Login

तिची काय चूक? (भाग:-१)

अकस्मात झालेल्या घटनेतून सावणाऱ्या क्षिप्रा आणि तिला साथ देणाऱ्या मनोहर यांची कथा
#जलद लेखन स्पर्धा - ऑक्टोबर २०२५

शीर्षक:- तिची काय चूक?

विषय:- अकस्मात

भाग:-१

"माफ करा, माधवराव. आता हे लग्न मोडले म्हटल्यावर, साखरपुड्याचा प्रश्नच उरत नाही. उठ रे, अमित." साखरपुडा करण्यासाठी आलेले शरदराव हात जोडून मान खाली घालून उभ्या असलेल्या माधवराव यांना व नंतर बसलेल्या त्यांचा मुलगा अमितला म्हणाले.‌

शरदराव त्यांची पत्नी आणि मुलासोबत माधवरावांच्या घरी साखरपुडा करण्यासाठी आले होते. लग्न नंतर धामधुमीत करणार होते. तात्पुरता घरगुती साखरपुडा करणार होते.

त्यांचे बोलणे ऐकून माधवराव एकदम सुन्न होऊन मटकन खाली बसले. तर त्यांची पत्नी पद्मा शरदराव यांना गयागया करत रडत म्हणाली,"अहो भाऊ, असं कसं बोलता? अहो, इतक्या वर्षांची आपली ओळख, नातं असं झटक्यात कसे काय मोडताय तुम्ही? अहो, जरा तरी आमच्या मुलीचा विचार करा."

"हे बघा ताई, आम्हाला या समाजात वावरायचं आहे. तुमच्या मुलीसोबत जे झालं, त्याचं आम्हाला वाईट वाटले. जे झालं त्यामुळे तुमचं आणि तुमच्या मुलीचं नाव, प्रतिष्ठा धुळीस मिळाली. मग अशा परिवार आणि मुलीसोबत नातं जोडून आम्हाला आमची इज्जत आणि प्रतिष्ठा धुळीस नाही मिळवायची. त्यामुळे आम्हाला माफ करा." शरदराव आता थोडे कठोर आवाजात म्हणाले.

"अहो, पण तिची यात काय चूक? मी पदर पसरते, हवं तर पाया पडते. पण ठरलेलं लग्न मोडू‌ नका." पद्मा पदर पसरत कळकळीने विनंती करत रडत म्हणाली.

"अहो वहिनी, जो पदर‌ कधीच फाटलाय तो कधीच शिवता येत नाही, मग आता पदर पसरवून काय फायदा? हे म्हणाले ते बरोबर आहे." शदररावांची पत्नी विमल तुसडेपणाने म्हणाली.

पद्मा कपाळावर हात आपटत रडत खाली मान घालून बसली.

"ए अमित, असा ढिम्म होऊन काय बसलास? पप्पा जे बोलले ऐकू आले ना काय? चल उठ." थिजून बसलेल्या अमितला दंडाला धरून ओढत खेसकत विमल म्हणाली.

तिघेही तेथून निघून गेले. माधवरावांच्या घरात स्मशान शांतता पसरली होती.

आतल्या रूममध्ये त्यांची मुलगी क्षिप्रा पोटात पाय घेऊन अंगाचं मुळकुट करून शुन्यात नजर लावून पडली होती.

सर्वांचे बोलणे तिच्या कानावर पडत होते. तिच्या जवळ तिची छोटी बहीण रिया  आपल्या बहिणीची अशी अवस्था पाहून रडत तिला सावरण्याचा प्रयत्न करत होती.

झटका बसल्यागत माधवराव क्षणभर थबकले आणि मग एकदमच पद्मावर गरजले,"पद्मा, तिला इथून जायला सांग. अशा मुलीला माझ्या घरात जागा नाही."

"अहो, असे काय बोलताय तुम्ही? ती आपली मुलगी आहे. असं कसं तिला वाऱ्यावर सोडायचं? जे झालं यात तिची काय चूक? आधी तिची अवस्था तर पाहा." पद्मा क्षिप्राला कुशीत घेत आसवे गाळत म्हणाली.

क्रमशः

काय झाले होते क्षिप्रासोबत? माधवराव निर्णय बदलतील काय?