Login

तिचा स्पेशल मसाला

तिचा स्पेशल मसाला
मयुरी स्वयंपाक बनवत होती. आज गणेश चतुर्थी होती.तिचा कालचा हरतालिकेचा उपास पण सोडायचा होता. तिला नैवैद्य दाखवयचा होता. तिने एकीकडे भाजी फोडणीला टाकली.

कणीक भिजवायला घेतली. या गडबडीत तिच्या कडून मिसळवण्याच्या डब्याच झाकण व्यवस्थित बंद झालं नाही. एकीकडे घड्याळाने दहा वाजल्याचे टोले दिले.

" बापरे दहा वाजले. अजुन माझा स्वयंपाक नाही झाला. मसाले भात फोडणीला टाकायचा आहे. कोशींबीर साठी काकडी चिरायची आहे. पुऱ्या करायच्या आहेत. आई ss.

साडे अकरा पर्यंत सगळ आवरायला हवं. तरी बरं मोदक ऑर्डर केले आहेत. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करायची आहे. सखी पार्वतीसाठी दही पोहे पण करायचे आहेत. शिदोरी नको का द्यायला ! "

स्वतः शीच बडबड करत ती काम करत होती. तिने तांदूळ भिजवून ठेवला होता. मसाले भात करण्यासाठीं भाज्या पण चिरून ठेवल्या होत्या. कोशिंबीर साठी काकडी पण चोचवून ठेवली होती.

आता कोशिंबीरीला फोडणी घालु तनंतर मसाले भात फोडणीला घालू. अस ठरवत तिने कुकर गॅस वर ठेवला आणि दुसऱ्या बर्नर वर कढलं ठेवलं. फोडणी करण्या साठी मसाल्याचा डबा रॅक मधून बाहेर काढला. नी

" धाड धु दुम."

चमचे पडले . मसाल्याच्या डब्यातले छोटी छोटी भांडी खाली पडली. त्यातले मसाले हळद तिखट मोहरी, मसाला, जिर सगळया गोष्टी एकेमकांच्या मिसळल्या.

" आss आई ग."

" काय ग ? काय झालं ? "

" मयुरी काय हे ! किती ग वेंधळी तु."

" मयुरी तुला कुठं लागलं तर नाही ना ? "

डबा पडल्याचा आवाज ऐकून घरातील सगळे किचन मध्ये आले. तेव्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया काहीशा अशा होत्या. ती एकदा त्यांच्या कडे बघत होती. नी एकदा खाली सांडलेल्या मसाल्याच्या डब्या कडे. अभय ने आधी किचन मधे येऊन गॅस बंद केला. गॅस वरच तेल तपून लाल झालं होतं.

"अग बाई , हे काय केलंस तू ? अशी कशी ग धांदरट तु." सासूबाईंचा आवाज थोडा तीव्र झाला.
काही वेळ कोणीच काही बोललं नाही.

" तुला कुठं लागलं नाही ना मयु." अभय ने विचारलं. तिने नकार देत मान हलवली.

" बर झालं. तुला काही नाही झालं. सावकाश काम करत जा सूनबाई." बाबा म्हणाले.

" अभय आवर लवकर बाप्पाची प्रतिष्ठापना करायची आहे.अजून पूजा करायला सुरवात पण नाही झाली." बाबा म्हणाले नी बाहेर गेले.

" आलो बाबा. गुरुजी येतच आहेत." अभय म्हणाला.

" मयुरी स्वयंपाक करताना गडबड नको करू. काम वाढत तुझं."

तो खाली पडलेला डबा उचलून ओट्या वर ठेवत म्हणाला. नंतर त्याचा फोन वाजला तर तो बाहेर निघून गेला. सासू बाई अजुन पण तिच्या कडे रागावलेल्या नजरेने बघत होत्या.

"सॉरी आई , माझ्या हातातून चुकून सुटला." मयुरी म्हणाली.

सासूबाईंनी नाराजीने म्हणालं, "हे बघ अस धांदरटा सारखी वागते तू. म्हणून तुला सावध रहायला सांगत असते मी आणि तू..."

सून शरमेने खाली पाहत होती. तिला वाटत होतं की तिने खूप मोठी चूक केली आहे.

"आता हे सारं स्वच्छ करायचं आहे. आणि पुढच्या वेळी सावध रहुन काम कर. नाहीतर आणखी नुकसान करशील." सासूबाईंनी कडकपणे सांगितलं.

सूनने लगेचच फरशीवर पसरलेले मसाले स्वच्छ करण्यास सुरुवात केली. तिला वाटत होतं की तिने सासूबाईंना खूप निराश केलं आहे. तिने ते सगळं आवरलं. सगळं एकत्र गोळा केले.
गाळण्याणे गाळून घेतले. त्यामुळे मोहोरी जिरे तीळ सुक खोबर सारखे दाणेदार पदार्थ वेगळे झाले. बाकी हळद तिखट हिंग मसाला वैगेरे पदार्थ चाळून घेतल्या मुळे पावडर तयार झाली होती.

" सावध राहुन काम कर नाहीतर आणखी नुकसान करशील ! "

सासू बाईंचं ते वाक्य तिच्या डोक्यात नाचत होत. त्याच विचारात तिने बाकीचा स्वयंपाक केला. दसऱ्याचा दिवस आणि दुकानाची पूजा वगेरे तर सगळ काही उत्तम प्रकारे साजर झालं.

पण दररोज स्वयंपाक करताना तिला ते गोळा करून ठेवलेलं मसाल्याचं मिश्रण सासू बाईंच्या बोलण्याची आठवण करून देत होत.

तिच्या कडून एक चुक झाली होती. पण सासू बाईंच् बोलणं तिच्या मनाला लागलं होतं. या मिश्रणाचे काय करायचं ? हा प्रश्न तिला सतावत होता.

तिला तिच्या आईचा सल्ला आठवला, एक कुशल स्त्री घरातील कुठलीही गोष्ट वाया जाऊ देत नाही. त्यातच तिच कसब असत.

आता काही तरी शक्कल लढवली पाहिजे. ज्यामुळे हे मसाल्याचं मिश्रण सतकारणी लागेल. तिने ते सगळं मिश्रण मंद आचेवर भाजून घेतल. त्यात थोड गरम मसाले पण ऍड केले. छान पैकी मसाला बनवला.

नंतर जवळपास पंधरा दिवस तरी तिने रस्सा भाजी, उसळ, मसाले भात, पुलाव वगेरे बनवताना त्यात त्याचा वापर केला.

जेवताना सासू सासरे आणि खाण्याच्या बाबतीत काहीसा चोखंदळ असणारा तिचा नवरा आज काल तिच्या स्वयंपाकाची तारीफ करत होता. ती पण हसुन सगळं एन्जॉय करत होती.

पंधरा दिवसांनी मसाला संपला. पुन्हा भाजी उसळी वगेरे पदार्थ जुन्या चवीचे बनू लागले. नवऱ्याने तिला बोलून पण दाखवल.

" मयुरी तुझ लक्ष कुठं आहे ? भाजी अशी का केलीस. मागच्या वेळी केली होती , तशीच करत जा. छान झाली होती."

सासू सासरे यांनी पण नवऱ्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. आता मयुरीला समजेना,

" काय करावं ? "

" पुन्हा सांडावा का मिसळवणाचा डबा ? " असा काहीसा गंमतीदार विचार पण मनात येऊन गेला.

दिवाळी पाच सहा दिवसावर आली होती. सासू बाई स्वतः जातीने उभ्या राहून कामवाल्या मावशीन कडून स्वयंपाक घर आवरून घेत होत्या. मावशीनी मिसळवण्याच्या डब्याला उचलून बाजुला ठेवणार त्या आधीच सासू बाई म्हणाल्या ,

" कमल तु नको डबा उचलू. तुझे हात ओले आहेत. अग थांब मीच उचलून ठेवते."

अस म्हणत त्यांनी स्वतः तो डबा उचलला. पण मागे वळून बाजूच्या टेबलवर ठेवणार त्या आधी त्यांच्या साडीच्या निऱ्या मध्ये त्यांचा पाय अडखळला. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी ओट्याचा आधार घेतला. त्या गडबडीत मिसळ वणाचा डबा खाली पडला. सांडला. सगळं काही जमिनीवर विखरल.

" हि मयुरी पण ना, डब्याला झाकण लावून नीट बंद करून ठेवता येईल काय माहिती ? "

असं बडबडत त्या खुर्चीवर बसल्या. कमवाल्या मावशी त्या खाली पडलेल्या पसाऱ्याकडे केविलवाण्या नजरेने बघत होत्या. त्याचं साफ सफाई करायचं काम वाढवलं होत ना सासूबाईंनी!

हॉल मध्ये साफ सफाई करतं असलेली मयुरी डबा पडल्याचा आवाज ऐकून किचन मध्ये गेली. सासू बाईंची बडबड ती मागे उभी राहुन ऐकत होती.

तिला बिचारीला समजत नव्हत, सासू बाई स्वतः मिसळ वण्यचा डबा उचलून ठेवत होत्या.त्यांच्या तोल सावरण्याचा प्रयत्नांत तो डबा खाली पडला. यात तिची काय चुक ?

ते जाऊ दे, पण खाली पडलेला मिसळवणाच्या मिश्रणाला बघून तिचे डोळे कसल्याशा आनंदाने चमकले होते.

" आता पुढचे पंधरा दिवस तरी सगळे जणं तिच्या स्वयंपाकाचे कौतुक करणारं होते."

तिला असं तिच्या विचारात, दरवाज्यात उभ राहिलेलं बघून सासू बाई तिच्यावर ओरडल्या,

" मयुरी स्वयंपाक करताना डब्याची झाकण व्यवस्थित बंद करायला काय प्रॉब्लेम आहे का तुला ?"

" क.. काय म्हणल्या आई तुम्ही."

सासू बाईंच्या मोठ्या आवाजाने ती भानावर आली .स्वतः चे विचार बाजुला ठेवून त्यांच्या मदतीला पुढं आली. तिला सगळं सामान गोळा करताना बघून सासू बाई तिच्या नावाने बडबड करत होत्या. पण आज मयुरीला त्यांच्या बोलण्याच वाईट नाही वाटलं.

कारण त्यांच्या त्या दिवशीच्या विषेश टिपणी मुळे तर तिला मयुरी स्पेशल मसाला करायची रेसिपी मिळाली होती.

आता हे सिक्रेट शेअर करायचं का सासू बाई सोबत ?

समाप्त.

©® वेदा

कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.

या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


0

🎭 Series Post

View all