तशी वेळ पाळावी लागते.


फ्लाईट काश्मीरमध्ये लँड होतानाच सावनी बर्फाच्छादित डोंगर पाहून भलतीच खुश झाली होती. कधी एकदा काश्मीर डोळ्यांत साठवून ठेवते आहे असे तिला झाले होते.


रूममध्ये पोहचल्यावर दोघे फ्रेश झाले. दोघांनी हॉटेलच्या डायनींग हॉलमध्ये लंच केले आणि थोडी विश्रांती घेण्यासाठी पुन्हा रूमवर आले. प्रवासाच्या थकव्यामुळे दोघांना झोप लागली. संध्याकाळी जवळपासच्या मार्केटमध्ये दोघांनी फेरफटका मारला.


दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे गुलमर्गला जाणार होते. सावनी बर्फामध्ये खेळायला खूपच उत्सुक होती. ते दोघे रात्री एकत्र आले. लग्नानंतर देव देव करण्यामध्ये त्यांना एकत्र येता आले नव्हते त्यामुळे ते दोघे मिलनासाठी उत्सुक होते. ते एकमेकांमध्ये पूर्ण सामावून जाणार इतक्यात अचानक सुमितला सावनीचा चेहऱ्यात ऋतुजाचा चेहरा दिसू लागला आणि एका क्षणात तो सावनीपासून दूर झाला. सावनीला काय झाले ते समजलेच नाही.


"सुमित, काय झाले आहे तुला? असा लांब का गेलास माझ्यापासून?" सावनीने काळजीने विचारले.


"काही नाही ग. अंगात कणकणी वाटते आहे. अचानक सगळं अंग दुखायला लागलं आहे. मी झोपतो. सावनी सॉरी. उद्या सकाळी आपल्याला गुलमर्गला देखील जायचे आहे." सुमितला ऋतुजाचा भास झाल्याने तो मनातून घाबरला होता. सावनीला तसे न दाखवता सुमितने खोटे सांगून वेळ मारून नेली.


“अरे सुमित, ठीक आहे. तुला बरं नसेल तर आपण उद्या जाण्याचं कॅन्सल करूया. तुझी तब्येत ठीक नसेल तर तू आराम कर." सावनी सुमितच्या अंगावर ब्लॅंकेट घालत म्हणाली.


"नाही सावनी, आपण जाऊया उद्या. मी आराम केला तर सकाळपर्यंत ठीक होईन. तू इथे किती हौशीने आली आहेस. मला तुझा कुठलाही हिरमोड करायचा नाही. सॉरी डिअर पण मी आता क्रोसिन घेऊन झोपतो." सुमित म्हणाला.


दुसऱ्या दिवशी बर्फात खेळायचे म्हणून तयारीनिशी ते दोघे गुलमर्गला जाण्यासाठी बाहेर पडले. सावनी तर बर्फ पाहून उल्हासित झाली होती. बर्फामध्ये ते दोघे मनसोक्त खेळले. खेळता खेळता सुमित डोंगराच्या कडेला पोहोचला. सावनी त्याच्यापासून वीस ते पंचवीस पावले लांब होती. अचानक सुमितला एका शक्तीने जोरदार धक्का दिला.

"सुमितऽऽ आज मला मुक्ती मिळाली. तू जसे मला दरीत लोटलेस तसेच आज मी तुला दरीत लोटून माझी अंतिम इच्छा पूर्ण केली.

तू मला संसाराची स्वप्ने दाखवून पूर्ण केली नाहीस तसा मी देखील तुझा संसार होऊ दिला नाही. तुझं आणि सावनीचं मिलनही मी होऊ दिलं नाही कारण मी तुझ्यावर खरंखुरं प्रेम केलं होतं आणि तुझ्या बाहुपाशात मी दुसरी स्त्री पाहू शकत नव्हते." सुमित खोल दरीत पडत असताना त्याच्या कानात एक आवाज घुमला.

“ऋतुजाऽऽ..”
त्या आवाजाने खोल दरीत पडत असताना सुमितच्या तोंडून अस्पष्ट नाव बाहेर पडले आणि क्षणार्धात खोल दरीत पडून तो बर्फाच्या खाईत लुप्त झाला.


सावनी मात्र आपला नवरा आपल्या डोळ्यांसमोर खोल दरीत पडला म्हणून उर बडवत बसली.

( समाप्त )
©®नेहा उजाळे.

🎭 Series Post

View all