स्नेहा आणि राजीव दोघेही आज भलतेच खुश होते. दोघांनी मिळून त्यांचा छोटासा संसार थाटला. घर लहानच होतं पण दोघांसाठी आज ते राजमहालापेक्षा काही कमी नव्हतं.
स्नेहाला तर आज खूपच मोकळं मोकळं वाटत होतं. तसा घरात काही सासुरवास नव्हता तिला पण उगीचच तिला मोठं बंधन वाटायचं आजेसासूबाई आणि दोन नणंदांचं. त्यामुळे मनातून आतल्या आत तिची घुसमट व्हायची.
राजीवच्या आईला मात्र सुनेच्या मनाची होणारी घालमेल समजली. तिची होणारी घुसमट सासू असूनही तिने जाणली होती. त्यामुळेच तिने राजीवला त्याच्या बायकोला सोबत न्यायला सांगितले. कोण म्हणतं सासूला माया नसते. सगळीकडे काही खाष्टच सासवा असतात असे नाही. कुंदाताईं सारखी एखादी तरी अपवाद असतेच याला.
घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेवून स्नेहा आणि राजीव दोघेही निघाले होते संसाराचा नवा अध्याय लिहायला. दोघांनी मिळून छान घर लावले. स्नेहाला तर तिच्या या छोट्याशा संसाराची भलतीच गंमत वाटत होती. आज तर तिला स्वर्गसुखाची अनुभूती मिळत होती जणू. अखेर राजा राणीचा सुखाचा संसार सुरु झाला.
लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा नात्यात इतका मोकळेपणा जाणवत होता दोघांनाही. हक्काने दोघेही एकमेकांशी बोलू शकत होते. आज कोणीही नजर ठेवायला नव्हते त्यांच्यावर.
रात्री राजीवने स्नेहाला स्वयंपाकात मदत केली. त्यालाही खूपच छान वाटत होते, बायकोच्या मधेमधे लुडबूड करताना. नव्या प्रेमाची नवलाई आज खऱ्या अर्थाने बहरली होती.
रात्री दोघांनीही सोबत जेवण केले. खूप साऱ्या गप्पा झाल्या. इतक्या दिवसांचा नात्यातील तो बुजरेपणा आज मात्र संपला होता. एकमेकांची लागलेली ओढ क्षणाक्षणाला आणखीच वाढत होती.
आवरुन सावरून दोघेही झोपण्याची तयारी करु लागले. राजीवने घरुन आणलेल्या चटईवरच दोन गोधड्या अंथरल्या. दोघांच्याही हृदयाची धडधड क्षणाक्षणाला वाढत होती. शब्दही जणू आता दडी मारुन बसले होते. रात्रीच्या एकांताला आता फक्त अबोल अशा भावनांचीच साथ होती.
जेवढे काही अंतर आता उरले होते दोघांमध्ये त्याला खोलीतील प्रकाशाचे बंधन होते. लाजेची लाली दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. राजीवने खोलीतील दिवा विझवला. मर्यादेची सारी बंधने मग क्षणात गळून पडली. एकमेकांच्या मिठीत ते दोन जीव अलगद विसावले. दोन शरीरे आज खऱ्या अर्थाने एकरूप झाली होती.
लग्नानंतर दोन महिन्यांनी स्नेहा आणि राजीवची खऱ्या अर्थाने पहिली रात्र सजली. रात्रीच्या नीरव शांततेत दोघांच्याही हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. प्रेमाची नवलाई अधिकच बहरली. नि मुक्या भावनांनाही मग अर्थ प्राप्त झाला. नवरा बायकोच्या नात्याचा पाया त्याने घट्ट होण्यास मदतच होणार होती.
आज पहिल्यांदा स्नेहाला मोकळा श्वास घेतल्याचे समाधान मिळाले होते. आपल्याच माणसांत तिची होणारी घुसमट आता खरी थांबली होती. सर्वांना समजून घेता घेता तिला मात्र मन मारुन राहावे लागत होते.
सासूने जर तिच्या मनाची घालमेल समजून घेतली नसती तर स्नेहा आणि राजीवमधील नवरा बायकोचे नाते माहित नाही कधी फुलले असते की कधी फुललेच नसते?
घरात अशी एकतर व्यक्ती असायला हवी की जिला न बोलताही आपल्या मनातील भावना समजू शकतील. स्नेहाची सासू आज तिच्यामागे खंबीरपणे उभी राहिली म्हणूनच त्यांच्या आयुष्यात हा प्रेमाचा दिवस अखेर उजाडला होता.
खरंच आजही समाज अनेक जुन्या बुरसटलेल्या विचारांत अडकून पडला आहे. एकीकडे विज्ञानाची गगनभरारी आणि दुसरीकडे ग्रामीण भागात आजही खितपत पडलेला जुना रुढीप्रिय समाज नव्या गोष्टींचा सहजासहजी पुरस्कार करताना दिसत नाही.
सतत पुढच्या पिढीला भूतकाळातील उदाहरणे देवून \"आमच्या वेळी हे असे नव्हते\" हे वारंवार ऐकवले जाते. नवरा बायकोच्या नात्यात ठराविक अंतर ठेवून वागायला त्यांना आजही भाग पाडले जाते.
आम्ही निमूटपणे सगळं सहन करत होतो हे आजही अभिमानाने सांगितले जाते. आम्ही सहन करत होतो याचा अर्थ \"भलेही आमच्यावर अन्याय होवू द्या\" आम्ही समोरच्याचा मान ठेवत होतो आणि तुम्हीदेखील तसेच वागायला हवे.\" हा असा चुकीचा समज आजही पुढच्या पिढीकडे नकळतपणे हस्तांतरित केला जातो. पण त्यामुळे एखादे नाते फुलायचेच राहून जाते आणि नाते सुरु होण्याआधीच त्यात दरी निर्माण होण्याची शक्यता मग नाकारता येत नाही.
त्यामुळे काही गोष्टी ह्या योग्य वेळीच होणे गरजेचे असते. एका ठराविक काळानंतर नाते आपोआपच मुरत जाते नि हळूहळू संसाराची गोडी वाढते. फक्त त्यासाठी आजूबाजूला समजून घेणारी माणसे असतील तर जगण्याला नवी दिशा मिळते नि मनाची होणारी घुसमट आपसूकच रोखली जाते.
समाप्त
सदरची कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
धन्यवाद
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा