Login

तिचाच तो

एका गोड प्रेमाची कथा

धावत पळत तीने बस गाठली. तिला माहीत होते की ही बस सुटली तर पुढची बस अजून अर्ध्या तासाने असेल आणि त्यात गर्दी देखील असेल मग केलेला सगळा साज शृंगार त्यातच निघून जाईल.

रिकाम्या खिडकीत बसून ती काही वेळातच बाजारात पोचली. जवळच त्याचा कोचिंग क्लास होता.

बाहेर उभ्या असलेल्या गाडीच्या आरशात तिने स्वतःचा चेहरापट्टी पाहिली. सगळे व्यवस्थित आहे बघून तिने आत प्रवेश केला.

"अरे वा! आज क्लासमध्ये अचानक इतका उजेड कसा दिसू लागला" त्याने टिंगल करण्यासाठी शब्द फेकले.

"का रे असा छळतोस" तिने हसून लाजायचा प्रयत्न केला.

"मग काय आज सकाळी सकाळी आमच्याकडे, काही काम होते का?"

"म्हटले तर हो, किंवा नाही" तिच्या तोंडातून काहीतरी वेगळेच निघाले, जे तिला बोलायचेच नव्हते.

"अगं काय नक्की सांग ना!"

"एक प्रश्न होता विचारू का?' तिने घाबरत घाबरत विचारले.

"अरे इथे सगळे मलाच प्रश्न विचारतात, कधीतरी मला देखील प्रश्न विचारावेसे वाटू दे की" तो खो खो करून हसू लागला.

"मला ना तुला काहीतरी सांगायचे आहे."

"बोल ग उगाच माझा अंत पाहू नको"

"मला ना" ती थांबली आणि परत बोलली.

"तुझ्याकडून"

"काहीही मिळणार नाही, मी हल्ली सगळ्यांना पैसे वाटायचे बंद केले आहे.चलो छुट्टा नही, आगे जाओ" तो पुन्हा हसत हसत बोलला.

"अरे थांब रे मी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत आहे आणि तू मध्ये मध्ये बोलून माझी लय बिघडवत आहेस" ती घाबरत लटक्या रागात बोलू लागली.

"काय घाबरत आहेस, इतका वेळ लागतो का बोलायला. सरळ सांगायचे ना मला तुझ्या बाळाची आई व्हायचे आहे ते"त्यांने एका झटक्यात बोलून टाकले.

"ईई.....काही काय बोलतोस रे, मी काही हे बोलायला आली नव्हती" तिने घाबरून पाय मागे घेतला.

"बरं ठीक आहे मग, तसेही मला सकाळीच एकीने गुलाब दिला आहे, तो बघ तिथे ठेवला आहे. तिला होकार कळवून टाकतो"

"असं नको बोलू रे!" तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.

"आता रडायला काय झाले? तू काही मला मागणी घालायला आली नव्हतीस ना! तूच आता म्हणालीस की"

"तसे नव्हते काही, मला देखील तेच बोलायचे होते"

"ते म्हणजे काय?" त्याने पुन्हा एकदा हसून विचारले

"शी बाई.... तुला ते माझ्या तोंडातूनच ऐकायचं आहे का"

"तू सांगशील तर बरे, नाही तर सकाळची मुलगी तशी छान होती दिसायला"

"एक फटका देईन तिच्याकडे पाहिलं तर, थांब तो गुलाबच फेकून देते" तिने रागातच तो गुलाब उचलला.

आणि आश्चर्य त्या गुलाबाच्या खाली लहानशा कागदावर तिचेच नाव लिहिले होते.तिच्या रागाचे रूपांतर एकदम लाजेमध्ये झाले आणि ती हळूच त्याच्याकडे पाहू लागली.

"ए वेडाबाई समजले का कोणासाठी आणले होते ते" त्यांने थट्टेने तिला विचारले.

"मी काही स्वप्नात नाही ना? तू हे खरच माझ्यासाठी आणले होतेस"

"नाही....ग समोरच्या म्हशीच्या डोक्यावर बांधणार होतो. अगं हो मी आज संध्याकाळी तुलाच येऊन भेटणार होतो. पण त्याआधी तूच आलीस आणि माझे काम सोपे झाले"

"मग मला असा त्रास का देत होतास,मी लगेच निघून गेली असती तर"

"तू कसली जातेस, आता आपल्याला एकत्रच जायचे आहे सगळीकडे लग्नाची आमंत्रण पत्रिका वाटायला"

"एवढ्या लवकर......"


©भालचंद्र नरेंद्र देव
0