"अगं इतक्या दिवसांनी असा हा एकांत मिळालाय, इतकं काय लाजतेस? आधी तर एकमेकांशी बोलताही यायचे नाही. सतत कुणी ना कुणी असायचे आजूबाजूला. स्वतःच्याच बायकोकडे पाहताना सुद्धा मर्यादा यायच्या. पण आज लग्न झाल्यापासून पहिल्यांदा फक्त तू आणि मी आहोत."
त्याच्या अशा बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर आपसूकच लाजेची कळी खुलली.
आज पहिल्यांदा दोघांना असा एकांत मिळाला होता. लग्न होऊन जवळपास दोन महिने उलटले पण स्नेहा आणि राजीवची पहिली रात्र अजूनही काही सजली नव्हती. प्रेमाचे नाते अजूनही दोघांमध्ये फुललेच नव्हते.
क्षणभर दोघेही भूतकाळात रमले.
घरात सासू सासरे, दोन तरुण नणंदा, ऐन किशोरावस्थेत पदार्पण करीत असलेला एक लहान दिर आणि सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या आणि कडक शिस्तीच्या आजे सासूबाई.
या सर्वांमध्ये स्नेहाला मात्र खूपच अवघडल्यासारखे व्हायचे.
तशी तिही ऐन तारुण्याच्या उंबरठयावर. आता कुठे विसाव्या वर्षात पदार्पण केले होते तिने. त्यात लग्न होवूनही अजून तिच्या नव्या नात्याला खऱ्या अर्थाने सुरुवात ही झालीच नव्हती म्हणा. अजूनही राजीव आणि स्नेहा एकमेकांसाठी तसे परकेच होते. दोन्ही नणंदा तिच्याच मागच्या पुढच्या वयाच्या होत्या.
घरात तिची होणारी घुसमट राजीवला समजत होती. ग्रामीण भागात रानवस्तीला राजीवचे छोटेसे घर होते. मातीत आणि विटांमध्ये बांधलेले दोन खोल्यांचे घर, घरासमोर प्रशस्त अंगण, घराला लागूनच जनावरांचा गोठा, कोबड्यांचा खुराडा, अंगणात असलेले छानसे तुळशी वृंदावन अंगणाची शोभा वाढवत होते.
राजीव शेजारच्याच एका आदिवासी पाड्यावर असलेल्या आश्रम शाळेत शिक्षक म्हणून नुकताच रुजू झाला होता. आठवड्यातील पाच दिवस शाळेच्या ठिकाणी तो मुक्कामी असायचा तर दर शनिवारी आणि रविवारी फक्त तो घरी यायचा.
स्नेहाचे माहेर सासरपेक्षा थोडे वरचढ होते. तालुक्याच्या ठिकाणी लहानाची मोठी झालेली स्नेहा, लग्न झाल्यावर आता अशा रानवस्तीवर राहणे तिला भागच होते.
पण त्यापेक्षाही जास्त अवघड होते ते म्हणजे घरातील या विविधांगी स्वभावाच्या आणि विविधांगी वयाच्या माणसांना समजून घेणे. तशी तिही वयाने लहानच पण आता मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर अशी अचानक पडली होती.
पण त्यापेक्षाही जास्त अवघड होते ते म्हणजे घरातील या विविधांगी स्वभावाच्या आणि विविधांगी वयाच्या माणसांना समजून घेणे. तशी तिही वयाने लहानच पण आता मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर अशी अचानक पडली होती.
सतत आपल्यावर कोणाचे तरी लक्ष असते; असे राहून राहून तिला वाटायचे? त्यामुळे अजूनही ती घरात मनमोकळेपणाने वागत नव्हती. लग्नानंतर नवरा बायकोचे नाते काय असते? हेही अजून तिला नीटसे कळले नव्हते.
राजीव समोर असला की आपसूकच तिचे मन भरायचे. अलगद त्याच्या कुशीत शिरावं, असं खूपदा वाटायचं तिला. पण घरात सतत माणसांची वर्दळ. त्यात "दिर नणंदा हे काय विचार करत असतील आपल्याबद्दल? या वयात असे नवीन जोडप्याला समोर पाहून त्यांच्याही मनात काही ना काही सुरुच असेल ना? बाई बाई त्यापेक्षा नकोच."
"त्यातच रोहन भाऊजी आता कुठे नववीच्या वर्गात, त्यांना तर सर्व काही अभ्यासाला आहे सायन्समध्ये. आणि आजकाल तर त्यांचा सायन्सचा अभ्यास जरा जास्तच वाढला आहे. मी घरात आल्यापासून त्यांच्या हातात एकच पुस्तक दिसतं. दुसरे विषय दिसतच नाहीत."
लग्न झाल्यावर आठच दिवसांत कोणी आसपास नाही हे पाहून ह्यांनी माझा अगदी सहज हात हातात घेतला, तेवढयात सोनम ताई अचानक आल्या, बापरे!! त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून असे वाटले की आम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे. ह्या सगळ्या वातावरणामुळे रात्रीच्या मिठीच्या पुढे अजूनही गाडी सरकलीच नाही. आणि ती सरकेल असे वाटतही नाही."
स्नेहा विचार करण्यात एवढी मग्न झाली होती की तिच्या हातातील काम तसेच पडून होते. आजे सासूबाईंच्या ही गोष्ट लक्षात आली.
"अगं ये पोरी कुठं हाय तुझं लक्ष? जरा ध्यान जाग्यावर ठेवून काम कर की. परातीतील गहू अजून जसंच्या तसंच हाईत. आवर पटकन् नाहीतरी तिकडं गिरण बंद व्हईल परत. अगं ये सोने जरा मदत कर तिला."
त्यात उद्या शनिवार म्हणजे हे घरी येणार, नुसत्या विचारानेच स्नेहाची कळी खुलली.
वहिनीला गालातल्या गालात हसताना पाहून सोनमला आणि मोनालीला कुजबुजताना स्नेहाने ऐकले."शनिवार आला आणि दादा येणार म्हटले की वहिनीची कळी खुलते. आणि दादा आल्यावर हीचे वागणे किती बदलते पाहिले का मोने?"
"नाहीतर काय ग, जसं जगात हेच दोघं नवरा बायको हाईत. आणि दादा आल्यावर हिचं कामात अजिबात लक्ष नसतं बरं का? सारखं त्याच्या मागं पुढं करत असती ती. आणि दादा, तो तर काही विचारूच नको. आपला दादा आधी असा नव्हता ना ग? किती बदलला तो वहिनी घरात आल्यापासून."
"अगं मोने आधी किती चांगला वागायचा तो आपल्याशी. कित्ती गप्पा मारायचा, मजा मस्करी करायचा पण आता वहिनी सोडून त्याला काही दिसतच नाही बघ."
"ये पण तशी ती काही इतकीही वाईट नाही पण दादा घरी आल्यावर जरा डोकं फिरल्यासारखीच वागती ती. तिला एवढं पण कळत नाही, घरात रोहन्या असतो. त्याने चुकून ह्यांना असं सारखं एकत्र पाहिलं तर तो काय विचार करील?"
दोन्ही ननंदांचे बोलणे कानी पडताच स्नेहाचा उत्साहच मावळला. काय आणि कसं वागावं? हेच तिला कळेना. नवऱ्याचे मन जपावे की घरातल्यांचे हेच तिला समजेना. स्वतःच्या भावनांना आवर घालणे मात्र तिला अवघड होवून जायचे.
क्रमशः
स्नेहाची होणारी घुसमट समजेल का घरातल्यांना? जाणून घ्या पुढील भागात.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा