Login

तिचे कर्तव्य भाग १

इथे राहायचं असेल तर आमच्या मर्जीने राहावं लागणार असं म्हणणारी सासू स्वतःच आजारी पडली, तेव्हा कर्तव्य निभावणारी तीच होती

तिचे कर्तव्य भाग १..

लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणाला आली होती. ती खूप खुश होती. घरी आई राधा आणि बाबा सुधीर होते. एकुलती एक अशी मुग्धा खूप लाडात वाढली होती, मात्र संस्कार देण्यात आईने कसलीच कसर सोडली नव्हती. मुग्धा माहेरी गेली, तेव्हा तिची आत्या मंगल देखील आली होती.

"मुग्धा, काय म्हणतंय सासर? आणि तुझी सासू कशी आहे?"
मंगलला तिच्या सासरी कसं आहे सगळं जाणून घ्यायचं होतं.
मुग्धा आत्याला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होती. आत्याच्या प्रश्नाला काय आणि कसं उत्तर द्यायचे हे तिला माहीत होतं.

ती म्हणाली,
"आत्या, तिथे देवासारखी माणसं आहेत. खूप जीव लावतात. सासुबाई तर अगदी लेकीप्रमाणे जपतात. सासरे देखील तसेच. नवरा देखील खूप जीव लावतो."

हे ऐकून आत्याचे समाधान झालं नव्हतं.

"बघ बाई नवीन नवीन असंच असणार, नंतर खरं काय ते कळतं."

राधा हे सर्व ऐकत होती.
"ताई, असं नकारात्मक कशाला बोलत आहात. चांगलीच माणसं आहेत ती."

"राधा, तू ना अजूनही तशीच आहेस, फार वेंधळी आहेस. लेकीला जरा चार शब्द सांगून हुशार करायचं तर तसं नाही."

"ताई, आजकालच्या मुली आहेत त्या. चूक बरोबर सगळं कळतं."

"मी बाई सांगायचे काम केलं. मुग्धा, जरा जपून राहा बाई सासरी."

आत्या दोन दिवस राहिली आणि निघून गेली.

राधा मुग्धाला म्हणाली,
"मुग्धा, तू तुझ्या आत्याचे नको ऐकू. तुझा संसार आताच सुरू झाला आहे. आधीच अंदाज बांधून मोकळी नको होऊ."

"आई, तुला खरंच असं वाटतं का मी आत्याचे ऐकणार? मी काय ओळखत नाही का आत्याला? आजीचे सतत कान भरून तुझ्यात आणि बाबामध्ये भांडण लावत आली. आई, तू देखील नणंद होती ना पण तू तर तसं केलं नाही. मामा, मामी आजही गेले तर किती खुश होतात. मामी आणि तुझं नातं देखील किती छान आहे. आई, मला देखील तुझ्यासारखं माझं घर जपायचं आहे. शेवटी मी तुझीच लेक आहे. तुझ्या पाऊलावर पाऊल ठेवणार."

हे ऐकून राधाला भरून आले.

"मला तुझ्यावर खूप विश्वास आहे मुग्धा, तू सगळं काही व्यवस्थित करशील."

तितक्यात सुधीर आले.

"काय माया लेकीच्या गप्पा चालल्या आहेत?"

"सहजच गप्पा मारत बसलो आहोत बाबा." मुग्धा म्हणाली.

मुग्धाला तिच्या नवऱ्याचा मंदारचा फोन आला. ती निघून गेली.

"राधा, मुग्धासोबत जे तू बोलत होती ते ऐकलं मी. खरंच इतकं सगळं होऊन देखील तू समजूतदारपणे वागली आणि मी मात्र.."

त्यांना पुढे बोलवत नव्हतं.

"जाऊ द्या, झालेल्या गोष्टी कशाला काढत बसायच्या, त्याला काही अर्थ आहे का?"

----------

"इथे राहायचे असेल तर आम्ही म्हणू तसंच राहावं लागणार."
सुधीरचा चेहरा लाल झाला होता. दहा महिन्यांची मुग्धा हातात होती.
राधा देखील रडत होती.
क्रमशः
अश्विनी ओगले.
0

🎭 Series Post

View all