Login

तिची घुसमट..(भाग २)

सहनही होईना आणि सांगताही येईना त्यामुळे तिची होणारी घुसमट.


दोन्ही नणंदांचे बोलणे स्नेहाच्या कानी पडताच तिला आता तिचीच लाज वाटत होती.

"मी काही चुकीचे तर वागत नाही ना? पण काय करु मी तरी? आठवड्यातील दोनच दिवस हे घरी येतात. दरवेळी तोलून मापूनच बोलत असते मी ह्यांच्याशी. तरीही काही चुका होत असतील. पण आता समजतंय, सीमा मावशी काय सांगत होती ते, \"एकदा का लग्न झाले की मग बाईचे आयुष्य तिचे स्वतःचे राहत नाही.\" सासरच्या माणसांची मर्जी राखता राखता तिला स्वत:च्या मनाला मुरड घालावीच लागते, तरच सासरी तिचा निभाव लागतो."

त्यात आत्या म्हटली पण होती दादांना," दोन तरण्या नंदा आहेत घरात, एक लहान दिर पण आहे, नको देवू त्या घरात पोरगी."

पण दादाच म्हणाले, "नंदा काय आज ना उद्या जातील त्यांच्या सासरी. एकच भाऊ आहे पोराला, त्यात पोटापुरती शेती पण आहे, दूध- दुभतं आहे घरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोरगा सरकारी शाळेत शिक्षक आहे. आणखी काय पाहिजे? हातचं स्थळ डावललं तर पुन्हा असं स्थळ नाही भेटायचं."

"पण ज्याच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी स्विकारल्या त्याच्याशी धड बोलता पण येत नाही. नवरा बायको असूनही परक्यासारखे वागावे लागते. ह्या एवढ्याशा घरात रात्री एकत्र झोपायची पण लाज वाटते. सतत ह्या पोरी काही ना काही कुजबूज करत असतात. भलेही त्या काहीही बोलू देत, पण सतत त्या आपल्याबद्दलच बोलत नसतील ना? असं उगीच वाटत राहतं मनाला."

"ह्या आजी एक, सतत या ना त्या कारणावरुन टोकत असतात मला. आठवड्यातले दोनच दिवस नवरा जवळ असतो पण त्याच्याशी धड बोलताही येत नाही की काहीच नाही. रात्रीची ती मिठीदेखील स्वर्गसुखासमान भासते. सगळं काही ठीक आहे पण नात्याची पण एक गरज असते ना, मानसिक समाधानाबरोबरच शारीरिक समाधानदेखील तितकेच गरजेचे असते नवरा बायकोच्या नात्यात. किती दिवस असं मन मारुन जगायचं? रात्री थोड्या जरी बांगड्या वाजल्या तरी आजी जणू काही मुद्दाम खोकलत बसतात. स्वयंपाक घरात झोपायचं म्हटलं तर त्याला दरवाजा नाही. आणि इतर कुठं झोपायची सोय नाही. दादांनी निदान घर पाहून तरी माझं लग्न लावून द्यायचं होतं."

स्नेहाची खूपच घुसमट होत होती त्या घरात. कधी कोण आपल्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढेल? याचा काहीच नेम नव्हता.

त्यातच दुसऱ्या दिवशी राजीव घरी आला. बायकोला पाहून त्यालाही बरे वाटले. दोन्ही नणंदा मात्र जाता येता दोघांकडे वेगळ्याच नजरेने पाहत आहेत असे राहून राहून स्नेहाला वाटत होते. आजीदेखील जणू दोघांवर लक्षच ठेवून होती.

"आमच्या वेळी बाई आसं काई नव्हतं. आम्हाला तर नवऱ्याच्या समोर उभं रायची बी सोय नसायची. एकाच घरात राहून बी नवऱ्याचं तोंड दिसायचं नाय. पण आता बघा, नवरा नुसता जवळ पाहिजे असतो आजकालच्या ह्या पोरींना."

आजी दोन्ही नातींना सांगत होती. या सगळ्या गोष्टी पाहून राजीवच्या आईला मात्र तिचा भूतकाळ आठवत होता. "ह्या म्हातारीनं मला बी आसंच वागवलं आणि आता माझ्या सुनेला पण सारखी बोलत राहणार ही."

स्नेहा मात्र आज राजीवपासून थोडे अंतर ठेवूनच वागत होेती. तो थोडा जरी जवळ गेला तिच्या, तरी ती बाजूला निघून जायची.

"आई अग स्नेहाला काय झालंय ग? कोणी काही बोललंय का तिला? की दुखतंय काही तिचं?"

"आता मी काय सारखी घरात बसून असते का रे बाबा? ही म्हातारीच काहीतरी बोलली आसल. त्या सोनीला आणि मोनीला पण काहीबाही सांगून तिच्या बाजूनं करुन घेतलंय म्हातारीनं. पोरींना पण स्वतःची अक्कल नाई. जात्यात फक्त कॉलेजला. काय करत्यात त्यांचं त्यांलाच माहिती. तरी तुझ्या बापाला म्हणत होते मी,आधी यांची लग्न उरकून टाकू मग बघ राजूच्या लग्नाचं. पण नाई, \"माझ्या पोरी शिकत्यात तर शिकू दे त्यांना.\" आसं म्हणुन तुझ्या लग्नाचा घाट घातला आधी. तरी सून चांगली मिळाली म्हणून बरं, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं बघ. तिला झेपल तेवढं सगळं काम करती बघ ती. साऱ्यांशी हसून खेळून राहती."

"आई अगं बायकोची बाजू नाई घेत मी, पण तिने अजूनपर्यंत मला यातील एकही गोष्ट सांगितली नाही बघ."

"एक सांगू राजू, तू तिकडं एखादी खोली बघ, जा तिला तुझ्यासोबत घिवून. इथं आसं घुसमटत जगण्यापरी तिला बी ने तिकडं. ह्या पोरींना बी कळू दे जरा, ती आल्यापासून त्या जरा मोकळ्याच झाल्यात. काम नको करायला म्हणत्यात. फक्त आजी सांगल तेवढंच ऐकायला येतंय त्यांला."

"तू माझं ऐक आणि पुढच्याच आठवड्यात जा तिला तिकडं घिवून, मी सांगल तुझ्या बापाला काय सांगायचं ते."

आई आपल्याला आणि आपल्या बायकोला एवढे समजून घेईल असे स्वप्नातही वाटले नव्हते राजीवला.

क्रमशः

आता राजीव स्नेहाला खरंच त्याच्यासोबत नेईल का? स्नेहाच्या आजेसासूबाई सहजासहजी तिला पाठवतील का राजीवसोबत? जाणून घ्या पुढील भागात.